scorecardresearch

भाजपा आमदाराने वृद्ध महिलेकडून धुवून घेतले पाय; टीका झाल्यानंतर म्हणाल्या, आजच्या जगात…

बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी गुरुवारी रात्री पश्चिम त्रिपुरातील त्यांच्या मतदारसंघातील सूर्यपाडा या पूरप्रवण क्षेत्राला भेट दिली तेव्हा ही घटना घडली

Mimi Majumder
(फोटो सौजन्य – फेसबुक)

त्रिपुरातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचे पाय धुताना एका गरीब महिलेचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महिला आमदाराला जनतेच्या रोष आणि टीकेचा सामना करावा लागला. बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी गुरुवारी रात्री पश्चिम त्रिपुरातील त्यांच्या मतदारसंघातील सूर्यपाडा या पूरप्रवण क्षेत्राला भेट दिली तेव्हा ही घटना घडली.

दुसरीकडे आमदाराने दावा केला आहे की, महिलेने प्रेम आणि आपुलकीने आपले पाय धुतले होते. सूर्यपारा येथील पूरग्रस्त भागाला भेट देणाऱ्या बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी दावा केला की, महिलेने प्रेम आणि आपुलकीने तिचे पाय धुतले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला मिमी मजुमदार यांचे पाय साबणाने आणि पाण्याने धुताना आणि टॉवेलने पुसताना दिसत आहे. या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. आमदार मिमी मजुदार परिसराची पाहणी पूर्ण केल्यानंतर महिलेने पाय धुतले.

मला मुलगी मानून महिलेने पाय धुतले

बधरघाट उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका मिमी मजुमदार यांनी विधानसभा पोटनिवडणुकीचे तिकीट मिळण्याच्या काही दिवसांपूर्वी २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. या घटनेबद्दल मिमी मजुमदार म्हणाल्या, “वयोवृद्ध महिलेने माझ्या प्रेमापोटी माझे पाय धुतले. महिलेने मला आपली मुलगी समजून हे केले. याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. चांगले काम करून एखाद्या आमदाराला लोकांकडून किती आदर मिळतो हे यावरून दिसून येते. माझा विश्वास आहे की आजच्या जगात कोणालाही कोणाचे पाय धुण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही किंवा असे काहीही केले जाऊ शकत नाही.”

दरम्यान, विरोधी पक्ष सीपीएमने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर “फोटो शूट केल्यानंतर एका महिलेला आमदार मिमी मजुमदार यांचे पाय धुवावे लागले,” या कॅप्शनसह हा व्हिडिओ टाकला आहे. या घटनेला धक्कादायक असल्याचे म्हणत युवक काँग्रेसचे अध्यक्ष राखू दास म्हणाले, “हे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची मानसिकता दर्शवते. त्यांना (भाजपा) कठीण काळात लोकांबद्दल सहानुभूती नाही. सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी ते फोटोशूटमध्ये व्यस्त आहेत.”

दरम्यान, पुरामुळे आसाममधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आतापर्यंत लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, लुमडिंग विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सिबू मिश्रा १८ मे रोजी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी होजई येथे पोहोचले होते. त्यावेळी रस्त्यावर पाणी भरले होते. सिबू मिश्रा यांनी बूट घातले होते, त्यामुळे त्यांना पाण्यात उतरता आले नाही. त्यानंतर एका पत्रकाराने त्यांना पाठीवर बसवून बोटीत नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आसामचे आमदार सिबू मिश्रा यांनीही या घटनेबद्दल आपला बचाव करत म्हटले की प्रेमाने मला पाठीवर उचलून घेतले होते. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले की, “माझी तब्येत ठीक नाही आणि ओळखीच्या एका पत्रकाराने मदत करतो असे म्हटले होते. मला माहित नव्हते की माध्यमे हा एवढा मोठा मुद्दा बनवेल. मी दोन वेळा आमदार आहे, ते मला ओळखतात, माझे काम जाणतात.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla visits flood hit areas feet washed by old woman after inspection abn

ताज्या बातम्या