मुंबई : दिल्ली आणि बिहारच्या यशानंतर भाजपच्या आशा आता पुढील वर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पल्लवीत झाल्या आहेत. आसाम, पश्चिम बंगाल आणि पुड्डूचेरी ही राज्ये भाजप किंवा एनडीएसाठी महत्त्वाची आहेत. काँग्रेसची सारी भिस्त ही केरळवर आहे. तमिळनाडूत द्रमुक आणि अण्णा द्रमुकमध्येच पारंपारिक लढत होते की तिसरा पक्ष पुढे येतो याची उत्सुकता आहे.

तमिळनाडू

१९६७ पासून द्रमुक आणि अण्णा द्रमुकमध्ये सत्तेसाठी चुरस असते. द्रमुकची काँग्रेस, डावे पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांबरोबर आघाडी कायम आहे. अण्णा द्रमुकने यंदा पुन्हा भाजपशी युती केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अण्णा द्रमुकने भाजपशी युती तोडली होती. अल्पसंख्याक मतदार दुरावल्याने अण्णा द्रमुकने तसा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना अण्णा द्रमुकचा पार धुव्वा उडाला होता. यामुळेच अण्णा द्रमुकने पुन्हा भाजपशी जुळवून घेतले आहे.

यंदा चित्रपट अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाने दोन्ही द्रमुकसमोर आव्हान उभे केले आहे. विजय यांनी दोन्ही द्रमुकशी समान अंतर ठेवत टीका केली आहे. गेल्या महिन्यात विजय यांच्या करूर येथे झालेल्या रोड शो व सभेच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४२ जणांचा मृत्यू झाला. यातून विजय यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मोठा फटका बसला. सभांना प्रचंड गर्दी होत असली तरी ती मतांमध्ये हस्तांतरित होते का, यावर विजय यांचे भवितव्य अवलंबून आहे.

तमिळनाडूत ताकद वाढविण्याचे भाजपने अनेक प्रयत्न केले पण त्यात अजून यश आलेले नाही. अण्णा द्रमुकबरोबर युतीत सत्ता मिळाल्यास भाजपचे तमिळनाडूत पाय रोवण्याची योजना पूर्ण होईल. भाजपसाठी तमिळनाडूची सत्ता महत्त्वाची आहे. यामुळेच अण्णा द्रमुक बाजी मारतो की द्रमुक सत्ता कायम राखतो याची उत्सुकता असेल.

पश्चिम बंगाल

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करणे हे भाजपचे एकमेव लक्ष्य आहे. या दृष्टीने भाजपचे नियोजन सुरू आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपला सत्तेत येण्याचे वेध लागले होते. पण २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला मोठा धक्का दिला. २०० पेक्षा जास्त जागा जिंकून ममता बॅनर्जी यांचे आपले वर्चस्व सिद्द केले.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत भाजपचा डोके वर काढू दिले नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखून लागोपाठ चौथ्यांदा सत्तेत येण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, भाजपने ममता बॅनर्जी यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्यावर भर दिला आहे.

महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या, कायदा व सुव्यवस्था, अल्पसंख्याकांचे करण्यात येणारे लांगूगचालन यावर भाजपने भर दिला आहे. तीन दशके सत्ता उपभोगणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष कुठेच स्पर्धेत नाहीत. सध्या सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या सखोल फेरतपसणी मोहिमेवरूनही पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे.

केरळ

तमिळनाडूप्रमाणेच आलटून पालटून सत्ताबदल होणाऱ्या केरळमध्ये गेल्या वर्षी ही परंपरा खंडित केली होती. डाव्या पक्षांच्या आघाडीला लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता मिळाली होती. यंदाही डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी तीव्र स्पर्धा आहे. भाजपनेही केरळमध्ये जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला एक जागा मिळाली होती. यंदा दुहेरी आकडा पार करण्याची भाजपची योजना आहे. यासाठी भाजपने हिंदूप्रमाणेच ख्रिश्चन मतदारांना आपलेसे करण्यावर भर दिला आहे.

राहुल गांधी व नंतर प्रियंका गांधी निवडून आलेल्या केरळची सत्ता काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. त्याआधी नेतृत्वाला गटबाजीवर नियंत्रण आणावे लागेल. सर्व नेत्यांची एकी घडवून आणावी लागेल. १० वर्षे सत्तेत असल्याने डाव्या पक्षाच्या नेत्यांचा विश्वास बळावला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकालही महत्त्वाचा असेल. काँग्रेससाठी केरळ हे ‘करो वा मरो’ अशी परिस्थिती निर्माण झालेले राज्य आहे.

आसाम

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या आसाममध्ये भाजपने सत्तेची हॅटट्कि करण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री हेमंत बिश्व सरमा यांनी मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला आहे. ‘मियाॅ मुस्लीम’ हा शब्द प्रयोग त्यांच्या प्रत्येक भाषणात केला जातो. ‘भाजपचा पराभव झाल्यास मुस्लिमांच्या हाती आसामची सूत्रे जातील, असे चिथावणीखोर वक्तव्य मुख्यमंत्री सरमा यांनी कालच केले आहे.

काँग्रेससाठीही आसामची निवडणूक महत्त्वाची असली तरी भाजपशी सामना करणे सोपे नाही. नुकत्याच पार पडलेल्या बोडोलॅण्ड प्रांतीय निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. हा भाजपासाठी धोक्याचा इशारा मानला जातो. बंगाली मतदारांचे वर्चस्व असलेल्या बराक तर आसामींचे प्राबल्य असलेल्या ब्रम्हपूरा खोऱ्यात भाजपला किती पाठिंबा मिळतो हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

पुडुचेरी

ऑल इंडिया एन. आर. काँग्रेसचे नेते एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला गेल्या निवढणुकीत बहुमत मिळाले होते. त्यात भाजपचे सहा आमदार निवडून आले होते. ३० सदस्यीय केंद्रशासित प्रदेशात पुुन्हा एकदा रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी रिंगणात उतरणार आहे. द्रमुक – काँग्रेस आघाडीचे आव्हान असेल.