नागपूर : भारतीय जनता पक्षात निवडणुकीतील यशाचे श्रेय देण्याची एक ठरलेली पद्धत आहे. या क्रमवारीत पहिले नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असते. निवडणूक महाराष्ट्रातील असेल, तर मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही श्रेयाचे मानकरी म्हणून उल्लेख होतो. मात्र, पराभवाची वेळ आली की जबाबदारी स्वीकारण्याची अशी निश्चित पद्धत नाही. मुळात पराभवाची जबाबदारी स्वीकारण्यासाठीच कोणी पुढे येत नाही. ‘पक्षाला आत्मचिंतन करावे लागेल’, अशा निरर्थक प्रतिक्रिया देऊन जबाबदारी टाळली जाते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव मात्र याला अपवाद ठरला आहे. निवडणुकीचे प्रभारी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पराभवाची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली. त्यामुळे आता प्रश्न केवळ बावनकुळे यांच्या जबाबदारीपुरता मर्यादित राहिलेला नाही. पक्षातील अन्य नेते, आमदार, खासदार आणि मित्रपक्षांच्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत नेमकी काय भूमिका बजावली, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवासाठी जबाबदार कोण ? याची चर्चाही सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेली जागा पक्ष गमावूच कसा शखतो ? असा सवाल पक्षातूनच केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे प्रभारी व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारतो हे जाहीरपणे मान्य केले. त्यानंतर आता वेगळ्या मुद्यावर चर्चा सुरू झाली आहे. ? जबाबदारी फक्त बावनकुळेंचीच का ? इतरांनी काय केले हा चर्चेतील मुद्या आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी किती प्रतिष्ठेची होती, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तळ ठोकल्यावरच स्पष्ट झाले होते. तरीही महायुतीचे आमदार,खासदार गाफिल का राहिले. नागपुरात तर पक्षाचे प्रचंड मोठे नेटवर्क आहे, आमदारांच्या माध्यमातूनच ते चालते, मग ते सक्रिय का झाले नाही. फक्त मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठीच काम करीत असल्याचा आव आणला गेला का ? असा सवाल केला जात आहे.
बावनकुळे हे निवडणुकीची मोर्चेबांधणी, उमेदवाराची निवड आणि प्रचारयंत्रणेला गती देण्यापर्यंतच्या घडामोडींमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून बावनकुळे सक्रिय होते. अपक्ष उमेदवार अनिल सोले यांनी माघार घ्यावी, असे आवाहन सर्वप्रथम बावनकुळे यांनीच केले होते. मात्र, पक्षाचा पराभव झाल्यानंतर ते टीकेचे लक्ष्य ठरले. त्यांनी निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारून राजकीय परिपक्वता दाखवली असली, तरी या पराभवाची जबाबदारी त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवता येईल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजप हा संघटनेच्या बळावर विस्तारलेला पक्ष आहे. मग निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीवरच कशी निश्चित करता येईल? नागपूर विभागात महायुतीचे ३१ आमदार असून, त्यापैकी नऊ आमदार नागपूर जिल्ह्यातील आहेत. एवढे संख्याबळ असतानाही भाजपच्या उमेदवाराचा पराभव का झाला? नागपूरवर पक्षाने सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असताना प्रत्यक्ष मतदानात त्याचे प्रतिबिंब का उमटले नाही? आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी उमेदवाराच्या विजयासाठी किती प्रभावी प्रयत्न केले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. बावनकुळे यांनी जबाबदारी स्वीकारली असली, तरी पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेतील इतर घटकांची भूमिका तपासल्याशिवाय पराभवाची कारणमीमांसा पूर्ण होणार नाही.
पक्षांतर्गत घाताची चर्चा?
भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा सुमारे तीन हजार मतांनी पराभव झाला. त्यातच त्यांच्या पहिल्या पसंतीची चार हजारांहून अधिक मते बाद झाल्याची बाब चर्चेत आहे. मतपत्रिकांवरील त्रुटींमुळे मते बाद होणे ही निवडणूक प्रक्रियेतील नवीन बाब नाही. मात्र, कोहळे यांची मते एकाच पद्धतीने बाद झाल्याचा दावा केला जात असल्याने पक्षांतर्गत वर्तुळात संशय व्यक्त केला जात आहे. हा केवळ योगायोग होता की त्यामागे काही नियोजन होते,?. या कथित प्रकारामागे कोणाचा हात होता किंवा कोणाच्या सांगण्यावरून असे घडले, याचा शोध घेण्याची मागणी पक्षातील काही घटकांकडून होत आहे.’
कोहळे यांनाच उमेदवारी का?
पराभवानंतर भाजपच्या वर्तुळात चर्चेत असलेला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुधाकर कोहळे यांची उमेदवारी. त्यांच्या नावावर एकमत होते का आणि त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील कोणते घटक नाराज झाले होते, याचीही चर्चा सुरू आहे. २०२० च्या निवडणुकीत बहुजन उमेदवाराचा मुद्दा भाजपसाठी प्रतिकूल ठरला होता. त्यामुळे यंदा बहुजन समाजातील उमेदवार देण्याशिवाय पर्याय नव्हता, . त्या परिस्थितीत कोहळे हेच योग्य पर्याय होते, असेही सांगितले जाते. अन्य पक्षातून उमेदवार आयात केला असता, तर पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजी निर्माण झाली असती. अशा उमेदवाराचा पराभव झाला असता, तर पक्षात चुकीचा संदेश गेला असता, असाही युक्तिवाद केला जात आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभव हा केवळ एका उमेदवाराचा पराभव म्हणून पाहणे भाजपसाठी सोयीचे ठरू शकते. मात्र, राज्याच्या सत्तेत प्रभावी स्थान असलेल्या पक्षाला आपल्या बालेकिल्ल्यातील या निकालाची कारणे शोधायची असतील, तर जबाबदारीचे वाटप करण्यापलीकडे जावे लागेल. बावनकुळे यांनी जबाबदारी स्वीकारली, ही बाब महत्त्वाची असली, तरी पक्षातील अन्य नेत्यांची भूमिका, उमेदवार निवडीचे गणित आणि संघटनात्मक यंत्रणेची कामगिरी यांचाही लेखाजोखा घ्यावा लागेल. अन्यथा, पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीवर टाकून आत्मचिंतनाचा विषय संपवला जाईल आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेची मूळ कारणे मात्र कायम राहतील.
