मुंबई : भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी रखडली असून सदस्यांच्या नावांची यादी केंद्रीय नेत्यांच्या मंजुरीसाठी नवी दिल्लीला पाठविण्यात आली आहे, मात्र त्यांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आपल्या नवीन कार्यकारिणीवर राजेश शिरवडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी व श्वेता परूळकर या चार सरचिटणीसांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मात्र उपाध्यक्ष, सचिव व अन्य नियुक्त्या प्रलंबित आहेत.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती होवून दोन-तीन महिने उलटले आहेत. नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतर प्रदेश आणि मुंबई प्रदेशचे सरचिटणीस, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जातात. पण अद्याप नवीन संपूर्ण कार्यकारिणीची घोषणा चव्हाण व साटम यांनी केलेली नाही.

या दोन्ही नेत्यांनी कार्यकारिणीतील नावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यादी निश्चित केली आहे. साटम यांनी फक्त सरचिटणीसांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तर प्रदेश कार्यकारिणीची यादी केंद्रीय सह संघटन सरचिटणीस शिवप्रकाश व अन्य नेत्यांच्या मंजुरीसाठी नवी दिल्लीला पाठविण्यात आली आहे.

अनेक फेरबदल होणार?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपच्या प्रदेश व मुंबई कार्यकारिणीत अनेक बदल होण्याची शक्यता आहे. काही सरचिटणीस व उपाध्यक्षांना वगळून त्यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन कार्यकारिणीची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर करण्याचे नियोजित होते. पण केंद्रीय नेत्यांची मंजूरी न मिळाल्याने यादी रखडली असून मुंबई कार्यकारिणी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ नेत्याने सांगीतले.

प्रदेश कार्यकारिणीतील काही नावांना केंद्रीय नेत्यांचा आक्षेप असून त्याऐवजी नवीन नावांवर विचारविनिमय सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून ज्यांना कार्यकारिणीत स्थान मिळणार नाही, ते नेते नाराज होतील. निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू नये, यादृष्टीनेही कार्यकारिणी योग्य वेळी जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.