Why Annamalai is Not Contesting Tamil Nadu Polls 2026 : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या २७ उमेदवारांची संपूर्ण यादी शुक्रवारी जाहीर केली. या यादीत पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यातील प्रभावशाली नेत्यालाच भाजपाने ऐनवेळी तिकीट नाकारल्याची चर्चा तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे, त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अण्णामलाई चर्चेत आले होते. त्यांनी मुंबईबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेतून अण्णामलाई यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना अण्णामलाई यांनी ठाकरेंना खुले आव्हान दिले होते. त्यांच्या विधानावरून मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत अण्णामलाई मुंबईत आल्यास त्यांचे हातपाय कापून टाकण्याची धमकीही दिली होती. त्यावेळी राज्यातील भाजपाचे अनेक नेते अण्णामलाई यांच्या विधानाबाबत सारवासारव करताना दिसून आले होते.
अन्नामलाईंच्या उमेदवारीचा सस्पेन्स
गेल्या काही वर्षांत तमिळनाडूत भाजपाची पाळेमुळे रोवण्यात अण्णामलाई यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते स्वतः एखाद्या महत्त्वाच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, भाजपाने शुक्रवारी जाहीर केलेल्या २७ उमेदवारांच्या यादीत अण्णामलाई यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अन्नामलाई निवडणूक लढवणार नसले तरी भाजपाने अनेक दिग्गज नेत्यांना रिंगणात उतरवले आहे. केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना अविनाशी या राखीव मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्याशिवाय माजी राज्यपाल तमिळिसाई सुंदरराजन यांना चेन्नईतील मयलापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने अण्णामलाईंना तिकीट नाकारलं?
भाजपाच्या उमेदवारी यादीत अनेक दिग्गजांचा नावांचा समावेश असला तरी तमिळनाडूत केवळ अन्नामलाई फॅक्टरचीच चर्चा रंगली आहे. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याच्या दाव्याचे भाजपातील नेत्यांनी खंडन केले आहे. अण्णामलाई यांनी खुद्द विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते, तरीही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना पुन्हा विचार करण्यासाठी अनेक स्तरांवर चर्चा केली. अण्णामलाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जागावाटपावर त्यांचा निर्णय अवलंबून होता. जर कोईम्बतूरमध्ये भाजपाला किमान आणखी एक जागा मिळाली असती तर अन्नामलाई यांनी निवडणूक लढवण्याचा विचार केला असता, असे भाजपाच्या एका नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
अन्नामलाईंच्या माघारीमागे जागावाटपाचा पेच?
अण्णाद्रमुक प्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी जागावाटपावर कडक नियंत्रण ठेवले होते. भाजपाने त्यांच्याकडे सिंगानल्लूर (जी जागा अन्नामलाईंसाठी सुरक्षित मानली जात होती), सुलूर आणि गौंडनपालयम या वाढीव जागांची मागणी केली होती; परंतु पलानीस्वामी यांनी या जागा देण्यास नकार दिला. अखेर भाजपाला चेन्नई आणि कोईम्बतूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रत्येकी केवळ एकच जागा पदरात पाडून घ्यावी लागली. या मर्यादित जागावाटपामुळेच अन्नामलाई यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात न उतरता संपूर्ण राज्यात पक्षाचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याचे एनडीएमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. भाजपाच्या उमेदवार निवडीमध्ये झालेला विलंब हा प्रामुख्याने के. अन्नामलाई यांच्या उमेदवारीबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे होता. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासाठी तिकिटाचा पर्याय खुला ठेवला होता, असे या नेत्याने स्पष्ट केले.
जागावाटपाबाबत भाजपाची नाराजी?
२०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात २० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ चारच जागांवर पक्षाला विजय मिळवता आला. यावेळी मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागावाटपात भाजपाच्या वाट्याला २७ जागा आल्या आहेत. मात्र, जागांची संख्या वाढली असली तरीही पक्षाला अपेक्षेप्रमाणे मतदारसंघ मिळाले नाही, अशी कबुली एका नेत्याने दिली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी भाजपाने जागावाटपात जेवढा आक्रमक पवित्रा घेतला होता, तसा यावेळी घेतल्याचे दिसून आले नाही. त्यामागची कारणेही या नेत्याने स्पष्ट केली आहेत. आमच्यासाठी २०२९ ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. तमिळनाडूमध्ये एका प्रबळ मित्रपक्षाशिवाय विजय मिळवणे कठीण आहे, त्यामुळे अधिकच्या जागा मागताना अण्णाद्रमुकचे नेते नाराज होणार नाहीत, याची आमच्या पक्षश्रेष्ठींनी काळजी घेतली असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आश्विनी भिडेच का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या या निर्णयामागची कारणे कोणती?
उमेदवारीबाबत अण्णामलाई काय म्हणाले?
भाजपाने आपल्या सर्व २७ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अण्णामलाई यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. विधानसभा निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय वैयक्तिक नसून संघटनात्मक असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयासाठी मी एक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण राज्यात प्रचार करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. तमिळनाडूत विधानसभेच्या एकूण २३४ जागा असून त्यासाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांचा सत्ताधारी द्रमुक, मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुक आणि प्रसिद्ध अभिनेता विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम पक्ष यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा युतीला ११८ जागांची आवश्यकता असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
