आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : नाशिकमधील महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर होताच भाजपाच्या शहराध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिला… दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमान अपघाताच्या आधी केलेल्या एका फोन कॉलचे रेकॉर्डिंग समोर आले… मनोज जरांगे पाटील यांना ठार मारण्याची भाषा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची ऑडिओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना छोट्या व खासगी विमानाने प्रवास टाळण्याचा सल्ला देणार असल्याचेही विधान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले… अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व गेल्यावर सत्तेचा लाभ उठविण्यासाठी चिल्या-पिल्लांचा सुळसुळाट वाढत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या आमदाराने केली. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
भाजपाच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
नाशिकमधील महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर होताच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेला या निर्णयामुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत मिळवले. या निवडणुकीत लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना फारसे विचारात घेतले गेले नसल्याची स्थानिक पातळीवर भावना आहे. निकालानंतर ही अस्वस्थता शहराध्यक्षांच्या राजीनाम्यातून समोर आल्याची चर्चा आता पक्षाच्या वर्तुळात होत आहे. मंगळवारी मंत्री महाजन यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी नावे जाहीर केली आणि दुसऱ्याच दिवशी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आल्याने भाजपातील नाराजींच्या चर्चांनी अधिकच जोर धरला. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर केदार यांची चर्चा होणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे ते राजीनाम्याचा निर्णय मागे घेणार की कायम ठेवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल कोणाला?
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २९ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. यादरम्यान अजित पवार यांनी विमान अपघाताच्या आधी केलेल्या एका फोन कॉलचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. खुद्द अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांनी माध्यमांसमोर हे फोन रेकॉर्डिंग ठेवले आहे. अजितदादा कायम कामासाठी तत्पर असायचे. सातत्याने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. २९ जानेवारी रोजी मी त्यांना मॅसेज केला होता. त्यावर ८ वाजून ३७ मिनिटांनी त्यांनी मला कॉल केला. अखेरच्या कॉलवर अजितदादांनी मी सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन काम करतोय. आपण सगळ्यांना न्याय देण्याचे नक्की काम करू आणि तू निवांत राहा असे आपल्याला सांगितल्याचे श्रीजीत पवार म्हणाले. कधी काही अडचण आली तर मी नेहमीच अजितदादांना मॅसेज करायचो. त्यावर लगेचच त्यांचा मला कॉल येत होता. कुठल्याही व्यक्तीने त्यांना फोन-मेसेज केला तरी त्याला अजितदादा उत्तर द्यायचे, असेही श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आणखी वाचा : राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना कसे लक्ष्य केले? काँग्रेसची नेमकी रणनीती काय?
मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना ठार मारण्याची भाषा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची ऑडिओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जरांगे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलिसांकडे चौकशीची मागणी केली आहे. एका मद्यपी व्यक्तीने जरांगे यांच्या समर्थकांना फोन करून ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे- धमकी देणाऱ्या ऑडिओ क्लीपमध्ये थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव घेण्यात आले आहे. लोकसत्ता या ऑडिओ क्लिपची पुष्ठी करत नाही. यादरम्यान ही ऑडिओ क्लीप नेमकी कोणाची आहे आणि त्यात कोणकोणत्या व्यक्तींमध्ये संभाषण झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मराठा समाजाचे लढवय्या मावळे म्हणून जरांगे यांची ओळख आहे. गेल्या वर्षी त्यांनी आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने हैदराबाद गॅझेटची अधिसूचना जारी करत नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे आदेश दिले होते.
अनिल देशमुख गडकरींना कोणता सल्ला देणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत केवळ विरोधकांनाच नव्हे तर सत्ताधारी गोटातील आमदारांनाही शंका असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना छोट्या व खासगी विमानाने प्रवास टाळण्याचा सल्ला देणार असल्याचेही विधानही त्यांनी यावेळी केले. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचा विमान अपघात झाला होता. बारामती विमानतळ परिसरात धुके असल्याने वैमानिकाला धावपट्टी न दिसल्याचा प्राथमिक दावा करण्यात आला होता. मात्र, याच मुद्द्यावर देशमुख यांनी संशय व्यक्त केला. अपघातापूर्वी विमान हवेतच तिरके झाल्याचा चित्रफित समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. हा व्हिडीओ लांबून चित्रीत करण्यात आला असल्याने धुके असल्यास असे चित्रीकरण शक्य होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घटनेची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्रपणे व्हावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. गडकरी यांची विमानतळावर भेट झाल्यास मी त्यांना खासगी विमानाने प्रवास टाळण्याचा सल्ला देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : पुण्याच्या नव्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची राजकीय कसरत
आमदार जानकर यांचे विलीनीकरणावर भाष्य
अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व गेल्यावर सत्तेचा लाभ उठविण्यासाठी चिल्या-पिल्लांचा सुळसुळाट वाढत असल्याची टीका शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एपीबी माझाशी बोलताना केली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या (शरद पवार व अजित पवार) विलीनीकरणापूर्वी विचारधारा एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भाजपाप्रणीत महायुतीबरोबर सत्तेत जायचे की नाही हा निर्णय फक्त शरद पवार हेच घेतली. आधी विचारधारेचा निर्णय होऊ द्या आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा नंतरचा विषय असेल असेही जानकर यांनी स्पष्ट केले. याआधी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या; पण आता अजितदादाच नाहीत, शरद पवार यांचा विचार हा फुले-शाहू-आंबेडकर यांचा आहे, तर अजितदादा ज्यांच्याबरोबर सत्तेत होते त्यांचा विचार गुलामगिरीचा असल्याची बोचरी टीकाही आमदार जानकर यांनी केली. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनाही टोला लगावला.

