छत्रपती संभाजीनगर: महायुतीचे एकमेव खासदार म्हणून मराठवाड्यातून निवडून आलेले संदीपान भुमरे यांच्याकडील पालकमंत्री पदावर आता भाजपने दावा केला आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे हे पद दिले जावे असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. रोजगार हमी मंत्री पदी असणाऱ्या संदीपान भुमरे यांचे मंत्रीपद औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ यांना मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच तर पुढील दोन महिन्यासाठी कामकाज पुढे नेण्यासाठी रिकाम्या खुर्च्यांवर रुमाल टाकला जात आहे.

मराठवाड्यातील सात जागांवर ‘ मराठा आरक्षणा’ मुळे निर्माण झालेल्या रोषाचा फटका भाजपला बसला. मात्र, अशा स्थितीमध्येही शिवसेनेच्या संदीपान भुमरे निवडून आले. त्यांच्या विजयानंतर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील आघाडीवरुन अतुल सावे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये फटका बसू शकेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात शहरातील तिन्ही मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांच्याकडे पालकमंत्री पद देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा-उत्तर प्रदेशातल्या मतघसरणीची कारणं काय? भाजपा प्रत्यक्ष मैदानात उतरून घेणार आढावा

दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून माध्यमांमध्ये चर्चेत असणारे संजय शिरसाठ यांना आता मंत्री पद मिळावे अशी मागणी केली जाऊ लागली आहे. मंत्री भुमरे यांच्याऐवजी शिवसेनेतून संजय शिरसाठ यांना हे पद देण्यात येईल असे मानले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपलाही नंबर लागू शकतो, असे शिंदे समर्थक आमदारांना वाटू लागले आहे. मंत्रिमंडळा विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याने रिकाम्या खुर्च्यांवर रुमाल टाकून ठेवण्याची राजकीय प्रक्रिया वेगात सुरू आहे.