आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने थेट ठाकरे गटाला महापौरपदाची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आपले सर्व नगरसेवक पंचतारांकित हॉटेलात ठेवले, याचा खुलासा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला… वसई-विरार महापालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाने ऑपरेशन लोटसची तयारी केल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… गझनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोजर चालवला असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली… नागपूर महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपाकडून ठाकरे गटाला महापौरपदाची ऑफर?

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने थेट शिवसेना ठाकरे गटाला महापौरपदाची ऑफर दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूर महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपाने २३ आणि शिवसेना ठाकरे गटाने सहा जागांवर विजय मिळवला. त्याशिवाय जनविकास सेना तीन, वंचित बहुजन आघाडी दोन आणि शिवसेना शिंदे गट, बहुजन समाज पार्टी व एमआयएमने प्रत्येकी एक जागा आपल्या पदरात पाडून घेतली. या निकालानंतर भाजपा व काँग्रेसने महापालिकेवर सत्तास्थापन करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. यादरम्यान भाजपाने शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळविण्यासाठी जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांना थेट महापौर पदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटाची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिंदे यांनी नगरसेवक हॉटेलात का ठेवले?

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाच्या युतीला काठावरचे बहुमत मिळाले. त्यामुळे महापालिकेत युतीचाच महापौर बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नवनिर्वाचित नगसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच शिंदे गटाला आपले नगरसेवक फुटण्याची भीती असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यादरम्यान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी नगरसेवकांना हॉटेलात नेमके का ठेवण्यात आले, याबाबतचा खुलासा केला आहे. आम्ही युती म्हणूनच महापालिकेत सत्तास्थापन करणार आहोत. आमचे जवळपास २० नगरसेवक हे नवीन असल्यामुळे त्यांना महापालिकेच्या कामकाजबद्दल फारशी माहिती नाही. नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही दोन दिवसांचे शिबीर घेतले आहे. त्यामुळेच त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले, असे शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : शिंदे गटाला धक्का देण्याची तयारी? महापौरपदासाठी ठाकरे-फडणवीसांमध्ये चर्चा? महायुतीत चाललंय तरी काय?

भाजपाची ऑपरेशन लोटसची तयारी?

वसई-विरार महापालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाने ऑपरेशन लोटसची तयारी केल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हायरल पोस्टवर बहुजन विकास आघाडी पक्षाचे प्रमुख व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांनी त्यांना (भाजपाला उद्देशून) आधीच धडा शिकवला आहे. आता नसते धंदे करत बसले तर त्यांच्या तोंडात शेण घातले जाईल. त्यांनी दीड वर्षात काय दिवे लावले हे लोकांनी पाहिलं, अशा शब्दात ठाकूर यांनी भाजपावर टीका केली आहे. आमचे नगरसेवक उत्तम काम करून जनतेच्या समस्या सोडवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीत ११५ पैकी ७० जागेवर दणदणीत विजय मिळवून बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे; तर भाजपाला केवळ ४३ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. यादरम्यान समाजमाध्यमावर ऑपरेशन लोटसची एक पोस्ट व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची टीका

गझनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोजर चालवला, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते मुंबईतील टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून आहेत. त्यामुळेच त्यांनी अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट केल्याचा संताप सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या अंगात गझनीच्या महमूदचे भूत शिरले आहे. अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजपा व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला आहे. अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये वाराणसीत मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर १० जानेवारी रोजी भाजपा सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला आणि अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना केली, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा : BMC Results 2026 Analysis : मुंबईत सर्वाधिक फटका कोणाला? शिंदेंना की ठाकरेंना? आकडेवारी काय सांगते?

पराभव होताच राष्ट्रवादीच्या नेत्याचा राजीनामा

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल ७८ उमेदवार रिंगणात असतानाही पक्षाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांनी त्याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांना पाठविले आहे. विशेष बाब म्हणजे- या निवडणुकीत दुनेश्वर पेठे स्वतः उमेदवार होते. मात्र त्यांनाही आपला प्रभाग राखता आला नाही. भाजपचे उमेदवार नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी त्यांचा पराभव करत महत्त्वपूर्ण विजय मिळवला. या निकालामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यादरम्यान पेठे यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्याने नागपुरातील शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे.