मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणूक पार पडल्यावर सर्व पालिकांमधील महापौरपदाची निवड झाली असून, सर्वाधिक २० महापौर हे भाजपचे निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे तीन तर काँग्रेस व ठाकरे गटाला प्रत्येकी एक महापौरपद मिळाले आहे.
राज्यातील रखडलेल्या २९ महानगरपालिकांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या महिन्यात पार पडली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महापौरपदाची निवडणूक पार पडली. सर्वात शेवटी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली.
२९ पैकी भाजपचे सर्वाधिक २०, शिवसेना शिंदे गटाचे तीन तर अजित पवार गटाचा एक असे महायुतीचे २४ महापौर निवडून आले आहेत. विरोधकांमधील काँग्रेस, शिवसेनेला (ठाकरे) प्रत्येकी एक महापौरपद मिळाले आहे. वसईत हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी, मालेगावमध्ये इस्लाम पार्टी तर भिवंडीत भाजपचा बंडखोर महापौरपदी निवडून आला.
शिंदे ठाण्यापुरतेच मर्यादित
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका निवडणुकीत राज्यात दुसरा क्रमांक पटकविला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर अशा ठाणे जिल्ह्यातील तीन महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाचे महापौर निवडून आले. शिंदे गटाला राज्यात अन्यत्र कुठेही महापौरपद मिळालेले नाही. भाजपने शिंदे गट अधिक वाढणार नाही याचीच खबरदारी घेतली. भिवंडीत सत्तेसाठी अंकगणित जुळवून आणण्याचा शिंदे प्रयत्न करीत असताना भाजपने त्यात खो घातल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत आहे. अजित पवार गटाला अहिल्यानगरचे महापौरपद मिळाले आहे.
काँग्रेसला लातूरमध्ये बहुमत मिळाले होते. चंद्रपूर व भिवंडीमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही महापौरपद मिळू शकले नाही. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाने काँग्रेसला धक्का दिला. पण परभणीमध्ये ठाकरे गटाला मदत करून काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला.
नगरपालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले होते. यापाठोपाठ सर्वाधिक महापौर भाजपचे निवडून आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या १२ जिल्हा परिषदांमध्येही अधिक अध्यक्षपदे जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच जोर लावला आहे.
भाजपचे महापौर निवडून आलेल्या महानगरपालिका :
मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, जालना, इचलकरंजी, नाशिक, धुळे, जळगाव, मीरा-भाईंदर, पनवेल, नांदेड – वाघाळा, सांगली
शिवसेना शिंदे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर
राष्ट्रवादी अजित पवार : अहिल्यानगर
काँग्रेस : लातूर
शिवसेना ठाकरे : परभणी
बहुजन विकास आघाडी : वसई
इस्लाम पार्टी : मालेगाव
भाजप बंडखोर : भिवंडी-निजामपूर
