BJP’s Expansion Plans in Mumbai–Thane : मुंबईत ठाकरे बंधूसोबत दोन हात करायचे असतील तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह असे दोन्ही सोबत हवेत, हे लक्षात आल्याने अखेर भाजपने मुंबईसह ठाण्यातही महायुतीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर मुंबई महानगर प्रदेशात विशेषतः ठाणे पट्ट्यात पक्षाची ताकद वाढविण्याची ही उत्तम संधी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांनी आधीपासूनच हेरले आहे.
‘ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला’ हे समीकरण शिंदे यांच्या काळातही पुढे सुरूच ठेवायचे की तिरक्या चालीने ‘शतप्रतिशत’च्या दिशेने वाटचाल करायची, असे दोन पर्याय भाजपपुढे आहेत. त्यातूनच चव्हाणांच्या कल्याण-डोंबिवलीत शिंदे यांचे पंख छाटण्याची रणनिती आखली गेली. नवी मुंबईत गणेश नाईक शिंदे यांना जुमानायला तयार नाहीत. ठाण्याचा बदलता सामाजिक तोंडवळा पाहता तेथेही शिंदेंना आव्हान उभे करता येऊ शकेल अशी चाचपणी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सुरू केली होती. मात्र दिल्लीतील ‘महाशक्ती’ यंदाही शिंदे यांच्या मदतीला धावून आल्याचे सध्या तरी दिसते आहे. मुंबईत ठाकरेंचा हिशेब होईपर्यंत तरी शिंदे यांना दिलासा मिळाला असेच सध्या तरी म्हणता येईल.
मुंबईत सुरुवातीपासूनच भाजप आणि शिंदे या दोन पक्षांत युतीचे वारे वाहताना दिसतात. मुंबईतील शाखा-शाखांमधून अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जाळे आहे, शिवाय राज यांच्या मदतीमुळे भाजपला मुंबईचा सामना अजूनही सोपा नाही. त्यामुळे मुंबईत भाजपला शिंदे हवेच आहेत. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सहा आमदार आहेत. मागाठाणे, चेंबूर, कुर्ला, चांदिवली, भांडूप, अंधेरी या भागांत शिंदे यांचे आमदार आहेत, तर दादर, वरळी, शिवडी येथेही शिंदे यांनी उद्धव यांच्याकडील काही माजी नगरसेवक यापूर्वीच गळाला लावले आहेत.
मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात शिंदे आणि ‘धनुष्यबाण’ दोघांचाही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो असे भाजपला वाटते. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे यांना सोबत घेण्याविषयीची भाजपची अपरिहार्यता वाढलेली दिसते. याचा राजकीय फायदा शिंदे यांनी ठाणे या आपल्या घरच्या मैदानात भाजपबरोबर बोलणी करताना करून घेतलेला दिसतो. नगरपालिका निवडणुकीत एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केल्यानंतर ठाणे, डोंबिवलीत संयमाने घ्यावे लागेल, अन्यथा त्याचा फटका मुंबईत बसेल, हे ‘महाशक्ती’ला पटवून देण्यात शिंदे तुर्तास यशस्वी ठरल्याचे दिसते आहे. त्यामुळे फडणवीस-चव्हाणांची मोठी अडचण झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
ठाण्यात भाजप वाढणार कधी ?
राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडताना निर्णायक भूमिका बजाविल्यापासूनच शिंदे दिल्लीतील ‘महाशक्ती’च्या गळ्यातील ताईत झाल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक, त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्याची एकही संधी शिंदे पिता-पुत्र सोडत नाहीत. शिंदे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लोकसभेत भाजपचे खासदार वाटावेत अशा त्वेषाने काँग्रेसवर, अगदी गांधी-नेहरूंच्या धोरणांवरही टीका करताना दिसतात. ‘माझा पक्ष जरी वेगळा असला तरी मी तुमच्यापासून वेगळा नाही’ हे पटवून देण्यात शिंदे सध्या तरी भाजपच्या वरिष्ठांना यशस्वी ठरल्याचे दिसते. त्यातूनच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांची अडचण झालेली दिसते.
विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री पद भाजपकडे आले आहे. शिंदेच्या ठाणे, डोंबिवली, कल्याणात भाजपला वाढीची उत्तम संधी आहे. खरे तर २०१४ पासूनच हा संपूर्ण पट्टा हळूहळू भाजपमय होण्याच्या मार्गावर आहे. ठाणे जिल्ह्यात १८ पैकी सर्वाधिक १० आमदार भाजपचे आहेत, शिवाय शहरी-ग्रामीण अशा दोन्ही भागांत भाजप वाढताना दिसतो. गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईसारखा महत्त्वाचा टापू भाजपने शतप्रतिशत ताब्यात घेतलेला पाहायला मिळतो. तिसरी मुंबई, विमानतळसारखे मोठे प्रकल्प असलेल्या पेण, पनवेल, उरण, खोपोली या रायगड पट्ट्यातही भाजपने जम बसविला आहे.
तेथील शेतकरी कामगार पक्ष खिळखिळा करून या पक्षाचे प्रमुख ताकदवान नेते एव्हाना भाजपने अंकित केले आहेत. असे असताना ठाणे एकनाथ शिंदे यांना आंदण का द्यायचा, असा स्थानिक नेत्यांना पडलेला प्रश्न आहे. युतीच्या राजकारणात पक्षवाढीचा पर्यायच समोर नसेल तर आपले भविष्य काय, असा प्रश्न ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील इच्छुकांपुढे आहे. ‘महाशक्ती’ या टप्प्यावर आपली वाट रोखते आहे, अशा प्रतिक्रिया शुक्रवारपासून स्थानिक पातळीवर उमटू लागल्या आहेत.
युतीची नव्हे, फुटीची दवंडी ?
दिल्लीतील नेत्यांनी डोळे वटारल्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला एक पाऊल मागे घेत शुक्रवारी नागपूरात युतीची घोषणा करावी लागली. कल्याण-डोंबिवलीत अनेक वर्षे चव्हाण दुय्यम भूमिकेत वावरले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना खासदार डॉ. श्रीकांत यांचा कमालीचा प्रभाव या पट्ट्यावर राहिला आहे. डॉ. श्रीकांत हे आक्रमक राजकारणी आहेत. थोरले शिंदे युती टिकावी या मताचे असले तरी डॉ. श्रीकांत मात्र स्वतःच्या पक्षविस्तारासाठी मागेपुढे पाहत नाहीत.
शिंदे यांच्याप्रमाणे त्यांचे राजकारण समन्वयाचे (समझोत्याचे) नाही. त्यामुळे शिंदे यांनी जोडलेले परपक्षातील नेते त्यांच्या मुलाला मात्र पाण्यात पाहतात. युतीच्या घोषणेचा सर्वात मोठा फायदा ठाणे, कल्याणात एकनाथ शिंदे यांनाच होणार आहे. ठाण्यात शिंदे यांच्या पक्षाकडे ८२ माजी नगरसेवक आहेत, तर कल्याणात हा आकडा ६४ च्या आसपास आहे. नवी मुंबईतही ४५ पेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे यांच्याकडे आहेत. विधानसभा, लोकसभेप्रमाणे युतीतील जागावाटप झालेच तर या महापालिकांमध्ये ५५ ते ६० टक्के जागा शिंदे यांच्या पक्षाच्या पदरात पडतील असे चित्र आहे.
ठाण्यात तर ७५ टक्के जागा शिंदे यांना मिळतील; मग आमचा युतीतला वाटा उरतो तरी किती, असा स्थानिक भाजप नेत्यांना पडलेला प्रश्न आहे. कल्याण-डोंबिवलीत जागावाटपात ५०-५० टक्क्यांचे समीकरण असावे असे रविंद्र चव्हाणांना वाटते. डॉ. श्रीकांत सहजासहजी ते मान्य करणार नाहीत. नवी मुंबईत तर गणेश नाईक ४५ जागा सहजासहजी शिंदेंना द्यायला तयारच नाहीत. शिंदेचे नगरसेवक ज्या-ज्या ठिकाणी आहेत तेथे नाईक यांचे समर्थक इच्छुक त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करताना दिसतात.
नवी मुंबईतील शिंदे यांचे समर्थक नेते नाईक सावलीला देखील उभे करत नाहीत. त्यांच्यासाठी युती म्हणून प्रचार करावा लागणे हेच मुळी नाईकांसाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार खाण्यासारखे आहे. आपल्या राजकीय आयुष्याच्या या टप्प्यात नाईक त्यास सहजासहजी मान्यता देतील ही शक्यता फारच कमी आहे. युती करा असा दंडक दिल्लीहून आला असला तरी स्थानिक पातळीवर त्यामुळे होणारी परवड भाजपसाठी घुसमटीची ठरणार आहे. त्यामुळे युतीची ही दवंडी काही प्रभागांमध्ये नक्कीच फुटीची ठरेल, यात मात्र शंका नाही.
