कर्नाटक विधान परिषदेच्या चार जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाने दमदार कामगिरी केली. मात्र, या राज्यात पक्षाला स्वतःची राजकीय दिशा निश्चित करण्यासाठी अजूनही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुकांकडे भाजपाने लक्ष्य केंद्रित केले असले तरीही पक्षासाठी कर्नाटक हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. दक्षिण भारतातील या एकमेव राज्यात भाजपाला याआधी सत्ता मिळालेली होती; पण २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना सत्तेतून भाजपाला दूर केले होते. त्यामुळे २०२८ मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्याची संधीही भाजपाला आहे.

कर्नाटकमधील पक्ष नेतृत्वावरून सुरू असलेला संघर्ष, ज्येष्ठ नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि मुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला घेरण्यासाठी स्पष्ट रणनीतीचा अभाव यांमुळे भाजपा अद्याप निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत दक्षिणेतील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या एका भाजपा नेत्याने सांगितले की, सिद्धरामय्या यांची माघार ही पक्षासाठी एक मोठी राजकीय संधी होती; पण त्यानंतरची भाजपाची राजकीय कामगिरी पाहता पक्षासमोरील अडचणी स्पष्ट होतात.

राज्यातील भाजपाच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना या नेत्याने तीन महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. पहिली म्हणजे, मुख्यमंत्री शिवकुमार यांनी आतापासूनच हिंदू समाजाशी जवळीक साधून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दुसरे म्हणजे, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवत विरोधकांचे नेतृत्व जवळपास आपल्या हातात घेतले आहे. तिसरी बाब म्हणजे, कर्नाटक भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत मतभेद आहेत. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांचा तीव्र विरोध आहे.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस पक्ष अंतर्गत कलह आणि वादात अडकला आहे. या परिस्थितीत त्यांना घेरण्याची गरज असताना भाजपा मात्र नेतृत्वहीन असल्यासारखा दिसत आहे. त्याचवेळी पक्षाही दिशाही भरकटलेली आहे. कर्नाटक हे एकमेव मोठे राज्य आहे, जिथे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप नेतृत्वाबाबतचा निर्णय अंतिम घेतलेला नाही. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने या सर्वोच्च पदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच कमालीची तीव्र झाली आहे.

राज्यातील कथित भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि काँग्रेस सरकारच्या कल्याणकारी योजनांमधील त्रुटींवरून रान उठवण्यासाठी विजयेंद्र यांनी नुकतीच १० दिवसांची ‘बल्लारी चलो’ पदयात्रा पूर्ण केली आहे. मात्र, पक्षांतर्गत एकजुटीचा अभाव असल्याने भाजपाला राज्यातील भीषण दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवकुमार सरकारची कोंडी करता आलेली नाही, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. कर्नाटक सरकारने अलीकडेच राज्यातील २४० पैकी २२७ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान, भाजपाचे माजी मुख्यमंत्री आणि हावेरीचे लोकसभा खासदार बसवराज बोम्मई यांना राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे, तर केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांची राज्याच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षा सर्वश्रुत आहे.

सोमण्णा यांनी नुकतीच राजधानी दिल्लीत आपल्या अधिकृत निवासस्थानी कर्नाटक भाजपाच्या काही नेत्यांची बैठक घेतली. तसेच, वरिष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्नही त्यांनी केल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे कर्नाटक भाजपामध्ये चर्चांना उधाण आले आहे. माजी मंत्री असलेल्या यत्नाळ यांनी प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर सातत्याने तीव्र टीका केली होती. त्यामुळे मार्च २०२५ मध्ये त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. अशा परिस्थितीत यत्नाळ पुन्हा पक्षात सक्रिय करण्याच्या हालचालींमुळे प्रदेश भाजपामधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

एकीकडे भाजपा आपली अंतर्गत घडी बसवण्यासाठी झगडत असताना दुसरीकडे जेडीएसचे नेते आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी डी. के. शिवकुमार सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांचा सर्वात आक्रमक चेहरा म्हणून ते सातत्याने आपली भूमिका मांडताना दिसून येत आहेत. भाजपाच्या एका खासदाराने सांगितले की, राज्यातील भाजपाच्या अनेक स्थानिक नेत्यांपेक्षा कुमारस्वामी यांच्यावर दिल्लीतील नेतृत्वाचा सर्वाधिक विश्वास आहे. गेल्या दोन महिन्यांत कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर केलेल्या सार्वजनिक टीकेला मोठे महत्त्व मिळाले आहे. त्यात स्टिंग व्हिडिओचा वाद, कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या भरतीतील कथित घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बिदादी जमीन प्रकरण यांचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य करणाऱ्या २०११ मधील एका स्टिंग ऑपरेशनचा कथित व्हिडिओ नुकताच समाजमाध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर समोर आला. यावरून काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत वादळ उठले असून कुमारस्वामी यांनी थेट शिवकुमार यांच्यावर स्वपक्षीयांनाच संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. मात्र, शिवकुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे बिदादी जमीन प्रकरणाचा संबंध सुमारे ७,५०० एकर सुपीक शेतजमिनीवर प्रस्तावित असलेल्या ‘ग्रेटर बेंगळुरू इंटिग्रेटेड टाउनशिप’ (GBIT) प्रकल्पाशी आहे. या प्रकल्पावरून कुमारस्वामी यांनी शिवकुमार आणि काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकल्पासाठी आठ गावांमधील सुपीक जमीन बळकावण्याच्या सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

१०८० पासून भाजपाने कर्नाटकात आपला राजकीय प्रभाव सातत्याने वाढवला आहे. दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये मजबूत पाय रोवण्यासाठी पक्षाला संघर्ष करावा लागला असला, तरी अलीकडच्या काळात तेलंगणातही भाजपाने आपला विस्तार केला आहे. कर्नाटक आणि तेलंगणा ही दोन्ही राज्ये भाजपासाठी महत्त्वाची मानली जातात. या दोन राज्यांतील एकूण ४५ पैकी भाजपाचे २५ खासदार निवडून आलेले आहेत. २०२८ मध्ये या दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच्या पुढच्याच वर्षी लोकसभेची निवडणूक असल्याने या राज्यांतील राजकीय समीकरणे भाजपासाठी महत्त्वाची ठरणार आहे.