After Bankipur Loss What Next For BJP : गेल्या वर्षीच्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले. नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे असतानाही पाटण्यातील चारही शहरी मतदारसंघावर भाजपाचेच वर्चस्व होते. मात्र, सोमवारी जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी त्यातील बांकीपूर हा मतदासंघ सत्ताधाऱ्यांकडून हिरावून घेतला. पोटनिवडणुकीतील या पराभवामुळे भाजपामध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून येते. या पराभवामुळे पक्षाला केवळ सामाजिक समीकरणांवर अवलंबून न राहता नव्याने रणनीती आखण्याची तातडीची गरज असल्याचे भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

सुरुवातीच्या काळात जनता दल युनायटेडचे नेते व माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सामाजिक आघाडीच्या बळावर भाजपाने बिहारमध्ये आपले राजकीय स्थान मजबूत केले. गेल्या दशकभरातही पक्षाने आपल्या पारंपारिक सवर्ण मतदारांबरोबरच यादवेत्तर इतर मागासवर्गीय आणि अति मागास समाजाला आपल्याकडे खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. विविध समाजघटकांतील नेत्यांना उमेदवारी देणे, त्यांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक प्रतिनिधित्व वाढवणे, या माध्यमातून भाजपाने आपला जनाधार विस्तारला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांनी बूथस्तरापर्यंत मजबूत संघटन उभारले. पूर्णवेळ प्रचारकांची नियुक्ती, ग्रामीण भागात सातत्यपूर्ण प्रचार मोहीम आणि बूथस्तरावर प्रभावी संपर्क यंत्रणा उभारण्यात पक्षाने मोठी मेहनत घेतली.

केंद्रात सत्तेत असल्यामुळे उपलब्ध आर्थिक आणि संघटनात्मक संसाधनांचाही भाजपाला बिहारमध्ये मोठा फायदा झाला आणि त्यामुळे पक्षाला इतर प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळवता आली. मात्र, बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र भाजपाची ही सामाजिक समीकरणे आणि संघटनात्मक ताकद निष्प्रभ ठरली. त्यामुळे पराभवाची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे हे पक्षासमोरील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. निवडणूक रणनीतीचा प्रर्दीघ अनुभव असलेल्या प्रशांत किशोर यांनी जाती आणि धर्माच्या पारंपरिक राजकीय विभागणीला प्रभावीपणे निष्प्रभ केले. त्यांनी विविध समाजघटकांमध्ये समान स्वीकारार्हता निर्माण केली आणि त्याचा थेट परिणाम भाजपाच्या पारंपरिक मतदारांवर झाला. विशेषतः सवर्ण समाजातील काही मतदार विविध कारणांमुळे सत्ताधाऱ्यांवर नाराज असल्याचे दिसून आले. याच नाराजीमुळे पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडल्याचे सांगितले जाते. या बदलाचा थेट फायदा प्रशांत किशोर यांना झाला आणि त्यांनी भाजपाचा दीर्घकाळचा बालेकिल्ला असलेला बांकीपूर मतदारसंघ जिंकण्यात यश मिळवल्याचे मानले जाते.

पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपाच्या अंतर्गत चर्चेत सर्वप्रथम मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाचा मुद्दा समोर येत आहे. कुशवाहा या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातून येणाऱ्या सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पक्षाच्या पारंपरिक सामाजिक समीकरणांवर त्याचा परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओबीसी, अतिमागासवर्गीय आणि सवर्ण समाज यांना एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, सम्राट चौधरी यांना नितीश कुमार यांच्यासारखी सर्वसमावेशक स्वीकारार्हता मिळवण्यात अपेक्षित यश आलेले नाही. याशिवाय, सवर्ण समाजामध्ये इतर काही मुद्द्यांवरही नाराजी वाढल्याचे सांगितले जाते. विद्यापीठ परिसरातील जातीय भेदभावासंदर्भातील (सध्या स्थगित करण्यात आलेल्या) यूजीसी नियमांपासून ते विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांपर्यंत अनेक मुद्द्यांमुळे सवर्ण आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या घटनांचा फटका ओबीसी आणि दलित तरुणांप्रमाणेच सवर्ण समाजातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे.

याच पार्श्वभूमीवर अलीकडील आंदोलनांमध्ये भाजपाचा पारंपरिक मतदारवर्ग मानल्या जाणाऱ्या अनेक सवर्ण तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या घडामोडींमुळे पक्षाची चिंता वाढली आहे. या परिस्थितीनंतर भाजपा आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा विश्वासात घेण्यासाठी प्रचाराची दिशा आणि राजकीय संदेश नव्याने ठरवण्याची शक्यता आहे. त्यांच्या नाराजीचे निराकरण करण्यासाठी पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बांकीपूर मतदारसंघात सवर्ण मतदारांची संख्या लक्षणीय असून, त्यांनी पर्यायी राजकीय पर्याय स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. मात्र, सवर्ण समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी आणि अतिमागासवर्गीय समाजातील मतदार भाजपावर नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही सामाजिक गटांमध्ये समतोल राखण्याचे मोठे राजकीय आव्हान आता सत्ताधाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे पक्षाचे निवडणूक व्यवस्थापन आणि बूथस्तरीय संघटन अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरले नाही. जनसुराज पक्षाने राबवलेल्या थेट जनसंपर्क मोहिमेसमोर भाजपाची पारंपरिक निवडणूक यंत्रणा निष्प्रभ ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने गल्लीबोळांतील बैठका, घराघरांत भेटी आणि थेट मतदारांशी संवाद यावर भर दिला. त्यामुळे पक्षाला बदलाचा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. याउलट, भाजपाचा प्रचार तुलनेने पारंपरिक, एकसुरी आणि मतदारांच्या अपेक्षांपासून दूर असल्याचे चित्र निर्माण झाले. पक्षाने स्थानिक पातळीवर अपरिचित मानल्या जाणाऱ्या उमेदवाराला मैदानात उतरवल्याने मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह निर्माण झाला नाही. तसेच प्रचारात नवीन संदेश किंवा वेगळी दिशा नसल्याची टीकाही झाली. त्यातच बांकीपूरला सातत्याने आपला अभेद्य गड म्हणून संबोधण्याची भाजपाची भूमिका अनेक मतदारांना अहकारांसारखीच वाटली. प्रशांत किशोर यांनी प्रचारादरम्यान याच मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य करत गड किल्ला कोणत्याही पक्षाचा नसतो, तो जनतेचा असतो, असा संदेश दिला आणि त्याचा राजकीय फायदा उचलला. गेल्या अनेक वर्षांत सलग विजय मिळवून देणारी भाजपाची निवडणूक यंत्रणा बांकीपूरमध्ये अपयशी का अपयशी, याचा आता पक्षातील नेत्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.