Mahayuti Alliance Internal Rift : महापालिका निवडणुकांचा गुलाल फिका पडताच राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यादरम्यान सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरंच महायुतीला गरज आहे का, असा प्रश्न भाजपाच्या गोटातील काही नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने समाधानकारक कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मात्र पक्षाला मोठे अपयश आले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबरोबर आघाडी करूनही पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज असली तरी अजित पवार यांच्या पक्षाविषयी मात्र अस्वस्थता वाढताना दिसून येत आहे.

भाजपाची नेमकी रणनीती काय?

आगामी काळात भाजपाने केवळ मित्रपक्षांवरच अवलंबून न राहता, तळागातील आपल्या संघटन विस्तारावर भर द्यायला हवा, असे पक्षातील एका गटाचे मत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून भाजपामधील सध्याची मतांची टक्केवारी सुमारे २६ टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यात स्वबळावर सत्तेत येण्यासाठी पक्षाला आणखी १० ते १५ टक्के मतांची आवश्यकता आहे. ही मते मिळविण्यासाठी भाजपाने तळागातील संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रित करायला हवे, अशी भूमिका काहींनी मांडली आहे. आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कोणतीही निवडणूकपूर्व युती करणार नसल्याची माहिती भाजपातील अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

आणखी वाचा : मी चहावाला ही तर मोदींची ड्रामेबाजी; काँग्रेस अध्यक्षांच्या विधानावर भाजपाचा संताप; नेमकं काय घडलं?

अजित पवार यांच्याविषयी नाराजी?

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, ५१ टक्के मतांपर्यंत पोहोचणे हे पक्षाचे अंतिम ध्येय आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी यापुढे आमची कोणतीही युती होणार नाही. शिंदे गटाबरोबरची युती कायम ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय पुढील साडेतीन वर्षांत दोन्ही पक्षांमधील संबंधांवर अवलंबून असेल. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी भाजपाच्या एका गटातून तळागाळातील संघटन आणखीनच मजबूत करण्याच्या प्रयत्न सुरू आहे. १० वर्षांपासून भाजपाचे अनेक नेते अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. या नाराजीचे कारण बहुचर्चित सिंचन घोटाळ्यातील आरोपांमध्ये दडलेले आहे.

भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची भूमिका काय?

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी राज्यातील भाजपाचा एक गट इच्छुक असला तरीही त्यांच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाची भूमिका वेगळी आहे. भविष्यात अजित पवार व शरद पवार एकत्र आल्यास त्यांच्याशी संवादाचे मार्ग उघडे ठेवण्याच्या सूचना भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राज्यातील भाजपाच्या दुसऱ्या गटाचीही हीच भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. युतीचे राजकारण पूर्णपणे नाकारता येत नाही, असे मत भाजपाच्या एका नेत्याने मांडले. जर शरद पवार यांचा गट अजित पवार यांच्या पक्षात विलीन झाल्यास त्याचा भाजपाला मोठा फायदा होईल. कारण- शरद पवार यांच्या गटाकडे सध्या आठ खासदार आहेत. त्यांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपाचे एकनाथ शिंदे यांच्यावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. भाजपाकडे सर्वाधिक आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना अजूनही मुख्यमंत्रिपदाची आस आहे. त्यावरून शिंदे गट व भाजपामध्ये सातत्याने वाद होत असल्याची कबुली या नेत्याने दिली आहे.

भाजपा शिंदे गटालाही बाजूला सारणार?

राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा व शिंदे गटात पदाधिकाऱ्यांच्या फोडफोडीवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीत काही ठिकाणच्या मैत्रीपूर्ण लढतीत हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला. त्याच कारणामुळे भाजपाने स्वबळावर स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे भाजपातील नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना ही वैचारिकदृष्ट्या भाजपाच्या हिंदुत्ववादी विचारांशी सुसंगत आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याबरोबरचा युतीचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे भाजपाच्या नेत्याने स्पष्ट केले.

हेही वाचा : १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? आंध्रप्रदेश सरकारचा ऑस्ट्रेलियन पॅटर्न; अडचणी काय?

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय सुनील तटकरे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला महत्त्वाची माहिती दिली. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत मी फार काही बोलू शकत नाही. कारण- हा निर्णय बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असणार आहे. सध्या आम्ही केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असून, यापुढेही राहणार आहोत. भविष्यात जर विलीनीकरणाची शक्यता निर्माण झाली, तर त्याबाबतचा निर्णय परिस्थिती बघून घेतला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींवरही त्यांनी भाष्य केले.

विभाजन ही केवळ राजकीय तडजोड?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजपाला लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून दिली होती. त्या संदर्भात बोलताना हा विषय आता संपलेला आहे. निवडणुकांमध्ये अशा गोष्टी घडत असतात, असे म्हणत तटकरे यांनी या वादावर पडदा टाकला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने धक्कादायक दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पूर्वीही एकच पक्ष होता आणि आजही आहे. ही फूट म्हणजे केवळ एक राजकीय तडजोड आहे. आपली पारंपरिक मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही गट शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत, असे या नेत्याने स्पष्ट केले आहे.