मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यात भाजपकडून खोडा घातला जाण्याची चिन्हे असून त्यासाठी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी घाईघाईने उरकण्यात येत असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचा ताबा घेतील आणि वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सूचना डावलता येणार नाहीत, हे लक्षात घेवून अजित पवारांच्या पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे देण्याची खेळी भाजपने पडद्याआडून खेळली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन-तीन दिवसांतच सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षनेतृत्वाची धुरा देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीला उपस्थित होते. त्यांनी परतताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतानिवडीसाठी लगेच बैठक बोलाविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याचे आधीच ठरवून उपमुख्य मंत्रीपदाच्या शपथविधीची तयारीही सुरू करण्यात आली. यासंदर्भात सुनेत्रा पवार किंवा अन्य नेत्यांनी शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. पक्षाची धुरा कोणाकडे द्यायची, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी सांगितले असले, तरी त्यांनी पडद्याआड राहून यासंदर्भातील हालचाली केल्याचे सूत्रांनी सांगितले.
विलीनीकरणात अडथळा?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजपने अजित पवार यांना आपल्याबरोबर आणले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी बारा फेब्रुवारीचा मुहूर्तही ठरला होता. पण अजित पवार यांच्या निधनामुळे त्यात अडचणी येण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचा एकत्र येण्यास विरोध आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास शरद पवार यांचा निर्णय अंतिम राहील, ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा निर्णय प्रक्रियेत वरचष्मा राहील. हे अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांबरोबरच भाजपच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरणार आहे.

भाजपला राज्यातील सरकार स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने अजित पवारांच्या पक्षाचाही पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळेच भाजप-शिवसेनेचे बहुमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेण्यात आले होते. त्याच राजकीय व्यूहरचनेतून सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार यांच्या पक्षाची धुरा घाईघाईने देवून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणात अडथळे आणले जाण्याची शक्यता आहे.