सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर: प्रत्येक विधानसभेत राजकीय वलयांकित चेहऱ्याशिवाय समाज जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींबरोबरच बुद्धीवंतांचे संमेलने, व्यापारी संमेलने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण तसेच दुचाकी फेरी, योग शिबरे अशी विविध प्रकारच्या कामे हाती घ्या आणि पुढील ३० दिवस पक्ष कामाशिवाय अन्य काेणतेही मोठे काम हाती घेऊ नका, अशा सूचना केंद्रीय पातळीवरुन भाजपच्या मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याचा उत्सव भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने साजरा करण्याची तयारी केली जात आहे. त्यातून पुढील निवडणुकीची बांधणी केली जात आहे. मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास प्रकल्पास मतदारांना आवर्जून घेऊन जावे असे सांगण्यात आले असून ‘ विकासतीर्थास भेटी’ असे या उपक्रमास संबोधण्यात आले आहे.

हेही वाचा… परभणीत सभापतीपदावरून राष्ट्रवादीतच फाटाफूट

राज्यातील ४८ मतदारसंघात ११ प्रकारचे कार्यक्रम ठरविण्यात आले आहेत. या प्रत्येक उपक्रमासाठी छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात ११ जणांची समिती नेमण्यात आली आहे. एका बाजूस हिंदुत्त्वाचा अजेंडा आणि दुसरीकडे घरोघरी संपर्क असा नवा अजेंडा घेऊन महिनाभर भाजप कार्यकर्त्यांस आणि नेत्यांना काम देण्यात आले आहे. मंत्र्यांना तीन लोकसभा मतदारसंघांचे दौरे करण्यास सांगण्यात आले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एखादी जाहीर सभाही घेतली जावी असेही नियोजन करण्यात आले आहे. मतदारांना विकास प्रकल्प दाखवा असे सांगण्यात आले असून व्यापारी आणि बुद्धीवंतांच्या समेलनासह कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर भाजपच्या गोटात अस्वस्था असून केलेली कामे तसेच योजनांच्या लाभार्थींना भेटून त्यांना भाजपच्या बाजूने वळविण्याची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर भाजपचे कार्यकर्ते कमालीचे व्यस्त असतील, अशी रचना करण्यात आली आहे.

हेही वाचा… कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये ‘पैशांचा पाऊस’

पुढील महिनाभर पक्षाच्या वतीने अनेक कार्यक्रम ठरविण्यात आले आहेत. २०१४ पासून मोदी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. अनेक विकासतीर्थ तयार आहेत. त्याला भेटी देण्यापासून ते विविध प्रकारची संमेलने घेतली जाणार आहेत. प्रत्येक मंत्र्यास तीन लोकसभा मतदारसंघात जाऊन मतदारांशी संपर्क करावयाचा आहे. याशिवाय आपापल्या मतदारसंघातही विविध विकास विषयक व संघटनात्मक बांधणीचे कार्यक्रम ठरविण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. – डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ministers will be busy for a month in party campaign print politics news asj
First published on: 27-05-2023 at 15:40 IST