Punjab Local Body Election Results 2026 : पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीने एकहाती वर्चस्व राखत एकूण १,९७७ वॉर्डांपैकी तब्बल ९५८ जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर आगामी विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये सत्तास्थापनेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला केवळ १७२ जागांवरच समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे, ही निवडणूक मतपत्रिकेवर घेण्यात आली होती. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मतदारांचे आभार मानले. जनतेने द्वेषाचे राजकारण नाकारून विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोणत्या पक्षाने किती जागांवरच मिळवला विजय?

पंजाबमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील आठ महानगरपालिका, ७५ नगर परिषदा आणि २० नगर पंचायतींसाठी २६ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीकडे विधानसभेची जनमत चाचणी म्हणून पाहिले जात होते. त्या अनुषंगाने सत्ताधारी आम आदमी पार्टीला शह देण्यासाठी भाजपाने मोठी तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालांनुसार, आपने १९७७ पैकी तब्बल ४८ टक्के जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या, तर काँग्रेस पक्ष ३९७ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याशिवाय २५१ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारत तिसरे स्थान मिळवले. शिरोमणी अकाली दलाला अवघ्या १९२ जागांवर समाधान मानावे लागल्याने ते चौथ्या स्थानावर फेकले गेले. भाजपा या निवडणुकीत १७२ जागांसह पाचव्या क्रमांकावर राहिला असला, तरी त्यांनी आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली. गेल्या निवडणुकीतील ४९ जागा जिंकणाऱ्या या पक्षाने यंदा १७२ जागांपर्यंत मजल मारत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात आपला जनाधार वाढवला. याशिवाय, बहुजन समाज पक्षाला सात जागांवर विजय मिळवता आला.

महत्वाच्या महापालिकांवर ‘आप’ची एकहाती सत्ता

पंजाबमधील एकूण आठ पैकी पाच महानगरपालिकांवर सत्ताधारी आम आदमी पार्टीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामध्ये बर्नला, बटाला, मोगा, मोहाली आणि भटिंडा या महापालिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आपने जिंकलेली ‘बर्नला’ ही महानगरपालिका भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लो यांचा बालेकिल्ला मानली जाते, जिथे भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर शहरांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळाली. कपूरथला महानगरपालिकेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले, तर अबोहरमध्ये भाजपाने विजय मिळवला. दुसरीकडे, पठाणकोटमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, मात्र येथे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. या निकालांमुळे २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी आम आदमी पक्षाला मोठे राजकीय बळ मिळाले आहे. उत्तर भारतातील विरोधी पक्षांच्या सत्तेखालील मोजक्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंजाबचा समावेश होतो. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही विरोधी पक्षांचे सरकार आहे.

निकालानंतर सत्ताधाऱ्यांचे भाजपाला चिमटे

निवडणूक निकालांनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जनतेने त्यांच्या सरकारच्या कामकाजावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपाचा ‘ईडी पक्ष’ असा उल्लेख केला. पंजाबमधील ईडीच्या कारवाया आणि कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या अटकेचा मतदारांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ते म्हणाले. जनतेने भाजपाला पूर्णपणे नाकारले असून हा पक्ष पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यांचा माजी मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलालाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. आपने एकट्याने या चारही पक्षांच्या एकत्रित जागांपेक्षा अधिक जागा जिंकल्या, असे भगवंत मान यांनी सांगितले. यादरम्यान आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही भाजपाला लक्ष्य केले. पंजाबच्या जनतेने ‘ईडी पक्षाला’ चोख उत्तर दिले आहे. ईडीच्या जोरावर केलेले राजकारण राज्यात अजिबात चालणार नाही, असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपाच्या तब्बल १,१४२ उमेदवारांनी आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) गमावली असल्याचा दावाही त्यांनी केला.

निवडणुकीचा इतिहास आणि ‘उलटफेर’ पॅटर्न

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विधानसभा निवडणुकांची उपांत्य फेरी मानले जात असले, तरी पंजाबमध्ये यापूर्वी अनेकदा वेगळे चित्र पाहायला मिळाले आहे. २०१५ मध्ये शिरोमणी अकाली दल-भाजपा युतीने राज्यातील १,४२० जागांवर दणदणीत विजय मिळवला होता, तर काँग्रेसला केवळ ३५६ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र अवघ्या दोन वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११७ पैकी ७७ जागा जिंकून राज्यात एकहाती सत्तास्थापन केली होती, तर अकाली दल-भाजपा युती केवळ १८ जागाच जिंकता आल्या होत्या. असाच कल २०२१ च्या महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्येही दिसून आला. त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसने महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील १,५१६ जागा जिंकल्या होत्या. मात्र, काही महिन्यांनंतर झालेल्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ १८ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला काही ठिकाणी यश मिळाले असले तरी, लोकसभा निवडणुकीतील यशाची लाटेचे तळागाळातील मजबूत संघटनेत रूपांतरित करण्यात पक्षाला अपयश आल्याची चर्चा सुरू झाली. पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणामुळे अनेक शहरांमध्ये पक्षाचे नुकसान झाल्याची कबुलीही काही नेत्यांनी दिली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी या खराब कामगिरीसाठी एकमेकांवर खापर फोडल्याचे समजते. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील १३ पैकी ७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, स्थानिक निवडणुकांतील अपेक्षेपेक्षा खराब कामगिरीमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे दिसून येते. या निकालांमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची राजकीय पकड आणखी मजबूत झाल्याचे मानले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत या राजकीय समीकरणांवर नक्कीच परिणाम होईल, अशी आशा आम आदमी पार्टीचे नेते बाळगून आहेत.