scorecardresearch

भाजपच्या चमत्कारातून नवीन सत्तासमीकरणांची नांदी

राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्याचा चंग बांधलेल्या भाजपला रोखणे अस्ताव्यस्त महाविकास आघाडीला जवळपास अशक्यप्राय झाले आहे.

BJP and New Political Equation

उमाकांत देशपांडे

राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही भाजपने चमत्कार दाखविल्याने राज्यातील राजकारणाच्या सारीपटावर नवीन सत्ता समीकरणांची मांडणी सुरू झाली आहे. राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्याचा चंग बांधलेल्या भाजपला रोखणे अस्ताव्यस्त महाविकास आघाडीला जवळपास अशक्यप्राय झाले आहे. 
विधानपरिषद निवडणुकीतील विजय म्हणजे राज्यातील परिवर्तनाची नांदी असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री सांगितले आणि मंगळवारी सकाळी त्याचे प्रत्यंतरही आले. या निवडणुकीत चमत्कार दिसेल, असे भाकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले होते. भाजपने १०६ संख्याबळ असताना १३४ मते खेचली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी ५१ संख्याबळ असताना छोटे पक्ष व अपक्षांच्या मदतीने ५७ मते मिळविली. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला मते दिली नाहीत. महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेला जोरदार दणका देत फडणवीस यांनी विजय संपादन केल्याने नवीन सत्तासमीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत.  प्रचंड नाराजी, अविश्वास, नियोजनशून्यता यातून महाविकास आघाडी खिळखिळी झाल्याचेच दिसून आले आहे.
‘ मी पुन्हा येईन, ‘ या फडणवीस यांनी आत्मविश्वासाने केलेल्या घोषणेने त्यांच्यावर प्रचंड टीका झाली, खिल्ली उडविली गेली. त्यामुळे जखमी वाघाप्रमाणे गेली अडीच वर्षे आक्रमणाची संधी शोधत असलेल्या फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत केले. शिवसेना व एकनाथ खडसे हे फडणवीस यांचे लक्ष्य असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांची मदत घेवून व आपली मते न फुटण्याची काळजी घेतल्याने भाजपला खडसे यांना दगाफटका करता आला नाही. पण या खेळीने राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांसाठी अतिरिक्त मतांची बेगमी केली आणि काँग्रेस उघड्यावर पडली. तर शिवसेना व त्यांच्याबरोबर असलेल्या अपक्षांची मते फोडून फडणवीस यांनी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले तरी मोठा धक्का दिला. भाजपकडे चार उमेदवार विजयी एवढेच संख्याबळ असताना आणि पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यासाठी पहिल्या पसंतीची मते नसताना त्यांना पहिल्या फेरीत १७ मते मिळाली. या फाटाफुटीमुळे महाविकास आघाडी खिळखिळी करण्यात भाजपला यश मिळाले. 
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी दोन उमेदवारांना सर्वाधिक ४८ मतांचा कोटा देवून त्यांची अतिरिक्त मते व भाजपची दुसऱ्या क्रमांकाची मते तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना मिळतील, असे नियोजन भाजपने केले होते. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांच्या सर्वाधिक मते आपल्या उमेदवारांसाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले नाही आणि भाजपने सेना व अपक्ष आमदारांशी संधान बांधून मतांचे गणित जमविले. विधानसभेत संख्याबळ नसतानाही राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत भाजपने मतांचे क्लिष्ट गणित सांभाळणे महत्वाचे असते. फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश सरचिटणीस अतुल वझे,आशिष कुलकर्णी या मंडळींनी कोणत्या आमदाराने भाजप उमेदवारांना कशी मते द्यायची, पसंतीक्रम ठेवायचा, याचे उत्कृष्ट नियोजन केले. राज्यसभा निवडणुकीतील पराभवाने सावध झालेल्या महाविकास आघाडीला विधानपरिषद निवडणुकीतही गनिमी कावा करून दणका दिला.
विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर लोकाभिमुख सरकार येईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहील आणि ही परिवर्तनाची नांदी असल्याचे भाकीत फडणवीस यांनी सोमवारी रात्री केले. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेसह काही शिवसेना आमदारांनी बंड करून त्याचे प्रत्यंतरही दिले. राज्यातील सत्ता गेल्यावर फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जातील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. तेव्हा महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आल्याखेरीज मी केंद्रात जाणार नाही, असे फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले होते. गेल्या अडीच वर्षात करोनामुळे आणि राजकारणातील फासे नीट पडत नसल्याने फडणवीस यांना फारसे काही करून दाखविता आले नव्हते. पण राज्यसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी गवसली आणि त्यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे महाविकास आघाडीला खिंडार पाडले आहे. राज्यातील सत्तेच्या सारीपटावर भाजपच्या बाजूने दाने पडण्यास सुरूवात झाली आहे. भाजप पैसा व ईडीचा वापर निवडणुकीत करीत असल्याचे आरोप खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे यांनी केले असले तरी युध्दात सारे काही क्षम्य असते, या उक्तीप्रमाणे भाजपला त्याची तमा नाही. राज्यातील सत्ता मिळविण्याचा चंग बांधलेल्या भाजपने या निवडणुकीच्या मुहूर्तावर विधानसभेतही १४५ हून अधिकचा टप्पा गाठण्याच्या  दृष्टीने वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-06-2022 at 12:59 IST
ताज्या बातम्या