Vijay Shah Controversial Statement: गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे मंत्री विजय शाह वादात सापडले आहेत. पाकिस्तानवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकसंदर्भात पत्रकार परिषदांमधून देशाला अवगत करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर देशभरातून कोतुकाचा वर्षाव होत असताना मंत्री विजय शाह यांनी मात्र त्यांचा उल्लेख ‘पाकिस्तानची बहीण’ असा केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनीदेखील भाजपाला यावरून घेरायला सुरुवात केली आहे. मात्र, मध्य प्रदेश भाजपा विजय शाह यांच्या बचावासाठी सरसावल्याचं पाहायला मिळत आहे.

विजय शाह यांनी केलेल्या विधानानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मध्य प्रदेशमधील भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेतेमंडळींची गुरुवारी १५ मे रोजी रात्री उशीरा सविस्तर बैठक झाली. या बैठकीमध्ये सत्ताधारी भाजपाने आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विजय शाह यांचा राजीनामा घेण्याचा मुद्दा सध्या विचारात नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री मोहन यादव?

भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या संपूर्ण प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली. “मला या सगळ्या प्रकरणावर एवढंच म्हणायचंय की माननीय न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत आणि राज्य सरकारनं त्या आदेशांचं पालन करायचं ठरवलं आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गावरून आम्ही चालत राहू”, असं मोहन यादव म्हणाले.

“काँग्रेसनं सिद्धरामय्यांचा राजीनामा मागायला हवा. काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांच्या विरोधा गुन्हे दाखल आहेत. पण काँग्रेस फक्त विधानं करू शकते. काँग्रेसनं आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिलं होतं. ते असे मुख्यमंत्री आहेत जे तुरुंगात गेले होते. तेव्हा काँग्रेस कुठे होती? या मुद्द्यावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. काँग्रेसनं जेवढी निर्लज्जपणाची मर्यादा ओलांडली आहे, तेवढी कुणीच ओलांडली नाही”, अशा शब्दांत मोहन यादव यांनी काँग्रेसच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं.

राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं पक्षाचं मत

दरम्यान, बुधवारी रात्री मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेश भाजपा अध्यक्ष व्ही. डी. शर्मा व जनरल सेक्रेटरी हितानंद शर्मा यांनी बैठक घेऊन यावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली आहे. “या सर्व नेत्यांचं या भूमिकेवर एकमत झालं आहे की जर उच्च न्यायालयाने शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसेल, तर त्यासाठी आग्रह धरण्याची गरज नाही”, अशी माहिती पक्षातील एका वरीष्ठ नेत्याने दिली. शाह यांचा राजीनामा म्हणजे आपला विजयच असल्याचं काँग्रेस दाखवण्याचा प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपाचे अनेक मंत्री काँग्रेसच्या टार्गेटवर?

दरम्यान, भाजपाचे अनेक मंत्री काँग्रेसच्या टार्गेटवर असल्याचं पक्षातील एका नेत्याने सांगितलं. “सरकारमधील अनेक मंत्री काँग्रेसच्या टार्गेटवर आहेत. अशा परिस्थितीत भाजपानं कोणत्याही दबावाखाली येता कामा नये”, असं पक्षातील एका नेत्याने सांगितलं. प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानाचा यावेळी त्यांनी दाखला दिला.

शाह यांचं विधान चुकीचं, पण…

दरम्यान, विजय शाह यांचं विधान चुकीचं असलं, तरी त्यांनी ते कोणत्याही प्रकारे सामाजिक द्वेषाच्या भावनेतून केलेलं नव्हतं, यावर वरीष्ठ नेत्यांचं एकमत असल्याची माहिती आणखी एका भाजपा नेत्याने दिली. “विजय शाह हे एक वरीष्ठ आदिवासी मंत्री आहेत. त्यांना पायउतार केल्यास त्याचा पक्षाला भविष्यात फटका बसू शकतो”, असं त्यांनी नमूद केलं.

काय म्हणाले होते विजय शाह?

१२ मे रोजी विजय शाह यांनी माऊ येथील एका कार्यक्रमात बोलताना भारतानं पाकिस्तानला धडा शिकवल्याचा उल्लेख केला. “पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना भारतानं त्यांच्या बहिणीच्याच माध्यमातून धडा शिकवला”, असं विधान त्यांनी केलं. यावेळी विजय शाह यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं, तरी त्यांचा रोख कर्नल सोफिया कुरेशी यांच्याच दिशेनं होता, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

विजय शाह यांनी नंतर त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका. मी त्या अर्थाने विधान केलेलं नव्हतं. त्या आपल्या भगिनी आहेत आणि त्यांनी आपल्या आर्मीसोबत पूर्ण सामर्थ्यानिशी बदला घेतला आहे”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून न्यायालयीन देखरेखीखाली विजय शाह यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.