आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : कोकणातील चिपळूण तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला… महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही असून दिल्लीतील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून जागा सोडण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली… महायुती सरकारला घरचा आहेर देणारे भाजपाचे वनमंत्री गणेश नाईक यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक दावा करीत राज्यभरातील आपले नियोजित दौरे रद्द करण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील एएआयबीच्या अहवालावर मंत्री छगन भुजबळ यांनी शंका उपस्थित केली…

कोकणातील बड्या नेत्याने सोडली भाजपाची साथ

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. चिपळूण तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवत भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांविषयी बोलताना भावनिक सूरही लावला. पक्षप्रवेश विश्वासाने होतो; कुणीही सहजपणे आपले जुने राजकीय घर सोडत नाही. तिथे काहीतरी दुखावले गेले म्हणूनच हे कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. आता त्यांना आपलेपणाची जाणीव देणे ही आमची जबाबदारी आहे, असे राणे म्हणाले.

राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरेंना दिल्लीतून फोन?

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून येत्या १६ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या वाट्याला सहा आणि महाविकास आघाडीच्या पदरात एकच जागा पडण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता काँग्रेसने या जागेसाठी आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ही जागा सोडण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे ठेवण्यासाठी काँग्रेसला फक्त महाराष्ट्रातील एका जागेची आवश्यकता आहे. त्याबदल्यात विधान परिषदेची रिक्त होणारी जागा ठाकरे गटाला देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे ठाकरे गट राज्यसभेच्या जागेचा आग्रह सोडणार की आणखीनच ठाम भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा : अरविंद केजरीवालांच्या पुनरागमनामुळे भाजपाच्या गोटात खळबळ का उडाली? कारण काय?

खासदार श्रीकांत शिंदेंची गणेश नाईकांवर टीका

भाजपाचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक व शिवसेना शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. आधी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी एकदा नव्हे तर दोनदा नाईक यांच्या कारभारावर टीकेची तोफ डागली आहे. यादरम्यान महायुती सरकारला घरचा आहेर देणाऱ्या नाईक यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही चांगलेच खडेबोल सुनावले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होतोय असे म्हणत नाईक यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यावर उत्तर देताना बिबट नाही सांभाळता येत तुम्ही वाघाच्या नादी कुठे लागता, असा टोला शिंदे यांनी नाईकांना लगावला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सगळ्यांवर बारकाईने लक्ष असते. इथे हुकूमशाहीचे राज्य नाही असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक दावा करीत राज्यभरातील आपले नियोजित दौरे रद्द करण्याची घोषणा केली आहे. मी समाजासाठी लढतोय म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत आहेत; पण मी मरणाला भीत नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. वर्षभरात आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले असल्याचे जरांगे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास पंधरा मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील, अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून वर्षभर हेच काम पूर्ण करणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा. मला माझे काम करू द्या, असे आवाहनही जरांगे यांनी समाज बांधवांना केले.

हेही वाचा : सामूहिक राजीनाम्यांमुळे भाजपात खळबळ; पक्षातील अंतर्गत कलह धोकादायक वळणावर?

विमान अपघाताच्या अहवालावर भुजबळांना शंका

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील एएआयबीच्या अहवालावर मंत्री छगन भुजबळ यांनी शंका उपस्थित केली आहे. अजित पवार यांचे विमान आधी झाडावर आदळलेले नाही, जर ते झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान झालेले दिसले असते. विमान झाडावर पडल्याचे कोणी पाहिलेले नाही. विमान हवेतून थेट जमिनीवर कोसळताना सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसले, असे भुजबळ म्हणाले. अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे अपघात होऊन एक महिना उलटला आहे. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी राज्यभरातून केली जात आहे. दोन दिवसापूर्वी एएआयबीने विमान अपघाताचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात विमान आधी झाडावर आदळल्याचा दावा करण्यात आला. त्यावर मंत्री भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.