तमिळनाडू भाजपाचे अध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी विजय यांच्यावर टीका करताना अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचे नाव घेतले होते. यानंतर झालेल्या टीकेनंतर सोमवारी नागेंद्रन यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र या वक्तव्यामुळे भाजपाच्या अडचणी तमिळानाडूमध्ये वाढल्या आहेत. अभिनेत्री त्रिशाने या सगळ्याबाबत वकिलामार्फत उत्तर दिलं आहे. तसंच नेत्यांनी संयम बाळगला पाहिजे असंही म्हटलं आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
नागेंद्रन यांनी एका विजयी सभेत बोलत असताना अभिनेत्री त्रिशा बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विजय यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष मोठे आव्हान उभे करेल असा दावा केल्यानंतर, नैनार नागेंद्रन यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. राजकारणात अनुभव मिळवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विजयने “त्रिशाच्या घरातून बाहेर पडावे” अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावरून चांगलाच राजकीय वाद उसळला होता. हे विधान केल्याच्या दुसर्याच दिवशी त्यांनी माफी मागितली. भाजपा नेते नागेंद्रन यांनी विजयच्या राजकीय महत्त्वकांक्षांची खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते की, “जो माणूस छतावरही चढू शकत नाही, तो स्वर्गापर्यंत पोहचण्याचे स्वप्न पाहत आहे.” “बिचारा, तो पूर्णपणे अनुभव नसलेला आहे. पहिल्यांदा, त्याने त्याच्या घरातून बाहेर पडावे. आधी त्रिषाच्या घरातून बाहेर या, मगच काहीतरी होऊ शकेल,” असेही ते हसत म्हणाले होते आणि खिल्ली उडवली होती. इथूनच सगळा वाद सुरु झाला.
त्रिशाने या बाबत काय म्हटलं होतं?
नैनार नागेंद्रन यांच्या वक्तव्याबाबत अभिनेत्री त्रिशाने वकिलांमार्फत उत्तर दिलं आहे.
१) माझी अशील त्रिशा कृष्णनने अशी अपेक्षा कधीही केली नव्हती की तिच्याबाबत अनादर दाखवणारं आणि निषेधार्ह वक्तव्य केलं जाईल. राज्याच्या राजकारणात मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने असं म्हणणं अपेक्षित नव्हतं.
२) माझ्या अशील त्रिशा यांनी आधीच हे स्पष्ट केलं आहे की त्या कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. तसंच कुठल्याही राजकीय पक्षात जाण्यात त्यांना रस नाही. माझ्या अशील त्रिशा यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या काही गोष्टींचा संदर्भ देऊन राजकारण केलं जातं आहे ही बाब चुकीची आहे.
३) एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रीबाबत अभद्र बोलून भाजपाच्या नेत्याने काय मिळवलं? आपण काय बोलत आहोत याचं भान अशा मोठ्या नेत्याने बाळगायला नको का?
४) आम्ही आता कळकळीची विनंती करत आहोत की तुमच्या राजकारणासाठी माझ्या अशील त्रिशा यांचं नाव कशातही खेचू नका. शिवाय बोलताना संयम बाळगणं आवश्यक आहे. स्त्रीचा अपमान करुन तिची खिल्ली उडवण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला?
या आशयाचे मुद्दे मांडत अभिनेत्री त्रिशाने या भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला उत्तर दिलं आहे. दरम्यान आज नैनार नागेंद्रन यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे आणि कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे असंही म्हटलं आहे.

नैनार नागेंद्रन यांच्यावर टीकेचा भडीमार
नैनार नागेंद्रन वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहे. अनेक नेत्यांनी याला अयोग्य म्हटले आहे आणि भाजपावर वैयक्तिक हल्ले केल्याचा आरोप लावला आहे. सुरुवातीला आपल्या शब्दांवर ठाम राहिलेले आणि विधान मागे घेण्यास नकार देणाऱ्या नागेंद्रन यांनी सोमवारी त्यांच्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
नैनार नागेंद्रन यांची माघार
दरम्यान सर्वस्तरीय टीका झाल्यावर नैनार नागेंद्रन यांनी या प्रकरणी माघार घेतली आहे. मी जे बोललो त्याबाबत मी दिलगीर आहे. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मी कधीही कुणाबाबतही वादग्रस्त विधान केलेलं नाही, तसंच कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यावर शाब्दिक हल्ला चढवलेला नाही. तरीही अभिनेत्री त्रिशाबाबत मी जे बोलून गेलो ती माझी चूक होती. मी असं विधान करायला नको होतं. आमच्या अखिल भारतीय महिला आघाडीच्या प्रमुख वनाती श्रीनिवासन आणि अण्णामलाई यांनी या प्रकरणात माझ्याशी चर्चा केली आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. असं नैनार नागेंद्रन यांनी म्हटलं आहे.
कोण आहे त्रिशा कृष्णन?
त्रिशा कृष्णन ही दाक्षिणात्या अभिनेत्री आहे. तिने आत्तापर्यंत विविध दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही कालावधीपूर्वी त्रिशाचं नाव अभिनेता विजयशी जोडलं गेलं होतं. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच दोघंही एकमेकांना डेट करत आहेत आणि दोघांचं अफेअर सुरु आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्रिशा कृष्णनने हिंदी चित्रपट खट्टा मीठा मध्येही काम केलं आहे. त्रिशा एक यशस्वी मॉडेल होती, त्यानंतर तिने चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्रिशाला एका गाण्यामध्ये पाहिलं आणि चित्रपटाची ऑफर दिली. ज्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आता या आरोपांमुळे तिची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. ज्या आरोपांना त्रिशाने वकिलांमार्फत उत्तर दिलं आहे. त्रिशा ४० वर्षांची आहे, मात्र ती अद्यापही अविवाहित आहे. २०२५ मध्ये वरुण मणियन यांच्याशी तिचा साखरपुडा झाला होता. पण हे लग्न झालं नाही. तसंच तिचं नाव आधी धनुषसह आणि नंतर विजय थलपतीसह अनेकदा जोडलं गेलं आहे.

