Ganesh Naik and Eknath Shinde Conflict : भाजपाचे दिग्गज नेते गणेश नाईक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी झालेल्या या राजकीय वादाची संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती. यादरम्यान हे प्रकरण ताजे असतानाच नाईक यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानावर शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत सत्ताधारी महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यापार्श्वभूमीवर गणेश नाईक नेमके काय म्हणाले? शिंदे गटाने त्यांना कसे प्रत्युत्तर दिले? त्याविषयीचा हा आढावा…
गणेश नाईक नेमके काय म्हणाले?
सोमवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात कुठेही एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला नसला तरीही त्यांचा रोख स्पष्टपणे शिंदे गटाकडेच दिसून येत होता. भाजपाच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने स्थानिक राजकारणात हस्तक्षेप न करता मला मोकळीस दिल्यास त्यांचे (शिंदे गटाचे) नामोनिशाण मिटवून टाकणार, असा इशारा नाईक यांनी दिला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले. भाजपा हा शिस्तीचा पक्ष असून एकदा वरिष्ठांकडून आदेश आल्यास आम्ही त्याचे पालन करतो. त्यामुळेच आम्ही मनाला न पटणाऱ्या गोष्टी अनेकदा सहन केल्या आहेत. सध्या पक्षशिस्तीमुळे आमचे कार्यकर्ते शांत असले तरीही याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत असा होत नाही, असेही नाईक म्हणाले.
महायुतीच्या रणनीतीवर व्यक्त केली नाराजी
नुकत्याच पार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर नाईक यांनी महायुतीच्या रणनीतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका नेत्यांसाठी असतात; पण महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात. माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की- सर्वांनी या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढावे आणि निकालानंतर ज्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले त्यांचाच महापौर करावा, असा सल्लाही नाईक यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निकालावर भाष्य करताना कोणताही किल्ला कोणाच्या मालकीचा नसतो. जेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो, तेव्हा नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये आमचाच महापौर होता. त्यावेळी ठाणे महापालिकेतील आमचा विजय थोडक्यात निसटला होता; पण तरीही आम्ही जिल्हा बँका आणि जिल्हा परिषदेवर विजय मिळवला होता, याची आठवणीही नाईक यांनी करून दिली.
शिंदे गटाला नाईक यांचा टोला
नवी मुंबईतील जागावाटपाचा किस्सा सांगताना नाईक म्हणाले की- शिंदे गटाने जागावाटपात भाजपाकडे तब्बल ५७ जागांची मागणी केली होती. मात्र आम्ही त्यांना २० ते २२ जागा देण्यास तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा आली आणि अखेर उमेदवारांनी आपापले नामांकन अर्ज भरले. त्यानंतर जे काही घडले ते चांगल्यासाठीच होते. या सर्व विषयांवर आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती, पण त्यांनी ना होकार दिला, ना नकार, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. यादरम्यान भाजपा नेत्याच्या या विधानावर शिंदे गटातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली.
शिंदे गटाकडून सडेतोड उत्तर
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांना सडेतोड उत्तर दिले. कोणी कितीही टीका केली तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापुढेही राहणार आहे. एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी या भागात पक्षाला आणखीनच बळकटी दिली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने या भागात स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. शिवसेना हा आज राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे, असे सरनाईक म्हणाले.
दादा भुसे यांनीही दिले प्रत्युत्तर
शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनीही नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना गणेश नाईक यांच्या विधानाचा समाचार घेतला. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज प्रजासत्ताक दिनासारखा पवित्र दिवस आहे. अशा आनंदाच्या दिवशी महायुतीतील नेत्यांनी असे विधान करणे अत्यंत दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. गणेश नाईक यांचे कुळ आणि मूळ हे शिवसेनाच आहे, हे त्यांनी विसरू नये. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. यासंदर्भात आम्ही सर्व नेते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहोत, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : छगन भुजबळ कायद्याच्या कचाट्यातून कसे सुटले? त्यांच्यावरील आरोप काय होते?
ज्योती वाघमारे काय म्हणाल्या?
शिंदे गटाच्या प्रवक्त ज्योती वाघमारे यांनीही नाईक यांच्या विधानावर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या विषयी काही बोललात तर तुमच्या अब्रूचे धिंडवडे काढले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शिंदे यांचे नामोनिशाण मिटवून टाकणारा अजून जन्माला यायचा आहे. गणेश नाईक औकातीत राहा. तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे. ज्यांच्यावरती बलात्काराचे आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाही, त्यांनी आमच्यावरती बोलू नये. ज्यांचे फक्त रात्रीस खेळ चालतात. ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक. अशा नाईकांचे सर्व काळे धंदे बाहेर काढल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही. भाजपच्या नेत्यांना देखील आवाहन आहे त्यांनी लवकरात लवकर आवर घालावा, अन्यथा आम्ही त्यांचा बंदोबस्त करणार, टीकाही वाघमारे यांनी केली. दरम्यान, शिंदे गट व भाजपातील नेत्यांमधील टीका टिप्पणीमुळे महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांमधील दरी अधिक रुंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
