Premium

‘मेक इन गडचिरोली’ उपक्रम भाजपाच्याच अंगलट!

आरोप करणारे हे बहुतांश भाजपचेच कार्यकर्ते व पदाधिकारी असल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे

make in gadchiroli-bjp
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सुमित पाकलवार, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली: देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमलात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ या प्रकल्पाच्या धर्तीवर गडचिरोलीत भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सुरू केलेला ‘मेक इन गडचिरोली’ हा प्रकल्प फसवणुकीच्या आरोपामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. यात आरोप करणारे हे बहुतांश भाजपचेच कार्यकर्ते व पदाधिकारी असल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या विजयानंतर भाजपाने नवनवीन उपक्रम हाती घेतले. त्यात ‘मेक इन इंडिया’ पंतप्रधानांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून पुढे करण्यात आला. त्याच दरम्यान गडचिरोली विधानसभेतील भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी देखील जिल्ह्यात उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मेक इन गडचिरोली’ नावाच्या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकलापाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी जिल्हाभर यात्रा देखील काढली होती. कुकुटपालन, मत्स्योत्पादन, भात गिरणी, अगरबत्ती प्रकल्प, यंत्र सामुग्री खरेदी यासारख्या उद्योगांना सरकारी योजनांमधून ८० ते १०० टक्के अनुदान मिळवून देऊ असे सांगितले होते. या प्रकल्पामध्ये श्रीनिवास दोंतुला ही व्यक्ती त्यांच्या सोबतीला होती. दरम्यानच्या काळात अनेकांनी उद्योग स्थापनेसाठी चांगली संधी उपलब्ध झाल्याचे समजून ‘मेक इन गडचिरोली’ मध्ये रस दाखविला. दोंतुलाने कागदपत्रांची पूर्तता करून इच्छुकांकडून लाखो रुपये घेतले. त्याबदल्यात सर्वांना त्याच रकमेचे धनादेश देखील दिले. मात्र, उद्योगांना कर्ज मंजूर झाल्यानंतर अनेकांना अनुदान मिळालेच नाही. परिणामी अनेकांचे उद्योग डबघाईस आले. जेव्हा त्यांनी दोंतुलाकडे दिलेल्या पैश्यांची मागणी केली तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. धनादेश सुध्दा बनावट निघाले. दोन ते तीन वर्ष प्रयत्न करून देखील ते पैसे परत मिळाले नाही. इकडे कर्जाचे हप्ते सुरू होते. जवळपास ५० ते ६० लोकांची अशाप्रकारे फसवणूक झाली. फसवणूक झालेले बहुतांश भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत.

आणखी वाचा- कोल्हापूरातील महाडिक-पाटील संघर्ष आता राजराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत

‘मेक इन गडचिरोली’ प्रकल्प सुरू करून श्रीनिवास दोंतुला याला समोर करणारे आमदार होळीं यांच्याकडे फसवणूक झालेल्या लाभार्थ्यांनी पैश्याची मागणी केली. मात्र, त्यांनी हात वर केल्याने पिडीत नागरिकांनी थेट होळींविरोधात आंदोलन उभे केले. होळी यांनी हे सर्व राजकीय षडयंत्र असल्याचे सांगून वेळोवेळी आरोपांचे खंडन केले खरे, पण पीडितांकडे असलेले दस्ताऐवजाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याची पोलीस तक्रार होऊन देखील अद्याप चौकशी झाली नाही. दरम्यानच्या काळात दोंतुला फरार झाला. पण चौकशी झाली नाही. आता वेळोवेळी पीडित आंदोलन करताना दिसून येतात. आंदोलनात दिसणारे भाजपचे कार्यकर्ते भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या गोटात वावरणारे आहेत. होळी आणि नेते यांच्यातील सख्य जिल्ह्याला परिचित असल्याने ‘मेक इन गडचिरोली’ विरोधातील आंदोलनाला या दोघातील अंतर्गत वादाची किनार असल्याचे देखील बोलल्या जाते. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते संधी मिळूनही गप्प राहणेच पसंत करताहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp make in gadchiroli project stuck in controversy print politics news mrj

First published on: 21-03-2023 at 10:12 IST
Next Story
कोल्हापूरातील महाडिक-पाटील संघर्ष आता राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत