आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने महापालिकेवर सत्तास्थापन केली… छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत टोकाचे वाद होत असून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचले… राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित केले… काचेच्या घरात राहणाऱ्यांनी उगाच दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपाच्या उपमहापौरांना दिला… काँग्रेसच्या नकारात्मक फॉर्म्युल्याला राज्यातील जनतेने नाकारले असून आता तरी त्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरे गटाच्या पाठिंब्याने भाजपाचा महापौर

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने महापालिकेवर सत्तास्थापन केली. यादरम्यान महापौरपद प्रत्येकी सव्वा सव्वा वर्ष विभागून घेण्याचा लेखी करारही दोन्ही पक्षांमध्ये झाला. त्यानुसार, भाजपाच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी अवघ्या एका मताने निवड झाली, तर उपमहापौर पदी ठाकरे सेनेचे प्रशांत दानव ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले. चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला होता. या निवडणुकीत ६६ पैकी २७ जागा जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यापाठोपाठ भाजपाने २३, ठाकरे गटाने सहा जागा वंचित बहुजन आघाडी व अपक्षांनी प्रत्येकी दोन आणि शिंदेसेना, बसपा, एमआयएमने प्रत्येकी एक जागा आपल्या पदरात पाडून घेतली होती. पालिकेत बहुमताने सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाला ११ तर काँग्रेसला अवघ्या सात नगरसेवकांचा पाठिंबा हवा होता. तेव्हापासून महापौर व उपमहापौर कोण असणार याची चर्चा सर्वत्र सुरू होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसवर खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे पराभवाची नामुष्की ओढवली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत सुप्त संघर्षाच्या ठिणग्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत टोकाचे वाद होताना दिसून येत आहे. उपमहापौरपदावरून पालकमंत्री संजय शिरसाट व राजेंद्र जंजाळ यांच्यात सुरू असलेल्या वादात आणखीनच सुप्त संघर्षाची ठिगणी पडली आहे. मंगळवारी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या आधी राजेंद्र जंजाळ यांचे समर्थक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आले आणि त्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या. इतक्यावरच न गुलाल उधळत त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचण्याचे काम केले. ‘जिसका गुरू बलवान चेला पैलवान’ असे बॅनर जंजाळ समर्थकांकडून शिरसाटांसमोर झळकावण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने दणदणीत यश मिळवून ५६ जागा जिंकल्या. बहुमतासाठी एका जागेची गरज असल्याने त्यांनी शिंदे गटाचा पाठिंबा घेतला. त्यासाठी त्यांना उपमहापौरपदही देण्यात आले. शिरसाट यांना उपमहापौर पद त्यांच्या गटातील माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना द्यायचे होते; पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे नाव पुढे केले. त्यामुळे शिरसाटांची नाराजी झाली आणि संघर्ष सुरू झाला.

आणखी वाचा : लोकसभा अध्यक्षांना पदावरून कसे हटवता येते? ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव कशासाठी?

अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचे प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजितदादांचा बारामतीला जाण्याचा दौरा ऐनवेळी बदलला की कुणाकडून बदलण्यात आला हे पाहावे लागेल असे रोहित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा खूप काळजी घ्यायचे. त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणीही प्यायचे बंद केले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकाबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार ज्या विमानातून जाणार होते त्याचे वैमानिक ऐनवेळी का बदलवण्यात आले? अपघाताआधी विमानातून अलर्टचा आवाज का आला नाही? टेक ऑफ पूर्वी विमानाचे व्यवस्थित निरीक्षण करण्यात आले होते का? विमानात काय बिघाड झाला होता? असे प्रश्नही आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले.

नरेश म्हस्के यांचा भाजपाच्या उपमहापौराला इशारा

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी उगाच दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपाचे नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांना दिला. उपमहापौर पदाची धुरा हाती घेताच दशरथ भगत यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या मागणीला पुढे नेत प्रशासनातील व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी उपमहापौर भगत यांच्यावर तोंडसुख घेतले. वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे गट नेते सागर नाईक आणि भाजपाचे नवी मुंबईतील पदाधिकारी सातत्याने गेल्या ६ वर्षातील महापालिकेच्या प्रशासनामार्फत झालेल्या व्यवहारांची चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत आहेत. उपमहापौर दशरथ भगत यांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दला आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी नाराजी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : BMC Deputy Mayor : शिंदेंचे कट्टर टीकाकार ते मुंबईचे उपमहापौर; संजय घाडी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समितींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या; तर काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. या अभूतपूर्व विजयावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेसच्या नकारात्मक फॉर्म्युल्याला राज्यातील जनतेने नाकारले असून आता तरी त्यांनी आत्मचिंतन करावे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी नागपुरात बोलताना केले. जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये महायुतीने केवळ विकासाच्या मुद्द्यावरून प्रचार केला. तर विरोधकांनी केवळ नकारात्मकतेचा मार्ग निवडला. भाजपचा पराभव झाला तर आमचा कार्यकर्ता आत्मचिंतन करून पुन्हा कामाला लागतो, मात्र काँग्रेसकडे केवळ टीका करण्याचाच फॉर्म्युला आहे. मात्र जनतेने त्यांचा फॉर्म्युला नाकारला असल्याची टीकाही त्यांनी केली.