सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विकासात्मक आणि संघटनात्मक बांधणी मोहिमेचा भाग म्हणून भाजपने पहिल्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गसह राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘प्रवास योजना’ आयोजित केली आहे.

या योजनेअंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत ७ ऑगस्टपासून ३ दिवस मतदारसंघातील सर्व घटकांचा आणि विकासात्मक कामांचा आढावा घेतला जाणार आहे. याद्वारे भाजपने आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी केली असून या सर्व मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वास राज्याचे प्रभारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने चारशेहून जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी राज्यातील सोळा मतदारसंघांमध्ये पुढील १८ महिने ही ‘प्रवास योजना’ सुरू राहणार आहे. त्यासाठी सहा केंद्रीय मंत्री नेमले असून ते प्रत्येक मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करतील. त्यावेळी स्थानिक मतदार, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकार्‍यांशी ते संवाद साधणार आहेत. मतदारसंघातील संघटनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राशी निगडीत कार्यक्रमांचे आयोजन असा राजकीय कार्यक्रम आखण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला जाईल. बूथ कार्यकर्ते, योजनांचे लाभार्थी आणि मतदारसंघातील स्वातंत्र्यसैनिकांचीही या मुक्कामात भेट घेतली जाणार आहे. स्थानिक प्रशासनाने अनेक केंद्रीय योजना या मतदारसंघांमध्ये राबवल्या. त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचला का, याचा आढावा प्रशासकीय पातळीवर घेतला जाणार आहे. राजापुरातील प्रस्तावित रिफायनरीचा प्रश्नही याच प्रवास योजनेत सोडवला जाईल, असा विश्‍वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

….तर निवडणुका जानेवारीत

महाविकास आघाडी सरकारने २०२१ च्या जनगणनेचा वापर न करताच बेकायदेशीररीत्या जिल्हापरिषद , पंचायत समिती आणि नगर पालिकांमधील जागा वाढवल्या आहेत. याविरोधात आम्ही गेलो असून निकाल आमच्या बाजूने लागला तर वाढीव जागा रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होतील अशी शक्यता बावनकुळे यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp plan for organization build up in selected lok sabha constituency in country print politics news asj
First published on: 02-08-2022 at 11:22 IST