बदलापूरः राज्यात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती असताना ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेत मात्र शिवसेनेला बाजूला सारून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युतीची घोषणा केली होती. आता या दोन्ही पक्षातील जागावाटप निश्चित झाले आहे. नगराध्यक्ष पद भाजपच्या वाट्याला जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपनगराध्यक्ष पदासह ८ जागा आणि एक स्विकृत नगरसेवकपद मिळणार आहे. महायुतीतल्या घटक पक्षातली युती महायुतीतीलच शिवसेनेला किती डोकेदुखी वाढवणारी ठरते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

केंद्रात आणि राज्यात एकत्र असलेल्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर किती संघर्ष आहे हे गेल्या काही दिवसात उघडकीस आले आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील नगरपंचायत आणि नगर पालिकांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी तेथे राज्यातील सत्ताधारी महायुती एकत्र लढताना दिसत नाही. त्याचवेळी स्थानिक पातळीवरील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. मात्र त्याचवेळी महायुतीतील पक्षांमधील दोन पक्ष एकत्र येऊन तिसऱ्या पक्षाला कोंडीत पकडण्याची खेळी करत असल्याचे ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेत समोर आले आहे.

नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच १२ ऑक्टोबर रोजी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी थेट परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या थेट घरी जात बदलापूर पालिकेत युती करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी राज्यात अशा युतीचा हा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता पसरली होती. मात्र शिवसेनाही युतीत येऊ शकते, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे बदलापुरात महायुतीतील दोन पक्ष एका पक्षाविरूद्ध लढणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा सुरू होती.

आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जागावाटप अंतिम झाले आहे. एकूण ४९ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ८ जागा तर भाजपच्या वाट्याला ४१ जागा आल्या आहेत. थेट नगराध्यक्ष पद भाजपच्या वाट्याला आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पाच वर्षांसाठी उपनगराध्यक्ष पद दिले जाणार आहे. तर त्याचवेळी एक स्विकृत सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. यापूर्वीच्या सभागृहात भाजपचे २० तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ सदस्य होते. शिवसेना २५ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे भाजप सोबतच्या युतीमुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ होण्याची आशा आहे. दोन्ही पक्ष एकत्रितरित्या प्रचारही करत आहेत.

आम्ही १० जागांची मागणी केली होती. ८ जागांवर निर्णय झालेला आहे. सोबतच पाच वर्षे उपनगराध्यक्ष पद, एक स्विकृत नगसेवक आम्हाला मिळणार आहे. आणखी दोन जागांसाठी आमची चर्चा सुरू आहे. पण आमच्या युतीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. – आशिष दामले, कॅबिनेट मंत्री, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ.