महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या घडामोडी : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना पालघरमध्ये भाजपातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला… महायुतीतील उमेदवारांच्या फोडाफोडीवरून शिवसेना शिंदे गटाने संताप व्यक्त केला… भाजपाला धक्का देत शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या बदलापुरातील महिला नेत्याने दोन दिवसांत पुन्हा भाजपात प्रवेश केला… महायुतीवरील नाराजी नाट्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला… खासदार संजय राऊत हातात तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपात नव्या-जुन्यांचा वाद

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना पालघरमध्ये भाजपातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत निवडणुकीचे तिकीट दिले जात असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. भाजपामध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले असून नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रवेश घेतलेल्या मंडळींना तिकीट वाटपात झुकते माप दिल्याचा आरोप जुन्या मंडळींकडून करण्यात आला आहे. या वादावर भाजपाचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पालघर शहरातील काही भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तिकीट वाटपावरून नाराजी निर्माण झाली होती. ती दूर करण्यात आली असून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकदिलाने प्रचारात कार्यरत झाले आहेत”, असे त्यांनी म्हटले आहे.

उमेदवारांच्या फोडाफोडीवरून शिंदे गटाचा संताप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत सत्ताधारी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारांच्या फोडाफोडीवरून शिवसेना शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यापूर्वी फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीतील शिंदेसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा किसन डोके यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावरून मंत्री संजय सिरसाट यांनी भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली. “काहींना पैशांची मस्ती आली आहे, त्याच्या जोरावर फोडाफोडी केली जात आहे. वर्चस्व सिद्ध करायला जाल तर आम्हीही ते करु शकतो. संयमाचीही मर्यादा असते. मात्र, अशांमुळे नाराजी वाढते आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढतो. केवळ फुलंब्री नाही तर गंगापूरमध्येही हेच चालले आहे. एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकांवर होतो. असे असेल तर महायुतीमध्ये निवडणुका लढता येणार नाही. मात्र, याबाबत कोणत्या उपाययोजना करायच्या याचे निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील”, मंत्री शिरसाट यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : Maharashtra Politics : भाजपाची कोंडी करण्याचे शिंदेंचे प्रयत्न? भरसभेत घेतली शपथ, नेमके काय म्हणाले?

बदलापुरातील भाजपाच्या नेत्याची पुन्हा घरवापसी

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय पक्षांनी एकमेकांचे उमेदवार फोडण्यास सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात बदलापूर येथील भाजपाच्या महिला शहर अध्यक्षा दमयंती पवार यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही गोष्टींबद्दल वाईट वाटल्याने मी तडकाफडकी भाजपाची साथ सोडली होती, असे दयमंती यांनी माध्यमांना सांगितले. कुळगा- बदलापूर नगरपालिका निवडणुकांपूर्वी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत एकमेकांचे पदाधिकारी, नाराज फोडण्यात मोठी संपर्धा लागली होती. गेल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा जोरात होती. डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी फोडल्यानंतर थेट केंद्रीय मंत्री अमित शहांच्या कोर्टात या फोडाफोडीचा चेंडू गेला होता. त्यानंतर त्यांनी अशी फोडाफोडी थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र बदलापुर आणि अंबरनाथमध्ये ही फोडाफोडी अजुनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

महायुतीवरील नाराजी नाट्यावर शिंदेंचा खुलासा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या फोडाफोडीवरून महायुती सरकारमधील मित्रपक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला. यावेळी शिंदेंनी अमित शाहांकडे भाजपामधील नेत्यांची तक्रार केल्याचे वृत्त समोर आले होते. यादरम्यान महायुतीतील नाराजी नाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला. “मी दिल्लीत जाऊन कोणाचीही तक्रार केली नाही. मुळात तक्रार करणे हा माझा स्वभाव नाही. मला बिहारमधील शपथविधीसाठी राजधानीत बोलवण्यात आले होते. त्यासाठी मी अमित शाहांच्या भेटीसाठी गेलो होता. आम्ही एनडीएमधील घटकपक्ष आहोत आणि स्थानिक पातळीवरचे विषय मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून सोडवतो”, असे शिंदे यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

हेही वाचा : Dharmendra Death : पहिल्याच निवडणुकीत खासदार, तरीही धर्मेंद्र यांनी सोडले होते राजकारण; कारण काय?

खासदार संजय राऊत पुन्हा मैदानात दिसतील- ठाकरे

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सध्या राजकारणातून ब्रेक घेतला आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यादरम्यान अनेक राजकीय नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राऊत लवकरच बरे होऊन परततील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आम्ही दररोज राऊत यांच्या संपर्कात असतो; पण हल्ली मी त्यांना रोज फोन करत नाही, त्यांच्या तब्येतीबद्दल सुनील राऊत यांना छळत असतो. संजय यांना खूप दिवसांपासून भेटायचे होते आणि आज योगायोगाने त्यांना भेटून चांगले वाटले. संजय राऊत हातात तलवार घेऊन पुन्हा एकदा मैदानात दिसतील”, असेही ठाकरेंनी यावेळी सांगितले.