scorecardresearch

फडणवीस यांना नागपुरात ‘तोच’ अनुभव

भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच (१७ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्याचे स्मरण नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालाने करून दिले.

devendra fadanvis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच (१७ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्याचे स्मरण नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालाने करून दिले. राज्यातील सत्तंतरावर बोलताना फडणवीस म्हणाले होते ‘ आम्ही त्यांच्या ( उध्दव ठाकरे) नाकाखालून सरकार नेले आणि ते काहीही करू शकले नाहीत” नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतही हेच झाले. – गडकरी- बावनकुळे-फडणवीस असे बडे नेते, भाजपचे संघटनात्मक,आर्थिक आणि सरकारी पाठबळ असूनही कॉंग्रेसने त्यांच्या नाकाखालून विजय कसा खेचून नेला आणि हे भाजप नेत्यांना कळलेच नाही.

हेही वाचा >>>रामचरितमानस वादात मायावतींची उडी, म्हणाल्या, “संविधान हाच उपेक्षितांचा ग्रंथ”, गेस्ट हाऊस प्रकरणावरून अखिलेश यादवांना टोला

वरील संपर्ण प्रकरणाला संदर्भ आहे तो राज्यातील संत्तांतराचा व त्यावर व्यक्त केलेल्या फडणवीस यांच्या प्रतिक्रियेचा. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले, त्यासाठी शिवसेनेत पडलेली फूट कारणीभूत ठरली व ती घडवणून आणण्याासाठी भाजप नेते देवेंद्रफडणवीस यांची भूमिका महत्वाची होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आले. हे सरकार फार काळ टिकणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार गडगडेल, असे भाकित विरोधी पक्षाने वर्तवले. सेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर फेब्रुवारीत सरकार पडेल,असे जाहीर केले. सरकार कोसळण्याच्या भाकितावर प्रतिउत्तर देताना फडणवीस यांनी १७ डिसेंबरला पत्रकारांशी बोलताना टिप्पणी केली. ते म्हणाले “ त्यांना त्यांचे सरकार टिकवता आले नाही, आम्ही त्यांच्या (उद्धव ठाकरे) नाकाखालून सरकार घेऊन गेलो आणिआमचे सरकार स्थापन केले. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेवर येईल”

हेही वाचा >>>नागपूर: भाजपचा गड सर करणारे अडबाले यांनी दीड वर्षापासूनच केली होती तयारी

फडणवीस यांचे हे वक्तव्य ठाकरे कसे गाफिल राहिले आणि त्यांनी कसा डाव साधला हे सूचित करणारे होते. मात्र एकच महिन्यात फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरेंसारखी वेळ आली.निमित्त ठरले विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे. यात फडणवीस गाफिल राहिले आणि कॉंग्रेसने डाव साधला.

हेही वाचा >>>विधान परिषदेत भाजपची आता कसोटी; विधेयके मंजूर करण्यात अडथळे

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. सर्वकाही म्हणजे सत्ता,पैसा,संघटनात्मक पाठबळ, बड्या नेत्यांची फौज असतानाही भाजपच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसने विजय खेचून नेला आणि हे भाजपला कळलेही नाही. मतपेट्या उघडल्यावरच त्यांना जाग आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडून त्यांच्यावर गाफिल राहण्याचा आरोप करणारे फडणवीस हे सुद्धा शिक्षक मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडींबाबत अनभिज्ञच होते हे पक्षाच्या दारुन परावभवातून स्पष्टट्होते.ही जागा भाजप जिंकणारच असा दावा केला जात होता. उमेदवाराविरुद्ध नाराजी, पक्षांतर्गत मतभेद या सर्व बाबी मान्य करून केवळ फडणवीस-गडकरी-बावनकुळे यांच्या प्रतिष्ठा राखण्यासाठी ही काहीही झाले तरी विजय भाजपचा होईल, असेच प्रयत्न शेवटच्या टप्प्यात होते. खुद्द फडणवीस यांनी दोन वेळा सभा घेतल्या, राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी नागपुरात येऊन शिक्षण संस्था चालकांची बैठक घेऊन अप्रत्यक्षरित्या भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले. गडकरीनी सभा घेतल्या.गडकरी-फडणवीस यांनी सभा घेणे यातूनच भाजपने ही जागा किती प्रतिष्ठेची केली होती हे स्पष्ट होते. काँग्रेसवर टीका, या पक्षाच्या नेत्यांमधील गटबाजी आदी मुद्दे पुढे करून विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपला त्यांच्या पायाखालून वाळू कधी सरकली हे कळलेच नाही. भाजपच्या बालेकिल्ल्यात गाणार ( ८ हजार) यांच्यापेक्षा महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांना दुपट्टीवहून अधिक (१७ हजार) मते आहेत यातूनच भाजप या निवडणुकीत किती गाफिल होता हे स्पष्ट होते. कारण सहापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक (१६ हजार) मते आहेत. नागपुरात भाजप, संघ आणि शिक्षक परिषधेचे नेटवर्क आहे. झालेल्या एकूण ३४ हजार मतदानापैकी एकट्या नागपुरात १३ हजार मतदान झाले होते. जिंकण्यासाठी लागणाऱ्या एकूण मतांपैकी (१६ हजार ) सर्वाधिक मते नागपूरमधून व उर्वरित मतेउर्वरित जिल्ह्यातून (जेथे भाजपचे प्राबल्य आहे) मिळवायचे असे भाजपचे नियोजन होते. याच नियोजनावर गाणार दोन निवडणुका जिंकले होते. त्यामुळे यावेळीही असेच होईल याबाबत भाजप नेते निर्धास्त होते. मात्र विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेटवर्क आणि त्यात काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, बबनराव तायवाडे यांच्यासह इतर नेत्यांनी केलेले नियोजन भाजप नेत्यांवर भारी पडले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 15:59 IST