BJP Win Jammu Kashmir Bypoll Election : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार मुसंडी मारली. या निकालाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली असतानाच भाजपाने जम्मू-काश्मीरमध्येही ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नागरोटा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार देवयानी राणा विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ४२ हजारहून अधिक मताधिक्याने मतांनी पराभव केला आहे. या पराभवामुळे जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या देवयानी या भाजपाचे दिवंगत आमदार देवेंद्र राणा यांच्या कन्या आहे.
२०२४ मध्येही मिळवला होता विजय
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने नागरोटा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यावेळी देवेंद्र राणा यांनी तब्बल ३० हजार ४७२ मताधिक्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराचा पराभव केला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स पक्ष सत्तेत असल्याने या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. ही पोटनिवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांच्या लोकप्रियतेची कसोटी मानली जात होती. कारण, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपाने या भागात विजय मिळवला होता; विधानसभा निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते.
नॅशनल कॉन्फरन्स पक्षासमोरील अडचणी वाढल्या
नागरोटा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचे मताधिक्य किंचित कमी झाले असले तरी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा जनाधार ढासाळल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे, काँग्रेसने ऐनवेळी या निवडणुकीतून माघार घेत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तरीदेखील भाजपाने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नॅशनल कॉन्फरन्सला मोठा धक्का दिला आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, या निकालामुळे सत्ताधारी पक्षासमोरील अडचणी वाढणार आहेत. कारण, गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने काँग्रेसला दोन सुरक्षित जागांपैकी एक जागा सोडण्यास नकार दिला होता. तेव्हापासून सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले आहेत.
आणखी वाचा : बिहारमधील मुस्लीम बहुल भागात एनडीएची सरशी; महाआघाडीला कशामुळे बसला फटका?
राज्यसभा निवडणुकीत काय घडले होते?
जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने अपेक्षेप्रमाणे तीन जागांवर विजय मिळवला होता; तर भाजपाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत एक जागा जिंकली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ २८ आमदारांचे संख्याबळ होते. तरीदेखील सत्ताधाऱ्यांची चार मते फोडत भाजपाने ही जागा आपल्याकडे खेचून आणली. या निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमधील इतर राजकीय पक्षांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षावर टीकेची झोड उठवली होती. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि भाजपाच्या पक्षश्रेष्ठींमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप काहींनी केला होता.
राज्यसभेचा निकाल कसा फिरला होता?
राज्यसभेसाठीच्या या निवडणुकीत आमदारांच्या संख्याबळाचे समीकरण अत्यंत गुंतागुंतीचे होते. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सकडे मित्रपक्षांसह (काँग्रेस, सीपीआय-एम आणि अपक्ष) अशा एकूण ५३ आमदारांचे संख्याबळ होते. त्या संख्याबळानुसार पहिल्या तीन जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ३० मतांपेक्षा जास्त मते सत्ताधाऱ्यांकडे होती; तर चौथी जागा जिंकण्यासाठी त्यांना भाजपा सोडून इतर विरोधी पक्षांच्या सात मतांची आवश्यकता होती. दुसरीकडे भाजपाकडे २८ आमदारांचे संख्याबळ होते; तर इतर विरोधी पक्षांमध्ये पीडीपीकडे तीन, पीपल्स कॉन्फरन्स पक्षाकडे एक आणि इतर दोन अपक्ष आमदारांचे संख्याबळ होते.
नॅशनल कॉन्फरन्सचा कसा झाला पराभव?
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी केवळ नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आणि भाजपानेच उमेदवार उभे केले होते आणि त्यामुळे दोन्ही बाजूंना इतर विरोधी पक्षांच्या समर्थनाची आवश्यकता होती. पीपल्स कॉन्फरन्स पक्षाचे आमदार सज्जाद लोन यांना वगळता सर्व पक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे चारही उमेदवार सहजपणे निवडून येतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांसह राजकीय पक्षांनी बांधला होता. मात्र, निकालानंतर सर्वांचेच अंदाज फोल ठरल्याचे दिसून आले. शुक्रवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ९० पैकी एकूण ८६ आमदारांनी मतदान केले होते.
पहिल्या तीन जागांवर सत्ताधाऱ्यांची सरशी
पहिल्या तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार निवडून आले. चौथ्या जागेसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि सरतेशेवटी भाजपाने ही जागा आपल्याकडे खेचून आणली. भाजपाचे उमेदवार सत शर्मा यांना ३२ मते; तर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार इम्रान डार यांना २२ मते मिळाली. विशेष बाब म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सला जी सात मते मिळण्याची आशा होती; परंतु त्यापैकी चार मते भाजपाच्या बाजूने पडली आणि त्यामुळेच सत शर्मा यांना मिळालेल्या मतांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली. उर्वरित तीन मते अवैध घोषित करण्यात आली. या विजयानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सत शर्मा यांच्यासह भाजपा आमदारांचे अभिनंदन केले.
हेही वाचा : बिहारमधील मुस्लीम बहुल भागात एनडीएची सरशी; महाआघाडीला कशामुळे बसला फटका?
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या निकालानंतर पक्षाच्या चौथ्या उमेदवाराच्या पराभवाचे कारण ‘विश्वासघात’ असल्याचे म्हटले होते. शेवटच्या क्षणी काही आमदारांनी आम्हाला दगा दिला. भाजपाला ही चार अतिरिक्त मते कुठून मिळाली? कोणत्या आमदारांची मते अवैध ठरवण्यात आली, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते. नॅशनल काँग्रेस पक्षातील उमेदवारांनी कुठल्याची प्रकारची क्रॉस-व्होटिंग केली नसल्याचे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रतिक्रियेतून बिगर-भाजपा विरोधी पक्षाच्या आमदारांकडून किंवा मित्रपक्षांकडून दगाफटका झाल्याची भावना दिसून येत होती.
भाजपाने घेतला पराभवाचा बदला
राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराचा पराभव हा विश्वासघातामुळे झाल्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले असले तरी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत क्रॉस-व्होटिंग होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एप्रिल २०११ मध्ये काश्मीरमध्ये विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीतही भाजपाच्या ११ पैकी तब्बल सात आमदारांनी पक्षाचा व्हिप झुगारून नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराला मतदान केले होते. परिणामी, निवडणुकीत केवळ चारच मते मिळाल्याने भाजपाचे उमेदवार ठाकूर रणजित सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
