BJP Zilla Parishad results राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत महायुतीचा दणदणीत विजय झाला. या निकालात भाजपाने स्पष्ट आघाडी घेत ग्रामीण भागात आपली पकड मजबूत केली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांनी बहुतांश जागांवर एकाच चिन्हावर निवडणूक लढवल्याचा त्यांना मोठा फायदा मिळाल्याचे दिसून आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१ जागांपैकी भाजपाने २२५ जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १६५ जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला १६२ जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने ४३ जागा जिंकल्या आहेत. भाजपा आणि अजित पवार गटाला मिळालेल्या यशाची कारणे काय आहेत? समजून घेऊयात…
जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही आठवड्यांतच हे निकाल आल्याने राष्ट्रवादीसाठी हे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यांच्या निधनामुळे दोन्ही पक्षांमधील विलीनीकरणाच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. दुसरीकडे १२ पैकी सहा जिल्हा परिषदा आणि १२५ पैकी ५० पंचायत समित्या जिंकणाऱ्या भाजपाने राज्याच्या ग्रामीण भागात आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. आतापर्यंत हे ग्रामीण भाग राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात होते.
“भाजपाने महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. हा जनादेश ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांनी दिलेला कौल दर्शवतो,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच त्यांनी महायुतीचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी केल्याचे म्हटले. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, परभणी, सिंधुदुर्ग, सातारा व धाराशिवमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे; तर पुणे आणि कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकांशी याची तुलना केल्यास, तेव्हा ७२७ जागांपैकी भाजपाने १४१, एकत्रित राष्ट्रवादीने २१७ आणि एकत्रित शिवसेनेने १४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला १२६ जागा मिळाल्या होत्या;, तर इतरांनी ७२ जागा जिंकल्या होत्या. तसेच २३ अपक्ष उमेदवारही निवडून आले होते. २०१७ च्या पंचायत समिती निवडणुकांत भाजपाने १२५ पंचायत समित्यांमध्ये २८४ जागा जिंकल्या होत्या.
राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरलेले घटक?
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याचा आणि इतर किमान १० जिल्ह्यांमध्ये जागावाटपाचा समन्वय साधण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. त्यामुळे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद पुन्हा वाढण्यास मदत झाली आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान झालेले निर्णय अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमधील अधिकृत विलीनीकरणाची पूर्वसूचना मानली जात होती. शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितले होते की, जिल्हा परिषद निकाल जाहीर झाल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची घोषणा केली जाईल.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतांचे विभाजन झाल्यामुळे दोन्ही पक्षांची राजकीय ताकद कमी होत आहे, हे ओळखून अजित पवार यांनीच युती आणि विलीनीकरणासाठी पुढाकार घेतला होता. आता पश्चिम महाराष्ट्रातील निकालांनी हेच सिद्ध केले आहे. “एकत्र निवडणूक लढवण्याचा किंवा जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाने घेतला होता आणि याचा पक्षाला मोठा फायदा झाला,” असे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या एका आमदाराने सांगितले.
पुण्यात ७३ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत ४० पेक्षा जास्त जागा जिंकून राष्ट्रवादी हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. आंबेगावमधील काही ‘फ्रेंडली फाईट’ वगळता दोन्ही गटांनी ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवली. या रणनीतीमुळे मतांचे एकत्रीकरण झाले आणि बहुमत मिळाले. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमधील अपयशानंतर दोन्ही पक्षांमधील चर्चांना वेग आला होता. पुणे जिल्ह्यात यासाठी प्रयोगही करण्यात आले होते. जानेवारीत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही गट ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले होते.
असाच प्रयोग कोल्हापूरमध्येही यशस्वी झाला. कोल्हापूरमध्ये ६८ सदस्यीय जिल्हा परिषदेत २० जागा जिंकत राष्ट्रवादी सर्वांत मोठा पक्ष ठरला. तिथे काँग्रेसला १५, भाजपाला १३ व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. सांगलीत अधिकृत युती नसली तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी परस्पर संमतीने जागा लढवल्या. तिथे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने १९ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. त्यानंतर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या.
सांगलीत भाजपाने १५ आणि राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या. या ठिकाणी काँग्रेसच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी (शरद पवार) गट सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादीने मित्रपक्षांशी समन्वय राखत १८ जागा जिंकल्या आणि दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला. एकूण चित्र बघितल्यास ग्रामीण निवडणुकांमधील अजित पवारांचा समन्वय आणि रणनीती पक्षाची स्थिती मजबूत करण्यात यशस्वी ठरली आहे.
भाजपाच्या विजयाची कारणे काय?
छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, परभणी, सिंधुदुर्ग, सातारा व धाराशिवमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला; तर रायगड व रत्नागिरीत शिवसेनेने विजय मिळवला. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निकालाने पक्षाची संघटनात्मक शक्ती पुन्हा सिद्ध केल्याचे म्हटले. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दांचा उल्लेख केला आणि म्हणाले, “भाजपाचा कार्यकर्ता कधीच हरत नाही, तो एक तर जिंकतो किंवा शिकतो.”
स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी गावे, शहरे आणि महानगरांच्या विकासावर भर दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमधील नियोजित ३० सभा रद्द केल्या होत्या. तरीही त्यांनी पक्षाच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. भाजपाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कार्यकर्त्यांना जिल्ह्यांच्या दौऱ्यावर पाठवले होते. “आमच्याकडे बूथपासून राज्य स्तरापर्यंत समर्पित फळी आहे. लोकसभा असो किंवा पंचायत समिती, आमचा कार्यकर्ता त्याच उत्साहाने काम करतो,” असे चव्हाण म्हणाले.
दुसरीकडे, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची कामगिरी खराब राहिली. त्यामुळे हा निकाल महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मराठा आरक्षणाच्या असंतोषाचा फायदा घेऊन भाजपाला रोखण्यात यश येईल, अशी आशा महाविकास आघाडीला होती. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात निकालाचे चित्र काही वेगळे असेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, ७३१ पैकी काँग्रेसला केवळ ५५, शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४३ व राष्ट्रवादीला (शरदचंद्र पवार) २६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

