Gujarat BJP Internal Conflict : देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाला सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या महिनाभरात नवसारी जिल्ह्यातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे एकापाठोपाठ एक राजीनामे दिले आहेत. या घडामोडींमुळे गुजरातसह जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपले लक्ष्य पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे वळवले आहे. आगामी काळात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ व पुदुच्चेरीत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर २०२७ मध्ये गुजरात व उत्तर प्रदेश यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांतही निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी केली आहे. सध्या भाजपातील प्रमुख नेते आपापल्या जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत.

भाजपातील ५८ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भाजपाने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्यांवरून नाराजी व्यक्त करत पक्षातील तब्बल ५८ स्थानिक नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. राज्यात भाजपाचे सरकार असताना पक्षातील नेत्यांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी लक्ष्य घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा संघटनेतील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून नाराज होऊन राजीनामा दिलेल्या ५८ नेत्यांपैकी २५ नेत्यांनी आपले राजीनामे मागे घेतल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भुरालाल शाह यांनी केला आहे.

आणखी वाचा : ठाकरे गटातील बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत? अमोल मिटकरींमुळे राष्ट्रवादीच अडचणीत? वाचा ५ घडामोडी…

२५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे घेतले मागे?

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भुरालाल शाह म्हणाले की, जिल्ह्यातील भाजपाच्या ५८ पैकी ३३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आधीच मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित २५ नेत्यांनी चर्चेनंतर आपले राजीनामे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामे देणारे नेते भाजपाशी एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकिटाचे वाटप करताना या नेत्यांचा वर्तवणुकीचा विचार केला जाईल. भाजपापेक्षा कोणताही नेता मोठा नसून, यापुढे शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही शाह यांनी दिला.

भाजपाचे पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात?

नवसारी जिल्ह्यातील भाजपामधील पेच काही प्रमाणात सुटला असला तरीही राजीनामे देणाऱ्या नेत्यांच्या भविष्यातील राजकीय संधींवर आता टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणूक पाहता, काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपातील नाराज पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात सामील करण्यासाठी त्यांची मनधरणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपातून राजीनामा देणाऱ्या ३३ पैकी जवळपास १३ पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा एका स्थानिक नेत्याने केला आहे. दुसरीकडे- राजीनामे देणारे पदाधिकारी भाजपाशी एकनिष्ठ असून, त्यांना आगामी काळात चांगली संधी दिली जाईल, असे भाजपाचे नेते सांगत आहेत.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप काय?

नवसारी जिल्ह्यातील भाजपातला अंतर्गत कलह शमण्याऐवजी आता वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. जिल्हाध्यक्ष भुरालाल शाह यांनी २५ नेत्यांनी राजीनामे मागे घेतल्याचा दावा बंडखोरांनी फेटाळून लावला आहे. जलालपोर येथील भाजपाचे नेते अशोक पटेल यांनी जिल्हाध्यक्ष भुरालाल शाह यांच्या दाव्याला थेट आव्हान दिले आहे. भुरालाल शाह यांनी २५ नेत्यांनी राजीनामे मागे घेतल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. आम्ही प्रत्यक्ष पडताळणी केली असून, एकाही नेत्याने आपला राजीनामा मागे घेतलेला नाही. पक्षनेतृत्वाकडून या नेत्यांवर राजीनामे मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशोक पटेल यांना जिल्हा उपाध्यक्षपद देण्यात आले होते; मात्र त्यांना जिल्हा सरचिटणीस पद हवे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला आणि भाजपात राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले.

हेही वाचा : इराणच्या खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात राजकीय वादंग का उठला? कारण काय?

भाजपातील वादाला जातीय गटबाजीचे वलय

भाजपातील या अंतर्गत वादाला आता जातीय आणि गटबाजीचे वलय प्राप्त झाले आहे. राजीनामा देणारे बहुतांश नेते जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या कोळी समाजाचे नेतृत्व करतात. त्यातील काही जण नवसारीचे भाजपा आमदार आर. सी. पटेल यांचे कट्टर समर्थक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जलालपोरमधील भाजपा नेत्यांना जिल्हा संघटनेत नेतृत्वाची पदे न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. याच कारणामुळे त्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे अशोक पटेल यांनी सांगितले आहे. यादरम्यान राजीनामा देणारे भाजपाचे पदाधिकारी इतर कोणत्याही पक्षात जाणार नसून, ते पक्षाचे सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. या राजकीय नाट्यात आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.