सौरभ कुलश्रेष्ठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी येईल आणि पुढील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एका तरुण व आक्रमक चेहऱ्याची निवड भाजप प्रदेशाध्यक्षपदावर होईल, असे समजते. त्यात मंत्रिमंडळात अपेक्षित असलेला एक प्रमुख नेता प्रदेशाध्यक्षपदी नेमून भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुदत संपत आहे. शिवाय आता महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस युतीचे सरकार आल्याने केंद्रीय नेतृत्वाचे विश्वासू चेहरे या मंत्रिमंडळात असतील. त्यात काही नव्या लोकांनाही संधी मिळेल. चंद्रकांत पाटील यांनी मागील फडणवीस सरकारच्या काळात महसूल व सार्वजनिक बांधकाम अशा दोन महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद भूषवले होते. चंद्रकांत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासातील आहेत. त्यामुळे आता नवीन सरकारमध्येही चंद्रकांत पाटील यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा आहे. 

राज्यात सत्तांतर होऊन नवे सरकार स्थापन होत असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अचानक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा आदेश देत मोठा धक्का दिला होता.  तसेच धक्कातंत्र चंद्रकांत पाटील यांच्या जागेवर नवीन भाजप प्रदेशाध्यक्ष नेमतानाही भाजपाचे केंद्रीय नेतृत्व वापरणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबर या सरकारमध्ये मंत्री कोण कोण असणार याबाबत विविध याद्या समाज माध्यमांमधून फिरू लागल्या. फडणवीस सरकारमधील शेवटच्या सहा महिन्यांत मंत्री पदाची जबाबदारी मिळालेल्या एक तरुण व आक्रमक नेत्याचे नावही स्वाभाविकपणे संभाव्य मंत्र्यांच्या यादीत चर्चिले जात आहे.‌ या नेत्याला कोणते महत्त्वाचे खाते मिळेल याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र त्याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी केंद्रीय नेतृत्व एका तरुण व आक्रमक चेहऱ्याच्या शोधात आहे. सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रमुख असतील. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी  बहुजन समाजातील एखादा तरुण व आक्रमक नेता असावा. भाजप संघटनेतील अंतर्गत खाचाखोचा जाणणारा व केंद्रीय नेतृत्वाशी संवाद असलेला असावा, असा विचार सुरू झाला आहे. 

देवेंद्र फडणवीस हे दहा वर्षांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले. त्यातून मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्र भाजपाला एक तरुण व आक्रमक चेहरा मिळाला. मात्र त्यानंतर महाराष्ट्रभर पकड असलेला दुसरा भाजप नेता तयार होण्यात विविध अडचणी आल्या. आता मात्र पक्षाच्या भविष्याचा विचार करून एक तरुण व आक्रमक चेहरा प्रदेशाध्यक्षपदी नेमून महाराष्ट्र भाजपामध्ये नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा विचार असल्याचे समजते. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp may appoint new young and aggressive face as a state president of the party print politics news pkd
First published on: 05-07-2022 at 11:04 IST