पुणे : महापालिकेच्या निवडणुकांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आता निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले, प्रचारासाठी राबराब राबलेले आणि मागील दरवाजाने आत येऊन स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी आसुरलेले असे सगळेच इच्छुक तयारीला लागले आहेत. पुण्यात भाजपकडे ‘स्वीकृत’साठी रांग आहे. दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढल्या असून त्यांना दोन स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहेत. मात्र, सर्वाधिक २७ जागांवर विजयी झालेली दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ ही अवघ्या तीन जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ‘स्वीकृत’ जागा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेत १६५ जागांपैकी ११९ जागांवर विजय साकारत भाजपने सलग दुसऱ्यांना सत्ता मिळविली. दुसऱ्या स्थानावर अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ आहे. त्यांना २७ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस ही तिसऱ्या स्थानावर असून त्यांना १५ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला. उर्वरित पक्षांपैकी शिवसेना (शिंदे) आणि मनसे या दोन पक्षांना एकाही ठिकाणी यश मिळाले नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने भाजपबरोबर युती केली होती. भाजपने त्यांना नऊ जागा दिल्या. त्यापैकी सहा जागांवर या पक्षाचे उमेदवार निवडून आले. मात्र, त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविली असल्याने त्यांचा स्वतंत्र गट नाही.

महापालिकेत १६५ नगरसेवक असल्याने संख्याबळानुसार भाजपला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांच्या इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपकडे इच्छुकांची रांग

स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी भाजपकडे इच्छुकांची रांग आहे. भाजपने काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली; तसेच काही ठिकाणी अन्य पक्षांतील उमेदवारांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये नाराजी पसरली. त्यापैकी काहींना स्वीकृत नगरसेवक नेमण्याचे आश्वासन देण्यात आले. निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देताना काही प्रबळ इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी मनापासून प्रचाराचे काम केले. त्यामुळे भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी कोणत्या सातजणांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

राष्ट्रवादी’समोर यक्षप्रक्ष

महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादीं’नी एकत्र येऊन निवडणूक लढविली. त्यांना दोन जागांवर स्वीकृत नगरसेवक नियुक्त करता येणार आहेत. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या दोन जागांचे वाटप कसे करायचे, याबाबत दोन्ही ‘राष्ट्रवादी’पुढे यक्षप्रश्न पडला आहे. दोघांना प्रत्येकी एक जागा देण्याचा पर्याय असला, तरी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे संख्याबळ जास्त असल्याने त्यांच्याकडून एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला दिली जाणार की नाही आणि सद्य:परिस्थितीत याबाबतचा अंतिम निर्णय कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इच्छुकांची ‘ना हरकत प्रमाणपत्रा’साठी धावपळ

पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया नऊ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी तीन फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदाची नियुक्ती आणि

त्यानंतर होणाऱ्या पहिल्या विशेष सभेनंतर स्वीकृत नगरसेवक नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित उमेदवारांना महापालिकेकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास ३० जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.