संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर पाच-सहा महिन्यांनी पक्ष नेतृत्वाला इशारा देणाऱ्या पंकजा मुंडे यांना वंजारी समाजाचे असलेले पाठबळ लक्षात घेऊनच भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण ठेवले आहे. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे स्वत:च दावा करणाऱ्या पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापसून त्या अस्वस्थ आहेत. त्यातच भाजपने बीड किंवा आसपासच्या वंजारी समाजातील नेत्यांना खासदारकी, आमदारकी दिली पण पंकजा मुंडे यांना झुलवत ठेवले. त्याचे त्यांना अधिक शल्य दिसते.

आपण नाही तर आपली बहिण प्रितम मुंडे यांना केंद्रात किमान राज्यमंत्रीपद मिळेल, असा मुंडे बहिणींना आशावाद होता. पण समाजातील डॉ. भागवत कराड यांना आधी राज्यसभेची खासदारकी नंतर केंद्रात राज्यमंत्रीपद सोपिवण्यात आले. प्रत्येक वेळी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आशा लावून बसलेल्या पंकजा मुंडे यांचा गेल्या चार वर्षांत पक्षाने कधीच विचार केला नाही. गेल्या वर्षी विधान परिषद निवडणुकीत आपली वर्णी लागेल या आशेवर होत्या. पण तेव्हाही त्यांच्या पदरी निराशाच आली.

हेही वाचा >>> प्रिय, गोपीनाथराव मुंडे…

राज्यात सत्ताबदल झाल्यावर मंत्रिपद मिळेल या आशेवर पंकजा मुंडे होत्या. पण पक्षाने तेव्हाही डावलले. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्यासमोर विजयाची खात्री पंकजा यांना दिसत नसावी. यामुळे काहीही करून विधान परिषदेची आमदारकी मिळावी, अशीच पंकजा मुंडे यांची इच्छा असावी, असे भाजपमध्ये बोलले जाते. खासदारकी वा आमदारकीकरिता आपला विचार होत नसल्याची व्यथा त्यांनी शनिवारी बोलून दाखविली. भगवान गडावर वार्षिक दसरा मे‌ळावा आणि गोपीनाथ मुंडे यांची जयंती व पुण्यतिथीच्या वेळी शक्तिप्रदर्शन करून पंकजा मुंडे हे पक्षाचे लक्ष वेधून घेत असतता.

हेही वाचा >>> आटपाडीतील देशमुखांचे संस्थान खालसा

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईमुळे पंकजा मुंडे यांना वंजारी समाजात अजून तरी चांगला मान आहे. समाजाचे पाठबळ असलेल्या सध्या तरी त्या एकमेव नेत्या आहेत. यामुळेच पंकजा मुंडे यांनी भाजप नेत्यांना कितीही इशारे दिले तरीही पक्षाचे नेतृत्व सारे खपवून घेते, असे भाजपच्या धुरिणांकडून सांगण्यात येते. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या वेळी पंकजा यांनी पुन्हा भाजप नेतृत्वाला इशारा दिला. पंकजा मुंडे नेहमीच बोलतात पण त्यांची भगिनी व बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तिगिर महिलांच्या बाजूने बोलल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

हेही वाचा >>> ‘मोफत’चा जमाना….

महिला कुस्तिगिरांची बाजू उचलून धरणाऱ्या त्या भाजपच्या पहिल्याच लोकप्रतिनिधी आहेत. पंकजा यांचा इशारा, प्रीतम मुंडे यांची पक्षाच्या विरोधातील भूमिका यामुळे मुंडे बहिणींच्या मनात नेमके काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समाजाचे पाठबळ असल्याने भाजपलाही पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेताना काहीशी नरमाई बाळगावी लागत आहे. पंकजा यांनी टोकाची भूमिका घेतल्यास भाजपच्या ‘माधव’ प्रयोगातील वंजारी समाज दूर जाण्याची भाजपला भीती आहे. यामुळेच पंकजा मुंडे यांनी कितीही इशारे दिले तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे हीच भाजपची भूमिका दिसते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ignored pankaja munde due to community support print politics news ysh
First published on: 04-06-2023 at 10:05 IST