BJP Leader Jagannath Pradhan Arrested : महापालिका आयुक्तांवर हल्ला केल्याप्रकरणी भाजपाचे नेते जगन्नाथ प्रधान यांना तातडीने अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, प्रधान यांना गुरुवारी (३ जुलै) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. “मी तपासात सहकार्य करण्यासाठी येथे आलो आहे. जर माझ्या अटकेमुळे हे प्रकरण मिटणार असेल, तर त्यासाठी कोणत्याही चौकशीला सामोरा जाण्यास मी तयार आहे”, असं प्रधान यांनी माध्यमांना सांगितलं. दरम्यान, कोण आहेत जगन्नाथ प्रधान? त्यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आले? याबाबत जाणून घेऊ…

जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी गेलेल्या भुवनेश्वर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रत्नाकर साहू यांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. अतिरिक्त महापालिका आयुक्तांना मारहाण करणारे लोक हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, असा दावाही त्यांनी केला.

मारहाणीनंतर राजकीय वातावरण तप्त

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात भाजपाचे नेते जगन्नाथ रेडी यांचे नाव समोर आले. त्यावरून ओडिशाच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी पाहायला मिळाल्या. जगन्नाथ प्रधान यांना तातडीने अटक झालीच पाहिजे, या मागणीसाठी राज्यातील आयएएस संघटनेनं आंदोलन सुरू केलं.

आणखी वाचा : काँग्रेस पुन्हा दुभंगणार? पक्षात फूट पडल्याची का होतेय चर्चा?

काँग्रेसची भाजपा सरकारवर टीका

ओडिशात मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं सरकार सत्तेत असल्यानं काँग्रेसनं याच मुद्द्याला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. भाजपा सरकारच्या काळात राज्यात गुंडगिरी सुरू असून, सरकारी अधिकाऱ्यांना दिवसाढवळ्या मारहाण केली जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी अटक वॉरंट काढल्यानंतर भाजपा नेते प्रधान यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. गुरुवारी रात्री उशिरा न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर प्रधान यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयात आत्मसमर्पण केलं. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांना अटक करण्यात आली.

कोण आहेत जगन्नाथ प्रधान?

  • जगन्नाथ प्रधान हे भारतीय जनता पार्टीचे नेते असून, त्यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे.
  • २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगन्नात प्रधान यांना भाजपानं उमेदवारी दिली होती.
  • भुवनेश्वर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली; मात्र प्रधान यांना पराभव झाला.
  • जून २०२० मध्ये प्रधान यांनी भुवनेश्वर भाजपा जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली.
  • जिल्हाध्यक्षांनी निवड करताना पक्षानx आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यावेळी प्रधान यांनी केला होता.
  • गेल्या वर्षी मे २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं प्रधान यांना पुन्हा उमेदवारी दिली.
  • मात्र, या निवडणुकीतही भुवनेश्वर विधानसभा मतदारसंघात त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
  • जगन्नाथ प्रधान यांच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक आरोप असून, एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.
  • विधानसभा निवडणुकीतील निवडणूक अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे १७.५ कोटी आहे.

आयएएस संघटनेकडून आंदोलन मागे

भुवनेश्वर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रत्नाकर साहू यांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर राज्यातील आयएएस संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला. संघटनेच्या अध्यक्ष ज्योती मिश्रा यांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांना सामूहिक रजेवर जाण्याचे आवाहन केले. इतकंच नाही, तर या मारहाणीविरोधात संघटनेनं ठिकठिकाणी आंदोलन केलं. या प्रकरणात पोलिसांनी प्रधान यांच्यासह एकूण सहा जणांना अटक केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

हेही वाचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपाची कोंडी? राज्यघटनेच्या प्रस्तावनेत का होतेय बदलाची मागणी?

ही भाजपाची गुंडगिरी : नवीन पटनायक

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महापालिका आयुक्तांना मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यासोबत त्यांनी एक पोस्टही लिहिली होती. “अधिकाऱ्याला भरदिवसा मारहाण होतानाचा हा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्या कार्यालयातून बाहेर खेचून बाहेर काढण्यात आलं आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. हा हल्ला भाजपा नगरसेवकाच्या उपस्थितीत झाला असून, गुंडगिरी करणारे हे भाजपाचेच कार्यकर्ते आहेत,” असं माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पटनायक पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांना आवाहन करतो की, ज्यांनी अधिकाऱ्यावर हा जीवघेणा हल्ला केला, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे या कटात सहभागी असलेल्या राजकीय नेत्यांना तातडीने अटक झाली पाहिजे, जेणेकरून सरकारी अधिकाऱ्यांवर कुणाची हात उगारण्याची हिंमत होणार नाही.”