BJP MLA Govind Parmar Heart Attack Death : गुजरातमधील सत्ताधारी भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोविंद परमार यांचे शुक्रवारी (६ मार्च) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी परमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, पक्षाने जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील भाजपाचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यादरम्यान पक्षाने आणखी एक वरिष्ठ नेता गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद परमार यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा सविस्तर आढावा…
कोण होते गोविंद परमार?
गोविंद परमार हे आणंद जिल्ह्यातील उमरेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना परमार यांनी वयाच्या ७२ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भाजपासह आणंद जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गोविंद परमार यांची आणंद जिल्ह्यातील क्षत्रिय-ठाकोर समाजाचे एक प्रभावशाली नेते म्हणून ओळख होती. त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून तळागाळातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते.
१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार
परमार यांचा राजकीय प्रवास अत्यंत यशस्वी राहिला आहे. त्यांनी उमरेठ मतदारसंघातून चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली होती. १९९५ मध्ये परमार यांनी सारसा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदा गुजरात विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. २००२ व २००७ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र परमार यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर उमरेठ मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आपले कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पटेल यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. २०२२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही परमार यांनी हा मतदारसंघ आपल्याकडेच राखला.
आणखी वाचा : देवेंद्र फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा; लाडकी बहीण योजना बंद होणार? वाचा ५ घडामोडी…
राज्यमंत्री म्हणूनही महत्त्वाचे योगदान
गोविंद परमार यांनी गुजरात सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण खाती सांभाळली होती. दिवंगत मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांच्याकडे पंचायत विभागाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला होता. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे खाते मानले जाते. पंचायत विभागाबरोबरच परमार यांनी पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले. एक अनुभवी नेता व प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परमार यांच्या कार्याचा ठसा उमरेठ व आणंद जिल्ह्यावर कायम राहणार, अशा शोकमग्न भावना त्यांच्या निधनानंतर गुजरातच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या. आमदार गोविंद परमार यांच्या निधनामुळे उमरेठ विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. भाजपासाठी हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे तिथे लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
परमार यांच्या निधनावर भाजपाचा शोक
विधानसभेत जाण्यापूर्वी गोविंद परमार यांनी स्थानिक राजकारणातही आपला ठसा उमटवला होता. त्यांनी आणंद जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले होते. आपल्या या अनुभवाचा उपयोग त्यांनी पुढे आमदार आणि त्यानंतर मंत्री म्हणून काम करताना केला. गोविंद परमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच गुजरातच्या राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी परमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनीही परमार यांच्या आठवणींना उजाळा देत पक्षासाठी ही मोठी हानी असल्याचे म्हटले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनीही सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. त्यांनी परमार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांच्या निधनाने पक्षाचा एक निष्ठावान आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली.
हेही वाचा : बिहारमध्ये भाजपाचे ऑपरेशन लोटस? नितीश कुमार यांचे समर्थक आक्रमक का झाले?
उत्तर प्रदेशातही भाजपा आमदाराचे निधन
हृदयविकाराच्या झटक्यामुळे तीन महिन्यांत भाजपाच्या दोन आमदारांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील फरीदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांना जानेवारीमध्ये एका बैठकीदरम्यान हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यावेळी भाजपाच्या इतर नेत्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. डॉ. श्याम हे फरीदपूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले रुहेलखंड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या साध्या, सौम्य आणि लोकाभिमुख स्वभावामुळे ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय होते. फरीदपूर परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि थेट संपर्क ठेवणे, यासाठी ते विशेष ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणासह शिक्षण क्षेत्राचीही मोठी हानी झाल्याच्या भावना भाजपा नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या.
