मालेगाव: मुस्लिमबहुल मालेगाव शहराच्या महापौर पदावर आता भाजपचा डोळा आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावात सभा पार पडली. या सभेत भाजपचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘जर कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून काम केले तर, आश्चर्यकारक निकाल लागतील आणि भाजपचा महापौर होईल’, असे विधान केले. भाजप सर्वकाही करु शकते, असे एकूण राजकीय वातावरण असल्याने महाजन यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भौगोलिकदृष्ट्या शहराची दोन गटात विभागणी झाली आहे. मुस्लिम बहुसंख्यांक असलेल्या शहराच्या पूर्व भागात जनता दल, काँग्रेस, तिसरा महाज, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम या पक्षांचा आजवर प्रभाव राहिला आहे. दुसऱ्या बाजूला हिंदू बहुसंख्याक असलेल्या शहराच्या पश्चिम भागात भाजप आणि शिवसेना यांचे प्राबल्य राहिले आहे. सुमारे ७० टक्के नगरसेवक असलेल्या पूर्व भागात परस्परांशी लढणाऱ्या राजकीय पक्षांची देखील दोन गटात विभागणी होते. अशावेळी महापालिकेतील सत्ता समीकरणे जुळविणे आणि जादूई आकडा गाठणे यासाठी त्यातील एका पक्षाला पश्चिम भागातील पक्ष आणि नगरसेवकांशी जुळवून घ्यावे लागणे, हे क्रमप्राप्त ठरते. त्याच अनुषंगाने मागील निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेचे सूत जमले होते. त्यामुळे शिवसेनेला उपमहापौरपद मिळाले होते.

महापालिकेत याआधी काँग्रेसची सत्ता होती. महापालिकेची मुदत संपण्याच्या बेतात असताना महापौरांसह २८ नगरसेवकांना बरोबर घेऊन माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुढे राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर आसिफ शेख यांनी ‘इस्लाम’ पक्षाची स्थापना केली. इस्लाम पक्षाने यावेळी समाजवादी पक्षाबरोबर युती केली आहे. महापालिकेच्या ६४ जागा असलेल्या पूर्व भागात इस्लाम पक्ष ४४ आणि समाजवादी पक्ष २० जागांवर लढत आहे. यातील बहुसंख्य जागांवर या युतीचा सामना एमआयएमशी आणि २२ जागांवर उमेदवार असणाऱ्या काँग्रेसशी होत आहे.

मागील निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या शिवसेना आणि भाजपला अनुक्रमे १३ आणि ९ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीतही भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे उतरले आहेत. भाजपने २६ आणि शिंदे गटाने २४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शहराच्या पश्चिम भागातील २० जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जबरदस्त रस्सीखेच आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजित पवार यांना साथ देण्याऐवजी इस्लाम हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आसिफ यांचे अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. निवडणुकीनंतर राजकीय निकड म्हणून आसिक शेख यांचे अजित पवार यांच्या पक्षाशी ‘सख्य’ होऊ शकते.

अजित पवार यांचा पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे. अशास्थितीत काही तडजोडी व सत्ता समीकरण जुळविण्याचा भाग म्हणून शेख हे बरोबर येण्यासाठी राजी होतील. त्याआधारे महापालिकेत भाजपचा महापौर बसविण्याचा महाजन यांचा प्रयत्न असावा, असा त्यांनी केलेल्या विधानाचा अर्थ काढला जात आहे. शेख यांच्या पक्षाने निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पक्षाशी जुळवून घेतले, असे गृहित धरले तरी स्वतःच्या पक्षाऐवजी भाजपच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालून ते पायावर धोंडा कसा पाडून घेतील, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच गिरीश महाजन हे कोणत्या व्यूहरचनेव्दारे मालेगावचे महापौरपद भाजपकडे आणू शकतात, याची चर्चा सध्या रंगली आहे.