scorecardresearch

Tripura Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविणार

हिमाचल प्रदेशची सत्ता गमावल्यानंतर त्रिपुरा राज्यात होणाऱ्या निवडणुकीची भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

Tripura elections 2023
त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते प्रचारात उतरणार

राज्यांमध्ये असलेली आपली सत्ता टिकवून ठेवणे, हे भाजपासमोरील पुढील दोन वर्षांची मोठी कसरत असणार आहे. नुकतेच हिमाचल प्रदेशमधील सत्ता भाजपाने गमावली आहे. तर पंजाबमध्ये भाजपाला फारसे यश मिळाले नाही. त्रिपुरा देखील त्याला अपवाद नाही. त्रिपुरामधील सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने मेगा प्लॅन तयार केला असून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मोठमोठ्या नेत्यांचा समावेश आहे. त्याप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः प्रचारासाठी उतरणार आहेत. भाजपाचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मोदी हे पश्चिम आणि दक्षिण त्रिपुरा येथे जाहीर सभा घेणार असल्याचे ते म्हणाले. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर त्याचा निकाल २ मार्च रोजी लागेल.

हे वाचा >> आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलेल्या आव्हानावर शहाजीबापू पाटील यांचा पलटवार, म्हणाले, “आम्ही फाटक्या माणसाकडून..”

आगरताळा येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना नबेंदू भट्टाचार्य म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शाह देखील राज्याचा दौरा करणार आहेत. याआधी अमित शाह ५ जानेवारी २०२३ रोजी जन विश्वास यात्रेला झेंडा दाखविण्यासाठी आले होते. आता अमित शाह हे ६ आणि १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा दौरा करणार असून या दोन दिवसात ते तब्बल १० जाहीर सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.

डाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाची योजना

त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांना तोंड देण्यासाठी भाजपाने नियोजन केले आहे. डाव्यांच्या जाहीरनाम्यावर टीका करताना भाजपाकडून सांगण्यात आले की, विरोधकांना माहीत आहे, ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत. म्हणूनच काढून टाकण्यात आलेल्या १०, ३२३ शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्यासारखे लोकप्रिय आश्वासन ते देत आहेत. सध्या भाजपा आणि त्यांच्या युतीत असलेल्या आयपीएफटी पक्षाने अद्याप आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. नबेंदू भट्टाचार्य म्हणाले की, आम्ही लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करु.

हे वाचा >> शिंदे – फडणवीस सरकार सत्तारुढ झाल्यानंतर जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च; RTI मधून ‘एवढी’ रक्कम उघड

नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी प्रचारासाठी उतरणार

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी त्रिपुराचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत स्मृती इराणी, केंद्रीय राज्य मंत्री प्रतिमा भौमिक, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तसेच पुढील काही दिवसांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, अर्जुन मुंडा आणि स्मृती इराणी यांसारख्या स्टार प्रचारकांसह जे.पी. नड्डा पुन्हा एकदा त्रिपुरात प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग असे प्रमुख प्रचारकही असतील, असे पक्षाच्या सूत्राने सांगितले. अभिनेत्री हेमा मालिनी, मिथुन चक्रवर्ती, मनोज तिवारी, आशिम सरकार आदी सेलिब्रिटी देखील प्रचार सभांमध्ये दिसतील.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 20:05 IST