scorecardresearch

Premium

नवी मुंबईच्या पाणी वादाला शिंदे-नाईकांच्या संघर्षाची किनार ?

भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा रणशिंग फुंकल्याने येथील राजकीय वर्तुळात नाईकांच्या या आक्रमक भूमीकेचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहे.

bjp leader ganesh naik news in marathi, ganesh naik vs srikant shinde news in marathi
नवी मुंबईच्या पाणी वादाला शिंदे-नाईकांच्या संघर्षाची किनार ? (संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून नवी मुंबई शहराला मंजुर झालेला पाण्याचा संपूर्ण हिस्सा मिळाला नाही तर मोरबे धरणातून सिडको उपनगरांना पुरविण्यात येणारे पाणी बंद करु असा इशारा देत भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा रणशिंग फुंकल्याने येथील राजकीय वर्तुळात नाईकांच्या या आक्रमक भूमीकेचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या उल्हासनगर, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांना एमआयडीसीकडून वाढीव पाणी पुरविले जात असताना नवी मुंबईला मात्र पाण्याचा मंजुर हिस्साही मिळत नसल्याचे चित्र आहे. नेमका हाच मुद्दा हाती घेत नाईकांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबईतील त्यांचे कडवे विरोधक असलेल्या मुख्यमंत्री समर्थकांना कोंडीत पकडण्याची खेळी यानिमीत्ताने त्यांनी खेळली आहे. याशिवाय ठाण्याच्या प्रभावाखाली असलेल्या महापालिकेतील प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा यानिमीत्ताने रंगली आहे.

farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
Maratha reservation
मराठा आरक्षण प्रश्नावर सोलापुरात अमदारांच्या घरांसमोर आक्रोश
Mahua Moitra Ashok Chavan
“भाजपाला एक दिवस मी…”, अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावरून महुआ मोइत्रांचा टोला

हेही वाचा : मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात ठाकरे गटात उमेदवारीवरून आतापासूनच संघर्ष

स्वत:चे धरण तरीही पाणी टंचाई

मुंबईनंतर स्वत:च्या मालकिचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालिन पाणी पुरवठा मंत्री आर.आर.पाटील यांच्या मदतीमुळे मोरबे धरण नवी मुंबईच्या पदरात पडले. तत्कालिन महापौर संजीव नाईक यांनी यासाठी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला होता. मोरबे धरणामुळे नवी मुंबई शहर पाण्यासाठी स्वयंपुर्ण झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने त्यानंतर झालेल्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत नाईक कुटुंबियांना त्याचा मोठा फायदा मिळाल्याचे पहायला मिळाले. गेल्या काही वर्षात नवी मुंबईची लोकसंख्या वाढली असून आसपासच्या उपनगरांमधील पाण्याची गरजही वाढली आहे. याच काळात पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्यात महापालिकेला यश आलेले नाही. वाटेल त्या प्रमाणात पाण्याचा उपसा अनेक उपनगरांमध्ये केला जात आहे. मोरबे धरणातील ५० दशलक्ष लिटर इतके पाणी नवी मुंबईला सिडकोच्या उपनगरांना द्यावे लागते. त्यामुळे एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळावे ही महापालिकेची जुनी मागणी आहे. यासाठी ८० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा हिस्साही मंजुर आहे. मात्र एमआयडीसीकडून जेमतेम ५० दशलक्ष लिटर इतकेच पाणी दररोज महापालिकेला मिळत असल्याने ऐरोली, दिघा यासारख्या उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.

हेही वाचा : रोहित पवार यांच्या यात्रेत अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतील एकजुटीचे चित्र

नाईक अजूनही सत्ताधिशांच्या भूमीकेत ?

एमआयडीसीकडून पाणी मिळाले नाही तर सिडको उपनगरांना पाण्याचा पुरवठा बंद करु असा इशारा गणेश नाईक यांनी दिला आहे. मुळात नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तीच पुर्वदिशा असा कारभार याठिकाणी सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील कंत्राटी व्यवस्थेचे सुकाणूनही ठाण्यातून हाकले जात असल्याची चर्चा आहे. नाईकांनी नवी मुंबई महापालिकेवर अनेक वर्षांची सत्ता आहे. मुख्यमंत्र्यांच्या राज्यात महापालिकेच्या पाटातून वाहाणारे पाणी आता नाईकांच्या अंगणात पुर्वीसारखे येत नसल्याची त्यांचे समर्थकही खासगीत मान्य करतात. नवी मुंबईतील मुख्यमंत्री समर्थक अधूनमधून वर्षावारी करत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यावर दबाव निर्माण करत असतात. यामुळे नाईकांचे कडवे विरोधक असलेल्या अनेक नेत्यांना सध्या महापालिकेच्या माध्यमातून ‘अच्छे दिन ’ आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभर नाईकांनी महापालिकेत ठिय्या देत अधिकाऱ्यांना धारेवर धरत मोरबेचे पाणी सिडको उपनगरांना देणार नाही अशी थेट भूमीका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात स्वपक्षीयांचीही नाराजी !

एमआयडीसीचे एककल्ली नियोजन ?

एमआयडीसीच्या बारवी धरणातून दिवसाला ७२० एमएलडी इतका पाण्याचा पुरवठा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील शहरांना होत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांच्या मतदारसंघात मोडत असलेल्या काही उपनगरांना त्यांच्या हिस्स्यापेक्षा अधिक पाणी बारवीतून दिले जाते अशा तक्रारीही पुढे येत आहेत. सध्याच्या राजकीय व्यवस्थेत तर नवी मुंबई हे शहर आडोश्याला गेल्याची कुजबूजही सध्या पहायला मिळते. एकेकाळी संपूर्ण नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील राजकीय व्यवस्थेवर एकहाती अंमल राखणाऱ्या नाईकांसाठी हा बदल अस्वस्थ करणारा ठरु लागला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या पाण्यावरुन त्यांनी दिलेले इशारा हा एकप्रकारे त्यांच्यात आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील छुप्या संघर्षाचा परिणाम तर नाही अशी चर्चाही यानिमीत्ताने सुरु झाली आहे.

“नवी मुंबईच्या हितासाठी गणेश नाईक यांनी नेहमीच आक्रमक भूमीका घेतली आहे. शहरातील सर्व उपनगरांना पुरेसे आणि हक्काचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी घेतलेली भूमीका हे त्यांच्या या शहराविषयीच्या पालकत्वाची जाणीव करुन देणारी आहे. नवी मुंबईकरांच्या पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे हाच संदेश गणेशदादांनी दिला आहे.” – संपत शेवाळे, माजी नगरसेवक भाजप

हेही वाचा : कन्या प्रणितीसाठी सुशीलकुमार शिंदे झाले सक्रिय !

“राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे असताना पाण्यासाठी अशी इशारेबाजी करण्याची वेळ नाईकांवर का आली हा संशोधनाचा विषय आहे. एमआयडीसीचे पाणी शहराला मिळत नसेल तर नाईक इतके दिवस गप्प का होते. त्यांनी हा विषय सरकार दरबारी, अधिवेशनात किती वेळा मांडला. यासाठी किती वेळा प्रत्यक्ष आंदोलन केले या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली तर बरे होईल.” – विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख ठाकरे गट नवी मुंबई

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader ganesh naik mp shrikant shinde politics on navi mumbai water supply print politics news css

First published on: 06-12-2023 at 14:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×