भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना भाजपाने तिकीट नाकारले आहे. तब्बल सहा वेळा खासदार राहिलेले ब्रिजभूषण सिंह यांना उमेदवारी नाकारल्यामुळे महिला कुस्तीपटूंचे प्रकरण भोवले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघात कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा धाकटा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करण भूषण सिंह कोण आहेत?

२८ वर्षीय करण भूषण सध्या उत्तर प्रदेश रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांना या पदासाठी नियुक्त करण्यात आले होते. ते राष्ट्रीय स्तरावरील ट्रॅप शूटरदेखील आहेत. त्यासह, करण भूषण हे नवाबगंजमधील सहकारी ग्राम विकास बँकेचेही अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे ही त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे. कैसरगंज आणि जवळपासच्या भागात ब्रिजभूषण शरण सिंह यांचा असणारा प्रभाव कमी होणार नाही याची खात्री करत, भाजपाने इतरांना तिकीट न देता त्यांच्या मुलालाच उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : लिंगायत समाज प्रल्हाद जोशींवर नाराज, धारवाडमध्ये भाजपा अडचणीत?

भाजपाने ब्रिजभूषण सिंह यांना डावलले

भाजपाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर देशातील आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी दिली असती, तर अशा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला मैदानात उतरवल्याबद्दल विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागले असते. पक्षाच्या कर्नाटक सहयोगी जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे हसन येथील खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे पक्ष आधीच अडचणीत आला आहे. त्यामुळे परिस्थिती विचारात घेऊन भाजपाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर देशातील आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मुलाला उमेदवारी देण्याचे कारण काय?

कैसरगंजच लोकसभा मतदारसंघात आणि आजूबाजूच्या भागात ब्रिजभूषण सिंह यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना तिकीट नाकारल्याचा परिणाम कैसरगंज, श्रावस्ती, बस्ती आणि अयोध्या या लोकसभेच्या किमान सहा जागांवर झाला असता. त्यामुळेच ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. सहा वेळा खासदार राहिलेल्या ब्रिजभूषण सिंह यांनी भाजपाच्या तिकिटावर पाच वेळा, तर सपाच्या तिकीटावर एकवेळा कैसरगंज ही जागा जिंकली आहे. ते बहराइच, गोंडा, बलरामपूर, अयोध्या आणि श्रावस्ती जिल्ह्यात स्थापन केलेल्या अभियांत्रिकी, फार्मसी, शिक्षण, कायदा आणि इतर ५० हून अधिक शैक्षणिक संस्थांशी सक्रियपणे संबंधित आहेत. त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या गरीब विद्यार्थ्यांना फी माफी देण्यासाठी सिंह ओळखले जातात. गरजू आणि गरिबांची मदत करणारे, अशी त्यांची प्रतिमा आहे.

सिंह यांचा रामजन्मभूमी चळवळीतदेखील सक्रिय सहभाग होता. त्यांच्या २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार बाबरी मशीद प्रकरणात त्यांचे नाव होते. त्यांना अयोध्येतील पुजारी वर्गाचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. लैंगिक छळाचे आरोप असूनही त्यांच्या परिसरात त्यांच्या प्रतिमेला धक्का लागलेला नाही.

भाजपसाठी विचारात घेण्यासारखा दुसरा घटक म्हणजे, उत्तर प्रदेशातील ठाकूर समाजातील नाराजी. सिंह हे उत्तर प्रदेशमधील प्रमुख ठाकूर नेते आहेत. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने ठाकूर समाज नाराज झाला असता. समाजातील नेत्यांना तिकीट न मिळाल्याने भाजपाला पश्चिम आणि उत्तर प्रदेशच्या इतर भागांमध्ये समाजातील काही घटकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. सिंह यांना तिकीट नाकारल्यास विरोधी पक्षांच्या व्होट बँकेत ठाकूर मते जोडली गेली असती.

हेही वाचा : मोदींच्या मायभूमीत क्षत्रिय समाजाच्या नाराजीमुळे भाजपाचा विजय कठीण?

गोंडा येथील भाजप नेत्याने सांगितले की, पक्ष पुर्णपणे ब्रिजभूषण यांना तिकीट नाकारू शकला नाही याचे तिसरे कारण म्हणजे, भाजपाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने त्यांना मतदारसंघातून उमेदवारी दिली असती. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने सांगितले की, सपाने गुरुवारी संध्याकाळपर्यंत उमेदवार उभा न केल्याने भाजपाच्या चिंतेत भर पडली. सपाने भाजपा उमेदवार जाहीर होण्याची वाट बघितली. जर ब्रिजभूषण यांच्या कुटुंबात भाजपाने तिकीट दिले नसते, तर सपा ब्रिजभूषण सिंह यांना पक्षात सामील करून उमेदवारी देईल, अशी शक्यता होती. आजपर्यंत, अखिलेश ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांवर मौन बाळगून आहेत, तर इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणावरून वारंवार भाजपावर टीका केली आहे आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp dropped brij bhushan sing from kaisarganj rac
First published on: 03-05-2024 at 11:36 IST