scorecardresearch

सत्ताबदलामुळे राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला वाढीव मतांचा लाभ

१८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून महाराष्ट्रातील सत्ता बदलाचा या निवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सत्ताबदलानंतर शिवसेना व अपक्षांमधील ५० आमदारांचे समर्थन भाजपला लाभल्याने या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील मतांचे गणित बदलले आहे. विधानसभेतील १६५ तसेच शिवसेनेतील काही खासदारांचे समर्थन लाभणार असल्याने १० हजारांपेक्षा अधिक मतमूल्याचा भाजपला लाभ होईल.

राज्यातील मतांचे गणित बदलले

राज्यातील एका आमदाराच्या मताचे मूल्य हे १७५ तर सरसकट खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०० आहे. राज्यातील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५०,४०० असले तरी एक जागा रिक्त असल्याने हे मूल्य आता ५०,२२५ झाले आहे. महाविकास आघाडीला १६० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा होता. १२०च्या आसपास आमदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपला राज्यातील आमदारांच्या एकूण मतांच्या मूल्यापैकी २१ हजार मतांची अपेक्षा होती. पण दोन आठवड्यांतील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील राज्यातील मतांचे गणितच बदलले. भाजप नेत्यांनी सोमवारी रात्री राज्यातील मतांचा एकूण आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना लाभ

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला १६४ आमदारांचे समर्थन लाभले. याउलट महाविकास आघाडीचे संख्याबळ ११० पर्यंत घटले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला राज्यातून १६५ पेक्षा अधिक आमदारांचे समर्थन लाभेल, असे भाजप नेत्यांचे गणित आहे. ५० आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपच्या मतमूल्यात राज्यात ८,७५० ची वाढ होणार आहे.. शिवसेनेचे १८ खासदार असून, काही खासदार हे शिंदे यांच्याबरोबर आहेत. या खासदारांचा पाठिंबा गृहीत धरल्यास शिंदे यांच्या बंडामुळे भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना १० हजारांपेक्षा अधिक मतमूल्यांचा लाभच होईल.

एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक जिंकण्याऐवढे मतांचे मूल्य भाजपकडे नाही. यातूनच बिजू जनता दल, जगनमोहन रेड्डी, अकाली दल,. बसपा अशा पक्षांचा पाठिंबा मिळविण्यात भाजपला यश आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp gained more votes in the presidential election because of government change in maharashtra print politics news dpj

ताज्या बातम्या