उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप पक्षश्रेष्ठी आणि पक्षातही नाराजी आहेत. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत निरोप देवून पाटील यांना खुलासा करायला लावला. याप्रकरणी फडणवीस यांनीही अलिप्त राहून व मौन पाळून ‘ पाटील यांचे हे वैयक्तिक मत असून भाजपचे नाही,’ असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना करण्याची सूचना केली, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !

पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपची अनेकदा पंचाईत झाली आहे. त्यावेळी फडणवीस यांनी सारवासारव केली किंवा त्याबाबत पाटील यांना सूचना केली. पण बाबरी मशीद शिवसेना कार्यकर्त्यांनी पाडली नाही किंवा तसा कट शिवसेना भवनात शिजला नव्हता, असे वक्तव्य करून पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केल्याने शिंदेंसह त्यांच्या गटातील नेतेही चिडले. शिंदे यांनी आपली नाराजी भाजप पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातल्याचे समजते. त्यामुळे फडणवीस यांच्याऐवजी थेट शिंदे यांनीच पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करायला लावला.

भाजपच्या एखाद्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले, तर प्रदेशाध्यक्ष किंवा फडणवीस यांच्याकडून त्याला स्पष्टीकरण करण्याची सूचना दिली जाते किंवा गरज असेल तेव्हा तंबीही दिली जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवेल व शिंदे गटाला ४० जागा मिळतील, असे वक्तव्य नुकतेच केले होते. तेव्हा फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याशी बोलून खुलासा करण्याची सूचना केली होती. पाटील यांच्या आताच्या वक्तव्यामध्ये मात्र फडणवीस अलिप्त राहिले किंवा ठेवले गेले. त्यांनी सारवासारवही केली नाही. मात्र पाटील यांचे वक्तव्य ही भाजपची भूमिका नसल्याचा खुलासा बावनकुळे यांना करण्याची सूचना केली. भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे आणि त्यांना खुलासा करण्याची सूचना सहकारी पक्षाचा प्रमुख करतो, अशी पाळी भाजपमध्ये क्वचितच आली आहे.

पाटील यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी निकटचे संबंध आहेत, असे नेहमी सांगितले जाते. मात्र त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसंदर्भातच वक्तव्य केल्याने पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांमध्येही नाराजी आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर खटके उडत असताना बावनकुळे आणि पाटील यांच्या वक्तव्यांमुळे त्यात भर पडली आहे. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना भाजप व शिंदे गटात मतभेद वाढले, तर ते परवडणारे नसल्याने पक्षश्रेष्ठींनी थेट हस्तक्षेप केल्याचे सूत्रांनी सांगितले.