चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात आतापर्यंत ओबीसी हा भाजपचा मुख्य जनाधार असला तरी लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी झालेला पराभव पाहता भाजपने ओबीसी जनाधार गमावल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला पुन्हा जवळ आणण्याचे आव्हान आता भाजपसमोर उभे ठाकले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कुणबी, तेली, माळी, न्हावी, वाढई, शिंपी, सोनार हा बहुजन ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यापाठोपाठ दलित व मुस्लीम समाज आहे. काँग्रेसने कुणबी या बहुसंख्येने असलेल्या समाजाच्या प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिल्याने हा समाज आपसूकच भाजपपासून दूर गेला. मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच ते ज्या समाजातून येतात त्या आर्य वैश्य समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, यासंदर्भात गठित केलेल्या समितीचे पत्र निघाले तथा ही समिती चंद्रपूर जिल्ह्यात दौरा करूनही गेली. आर्य वैश्य समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्यास तीव्र विरोध झाला. परिणामी आर्य वैश्य समाजही भाजपपासून दुरावला.

हेही वाचा…डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा-गोंदिया, काँग्रेस)

काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात कुणबी समाजाचे प्रतिनिधी पदाधिकारी आहेत. तसेच काँग्रेस पक्षाशी परंपरागत एकनिष्ठ असलेला तेली, माळी, न्हावी, शिंपी, सोनार हा समाज गेल्या काही वर्षांत भाजपच्या जवळ आला होता. पालकमंत्री मुनगंटीवार यांची काम करण्याची पद्धत पाहून हा समाज भाजपशी जुळला. मात्र, लोकसभा निवडणुकीत हा समाजही भाजपपासून दुरावला गेला. दलित व मुस्लीम समाजापाठोपाठ ओबीसी समाज भाजपपासून दुर गेल्यामुळे धानोरकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘चारसो पार’ व संविधान बदल हा प्रचार याला कारणीभूत ठरल्याचे प्रकर्षाने जाणवते.

येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला आतापासूनच ओबीसी समाजाला जवळ घेणे आवश्यक ठरते. दलित व मुस्लीम समाजाने यापूर्वीच पाठ दाखवल्याने भाजपकडे ओबीसींशिवाय पर्याय नाही. भाजपला कुणबी व तेली या दोन्ही समाजाला चुचकारावे लागणार आहे. विधानसभेची उमेदवारी देताना या दोन्ही समाजासोबतच दलित समाजाचाही विचार करावा लागणार आहे. दलित समाजातही हिंदू दलित व बौद्ध दलित आहेत. त्यामुळे बहुसंख्येने असलेल्या बौद्ध दलितांनादेखील विश्वासात घ्यावे लागणार आहे.

हेही वाचा…काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले वसंतराव चव्हाण (नांदेड, काँग्रेस)

विशेष म्हणजे, लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. बहुसंख्येने असलेला कुणबी समाज पुन्हा जवळ यावा, यासाठी भाजपला विशेषत्वाने प्रयत्न करावे लागतील. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना राजकीय दृष्ट्या सक्रिय करून दुरावलेल्या ओबीसींना जवळ घेण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.