अमरावती: तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सर्वाधिक २५ जागा जिंकूनही भाजपला महापौरपदासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने अखेरच्या क्षणी भाजपची कोंडी केली आणि विजयरथाला लगाम लावण्याचे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला चांगली कामगिरी करता आली नाही. काँग्रेसने काही भागात भाजपला टक्कर देत दुसरे स्थान मिळवले.

एकूण ८७ जागांपैकी गेल्या निवडणुकीत भाजपला ४५ जागा मिळाल्या होत्या. भाजप यावेळी ५० हून अधिक जागा जिंकणार, असा दावा करण्यात येत होता. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाने आधीच वेगळी चूल मांडली होती. शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षासोबत युतीसाठी बोलणी सुरू होती. जागावाटपावरून झालेल्या मतभेदानंतर शिंदे गटही वेगळा झाला. युवा स्वाभिमान पक्षासाठी भाजपने नऊ जागा सोडल्या. पण, पक्षाचे प्रमुख रवी राणांना ते मान्य नव्हते. त्यांना जास्त जागा हव्या होत्या. त्यांनी एकतर्फी ४१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आणि त्यानंतरचा घोळ भाजपला निस्तारला आला नाही. भाजपमध्ये तिकीटवाटपावरून निर्माण झालेला असंतोष. नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ किंवा एका प्रभागात एका ठिकाणी युवा स्वाभिमानला मत द्या आणि उर्वरित तीन ठिकाणी कमळाला मतदान करा, या त्यांच्या आवाहनामुळे तर भाजपचेच कार्यकर्ते संभ्रमात सापडले.

युवा स्वाभिमानची झेप

संपूर्ण गोंधळात युवा स्वाभिमानने स्वहित साधले. युवा स्वाभिमानचे १५ उमेदवार निवडून आले. त्यापैकी काहींनी थेट लढतीत भाजपच्याच उमेदवारांचा पराभव केला. आपली रेष मोठी करण्याच्या प्रयत्नात युवा स्वाभिमानने भाजपची रेष खोडण्याचा केलेला प्रयत्न, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

काँग्रेसने गड राखले

काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यासारखे नेते थेट निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या प्रभागांमध्ये चांगली कामगिरी केली. काँग्र्रेसला १५ जागांवर यश मिळाले. मुस्लीमबहुल भागात एमआयएमने १२ जागा जिंकून काँग्रेसला हादरा दिला. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दोन वेळा अमरावतीत येऊन घेतलेल्या सभांचाही फायदा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुस्लीमबहुल भागातून चांगल्या यशाची अपेक्षा केली होती, पण त्यांनाही अल्प मतांवर समाधान मानावे लागले.

शिवसेनेच्या दोन्ही गटांना धडा

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला या निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. शिंदे गटाला ३ तर ठाकरे गटाला २ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी शरद पवार गटाला तर खातेही उघडता आले नाही. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्षच घातले नाही. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ यांनी भाजपसोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, पण युती तुटली आणि त्यात शिंदे गटाचेही नुकसान झाले.

आता सत्तास्थापनेसाठी भाजपला युवा स्वाभिमान, शिंदे गट आणि राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे.