Dhirendra Shastri Non Veg Comment Controversy : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या विधानावरून पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय वादंग उठला. दुर्गापूजा उत्सवादरम्यान मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी ‘पाखंडी’ असे संबोधल्याने बंगाली समाज प्रचंड आक्रमक झाला. काँग्रेसने याच मुद्द्याला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी या मुद्द्यावर अत्यंत सावध भूमिका घेत स्वामी विवेकानंद यांचा दाखला दिला. बंगाली संस्कृतीमध्ये दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करण्याची जुनी परंपरा असल्याने सत्ताधाऱ्यांनी या वादापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे दिसून आले, त्याविषयी…

धीरेंद्र शास्त्री मांसाहाराबाबत काय म्हणाले?

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी नुकताच बंगालचा दौरा केला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी लिलुआ या शहरात प्रवचनाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला राज्यभरातील असंख्य भाविक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शास्त्री यांनी दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान मटण आणि मासे खाणारे लोक पाखंडी असल्याचे वक्तव्य केले. तसेच उत्सवाच्या काळात राज्य सरकारने ठिकठिकाणी मांसाहारावर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील बंगाली समाज प्रचंड आक्रमक झाला. याआधी चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मांसाहाराच्या मुद्द्यावरून बंगालमधील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच आता धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून या मुद्द्याला पुन्हा एकदा हवी मिळाली. काँग्रेसने शास्त्री यांच्या विधानाला हाताशी धरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

शास्त्री यांच्या विधानावर भाजपाची भूमिका काय?

धीरेंद्र शास्त्री यांनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाल्यानंतर भाजपाने त्याबाबत अत्यंत सावध भूमिका घेतली. या वादावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य म्हणाले की, प्रत्येकाची खाण्यापिण्याची आणि राहणीमानाची वैयक्तिक निवड असते. लोकांनी काय खावे, काय प्यावे किंवा काय कपडे घालावेत, हे कोणालाही सांगण्याचा अधिकार नाही. अष्टमीला बंगाली लोक ‘लुची’ खातात आणि नवमीला मटण खातात. त्यामुळे ते पुढेही तेच खात राहतील. एखाद्या विधानाला कितपत महत्त्व द्यायचे हा सर्वस्वी बंगाली जनतेचा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच यामध्ये कसलेही राजकारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“स्वामी विवेकानंदांपेक्षा कोणी मोठा आहे का?”

धीरेंद्र शास्त्री यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत भट्टाचार्य पुढे म्हणाले की, सध्या अनेकांकडून शाकाहाराचा प्रसार करणाऱ्या मोहिमा राबवल्या जातात. त्यातच काही डॉक्टरही मांसाहार न करण्याचा सल्ला देतात. मात्र, तुम्ही तुमच्या घरात काय खाणार हे एखादा साधू ठरवणार का? बंगाली लोक जे पूर्वापार खात आले आहेत तेच खाणार… स्वामी विवेकानंदांनीही या परंपरेचा सन्मान केला होता आणि त्यांच्यापेक्षा मोठे कोणीच नाही. कोणत्याही संताला अथवा राजकीय पक्षाला, लोक काय खातात हे ठरवण्याचा अधिकार नाही. आपल्याकडील कालीमातेला मटणाचा नैवेद्य अर्पण केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्यापेक्षा कोणी स्वतःला श्रेष्ठ समजू लागल्यास ते धोकादायक ठरेल. त्यामुळे असे विचार स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही भाजपा प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

“आवाहन करण्याचा अधिकार, पण वाद नको”

धीरेंद्र शास्त्री हे देशभरात अत्यंत आदरणीय आणि प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत समिक भट्टाचार्य म्हणाले की, मांसाहाराबाबत त्यांनी केवळ एक आवाहन केले आहे आणि तसा अधिकार प्रत्येकाला आहे. तुम्हीसुद्धा तसे आवाहन करू शकता. लोक व्यसनमुक्तीचे आवाहन करत नाहीत का? रोज चरबीयुक्त मटण खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा. यादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावर पडदा टाकताना त्यांनी जे म्हटले त्यावरून वाद निर्माण करण्याची गरज नाही. जसे मी म्हणतो- आम्ही जसे आहोत तसेच आम्हाला राहू द्या… असेही भट्टाचार्य यांनी नमूद केले.

भाजपाने बंगाली जनतेचा अपमान केल्याचा आरोप

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे कोलकाता येथील राज्य सरकारच्या अखत्यारितील अतिथिगृहात स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले. याच मुद्द्याला हाताशी धरून पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शुभंकर सरकार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. भाजपाकडून बंगालच्या जनतेचा वारंवार अपमान केला जातो. वादग्रस्त विधाने करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांना स्नेहभोजनाला निमंत्रित केल्याने ही बाब सिद्ध झाली आहे. भाजपाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांचे बंगालवर कोणतेही नियंत्रण नाही. राज्याच्या कारभाराची सर्व सूत्रे दिल्लीतील नेत्यांच्या हातात आहे, असा टोला त्यांनी लगावला.

इतर पक्षांतील नेत्यांकडूनही शास्त्री यांचा समाचार

धीरेंद्र शास्त्री नक्की कोण आहेत? त्यांना इतके अवाजवी महत्त्व का दिले जात आहे? हे दुसरे काही नसून भाजपाचे मूळ स्वरूप आणि संस्कृती आहे. भाजपा नेहमीच अशा प्रकारच्या भाषेत बोलत आला आहे, अशी टीकाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. त्याचवेळी शास्त्री यांच्या विधानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सुजन चक्रवर्ती यांनीही तीव्र आक्षेप घेतला. लोकांनी शास्त्री यांचे म्हणणे का मानावे? एखाद्याला खूश करण्याच्या उद्देशाने सरकार चालवले जात असेल, तर ते समाजाच्या हितासाठी मुळीच योग्य नाही, अशी टीका सुजन चक्रवर्ती यांनी केली. दुसरीकडे- बाहेरचा व्यक्ती राज्यातील संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर लोकांच्या स्वातंत्र्याचे काय होणार? बंगालमधील नागरिक आपल्या मनाप्रमाणे पूजा-अर्चना करतात. धीरेंद्र शास्त्री यांनी आमच्या धार्मिक मुद्द्यात उगाच हस्तक्षेप करू नये, असा संताप तृणमूल काँग्रेसच्या खासदार सौगत रॉय यांनी व्यक्त केला.