सांगली : सांगली महापौर व उपमहापौर निवडीसाठी आठ दिवसांचा कालावधी उरला असताना राजकीय पक्षामध्ये पडद्याआड गतीमान हालचाली सुरू आहेत वरकरणी सर्वत्र शांतता दिसत असताना सत्तेचा दावेदार असलेल्या भाजपमध्ये महापौर पदासाठी दावे-प्रतिदावे होत असले तरी त्याला सार्वजनिक होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. यावेळी महापौर पद सर्वसाधारण गटासाठी म्हणजेच खुले असल्याने चुरस दिसत आहे. महापौर पदाचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच घेणार असले तरी याबाबत पक्षात असलेल्या गटबाजीचा त्यांना विचार करावा लागणार आहे. कारण मागील सत्ताकाळात दूध पोळले असल्याने आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये भाजपने ७८ सदस्यांच्या सभागृहात ४१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. या शिवाय कुपवाडमधून अपक्ष निवडून आलेल्या दोन सदस्यांचा पाठिंबाही मिळाला होता. यामुळे भाजपचे सभागृहात ४३ सदस्य होते. असे असतानाही अडीच वर्षानंतर झालेल्या महापौर निवडीवेळी सात सदस्यांनी बंडखोरी केल्याने भाजपचा महापौर, उपमहापौर निवडीत पराभव झाला होता.भाजपचे धीरज सुर्यवंशी यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी हे विजयी झाले होते. यामुळे भाजपची सत्ता गेली असली तरी तिजोरीच्या चाव्या मात्र भाजपकडे राहिल्या होत्या. संख्याबळाच्या आधारे भाजपने सलग पाच वर्षे स्थायी समिती ताब्यात ठेवली होती.

आता सदस्य संख्या बहुमताच्या काठावर आहे. ३९ सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे दोन सदस्य निवडून आले असून त्यांचा पाठिबा सहजासहजी मिळेल असे वाटत असतानाच शिवसेना शिंदे गटाने पाठिंब्याबाबत आपली भूमिका अद्याप अधांतरी ठेवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेच्या गणितात कधीही बाजी मारली जाण्याची टांगती तलवार मानेवर असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने १६ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमकपणा आता कमी झाला आहे. तर काँग्रेसचे १८ सदस्य असले तरी ते सहजासहजी सत्तेचा सोपान गाठतील अशी सध्या तरी स्थिती नाही.

या राजकीय स्थितीमुळे महापौर व उपमहापौर निवडीमध्ये भाजपला आव्हान मिळू शकेल अशी स्थिती महापालिकेत दिसत नाही. तथापि, महापालिकेत निवडून आलेले सदस्य एका विचाराचे असले तरी गटबाजीही आहे. आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी उमेदवारी दिलेले काही जण पराभूत झाले आहेत. आ. गाङगीळ यांचा महापौर निवडीसाठी अतुल माने यांच्यासाठी आग्रह असेल, तर नव्याने भाजपमध्ये आलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या गटाकडून रोहिणी पाटील व संतोष पाटील यांच्या नावाचा आग्रह असेल. तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांचा धीरज सुर्यवंशी यांच्यासाठी आग्रह असेल असे दिसते. तथापि, जर अडीच वर्षाच्या काळात अनेकांना संधी देण्याचा विचार पुढे आला तर सुर्यवंशी राजीनामा देतीलच याची खात्री देता येत नसल्याने पहिल्या टप्प्यात त्यांचे नाव मागे पडू शकते. अतुल माने हे पहिल्यांदाच नगरसेवक झाले असल्याने त्यांच्या नावाचा प्राधान्याने विचार होउ शकेल असे वाटत नाही. महिलांना संधी द्यायचीच ठरले तर श्रीमती पाटील यांच्याबरोबरच स्वाती शिदे यांच्या नावाचाही विचार करावा लागणार आहे.

मिरजेत गेल्या वेळी १२ सदस्य भाजपचे निवडून आले होते. यावेळी यामध्ये घट झाली आहे. आमदार सुरेश खाडे यांची ताकद कमी झाली आहे. यामुळे महापौर निवडीमध्ये त्यांच्याकडून निरंजन आवटी यांच्यासाठी होणारा संभाव्य आग्रह मोडीत निघाला आहे. महापालिकेच्या गटनेते पदी संदीप आवटी यांना संधी देउन भाजपने मिरजेचा महापौरपदावरचा हक्क संपविला आहे. यामुळे आमदार खाडे यांना महापौरपदासाठी दावा करण्याचा प्रश्‍नच आता उरला नाही.

स्थायी समितीत मागील वेळी संख्याबळाच्या ताकदीवर मनमानी करण्याचे प्रयत्न झाले होते. तसे प्रयत्न यावेळी होणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी भाजप नेत्यांना अधिक जागरूक राहावे लागणार आहे. स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ अधिक ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सत्तेतील सहभाग भाजपच्या दृष्टीने महत्वाचा यासाठीच ठरणार आहे. या दृष्टीने प्रयत्न नजीकच्या काळात होतील असे दिसते.