सांगली : सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सुर्यवंशी आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गजानन मगदूम यांची अविरोध निवड निश्‍चित झाली आहे. काठावर पास होउनही परीक्षेत मात्र पहिला नंबरच नव्हे तर पैकीच्या पैकी गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची जशी अवस्था होते तशी आता भाजपची झाली आहे.

निवडणुकीत जीवतोड प्रचार यंत्रणा राबवूनही विरोधकांना पुन्हा सत्तेच्या सावलीत जावे लागले. यामागे भाजपचे जेष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांची रणनीती यशस्वी ठरली. केवळ सांगलीच नव्हे तर पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, इचलकरंजी या सहा महापालिकेत भाजपचा दबदबा निर्माण झाला आहे. विरोधकच म्हणून काँग्रेस गलितगात्र झाली आहे हे यावेळी अभूतपूर्व दिसत आहे.

सांगली महापालिका निवडणुक भाजपने सर्व जागावर उमेदवार देउन शत प्रतिशत भाजपचा नारा दिला होता.स्वत: पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील हे दिग्गज मैदानात उतरले होते. पडद्याआडच्या जुळण्या लावण्यात माहीर असलेले मकरंद देशपांडे सकाळी पुणे, दुपारी कोल्हापूर, इचलकरंजी, सायंकाळी सांगलीत तर मुक्काम सोलापूर असे करत होते. यातून नाराजी दूर करत बंडखोरी टाळण्यात यश मिळाले असले तरी विरोधकांनी गुप्त तडजोडी करत भाजप विरोधात चांगली मोट बांधली होती. यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. ५५ जागी विजय मिळेल असा विश्‍वास भाजप नेत्यांना होता. तरीही सांगलीकरांनी त्यांना एकहाती सत्ता देण्यास नकार दिला होता. बहुमताच्या जवळ नेउन भाजपला रोखले. तरीही राजकीय तडजोडी करत अखेर भाजपने महापौर, उपमहापौर पदाचा सोपान लिलया पार केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांची महाविकास आघाडी एकत्रित असली आणि या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बाहेरून समर्थन देत असली तरी त्यांनाही सांगलीकरांनी स्वीकारले नाही. आकड्याच्या खेळात भाजप विरोधी आघाडी यशस्वी ठरू शकली नाही. आता तर भाजपसोबत राष्ट्रवादी सत्तेत जाणार हे स्पष्ट झाले आहे. महापौर आमच्याशिवाय निश्‍चित होउ शकणार नाही अशा वल्गना करणारी राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्तेविना करमत नाही अशी गत झाली. विरोधात बसण्याची त्यांची जशी मानसिकता नाही, तशीच मानसिकता आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची झाली असल्याचे दिसून येत आहे. नजीकच्या काळात तीन सदस्यांचा हा गटही सत्तेत भागीदार होण्याची शययता नाकारता येत नाही. शिवसेना शिंदे गटाने अखेरच्या क्षणी भाजप विरोधात शड्डू ठोकला खरा, दिसेल त्याच्या गळ्यात धनुष्यबाणाचे उपरणे घालून पवित्र करत मैदानात उतरवले. मात्र, दोन जागा मिळाल्या त्या पक्षाला म्हणून नव्हे तर उमेदवाराला मिळाल्या. अन्यथा त्याही गेल्या असत्या. आता त्यांनाही सत्तेत सहभागी करून भाजप महायुती म्हणून डांगोरा पिटायला तयार आहे.

काँग्रेसला या निवडणुकीत १८ जागा मिळाल्या. दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असूनही नेतेमंडळींच्यात गटनेता निवडीबाबत एकमत होत नसेल तर निर्णय क्षमतेचा अभाव की गलितगात्र झालेली संघटना म्हणावी अशी स्थिती आहे. पराभूत मानसिकतेतून काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी जी कार्यकर्त्यांची गरज आहे ती फळीच आज किडली आहे. नेतेमंडळी आपल्या निवडणुकीपुरताच या फळीचा आधार घेतात, इतरवेळी ना कोणता कार्यक्रम, ना कोणता जनतेचा प्रश्‍न घेउन रस्त्यावर उतरण्याची तयारी. यामुळेच काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशीच झाली आहे.