BJP Replace 30 MLAs Ahead Of Assembly Polls Assam आसाम निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वातच भाजपा ही निवडणूक लढवणार आहे. आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा मोठे संघटनात्मक बदल करण्याच्या तयारीत आहे. ज्या विद्यमान आमदारांविरुद्ध थोड्या प्रमाणात जरी नाराजी आहे, त्यांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आसाम जिंकण्यासाठी भाजपाची रणनीती काय आहे? जाणून घेऊयात…
३० विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा आपली स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी २५ ते ३० नवीन उमेदवार रिंगणात उतरवू शकतो. आसाम विधानसभेत सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी पक्षाने आखलेल्या मोठ्या रणनीतीचा हा एक भाग आहे. उमेदवारी ठरवताना आमदारांची कामगिरी आणि जनतेतील त्यांची प्रतिमा हेच मुख्य निकष असतील, असे पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पक्षाच्या निवडणूक तयारीने वेग घेतला आहे. सूत्रांनुसार, निवडणूक आयोग मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे, त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. घोषणा आणि मतदान यामध्ये किमान २५ दिवसांचे अंतर राखले जाईल, त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
भाजपाची रणनीती
भाजपा ही निवडणूक मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहे. या नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील निवडणूक रणनीतीमध्ये सरमांचे नेतृत्व केंद्रस्थानी असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे सांगणे आहे.
पक्षाने आपल्या प्रचाराचे मुद्दे ‘मॅक्रो’ (मोठे) आणि ‘मायक्रो’ (स्थानिक) अशा दोन गटांत विभागले आहेत. ‘मॅक्रो’ स्तरावर भाजपा बेकायदा स्थलांतर, केंद्र आणि राज्य सरकारचे विकास प्रकल्प, मोदी प्रशासनांतर्गत पायाभूत सुविधांची कामे, हिंदुत्व, महिला सक्षमीकरण आणि काँग्रेस नेत्यांवरील (विशेषतः गौरव गोगोईंवरील) आरोप यांवर भर देणार आहे.
तळागाळातील (मायक्रो) स्तरावर स्थानिक आणि समाजाशी संबंधित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्य सरकार गाव, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर अंगणवाडी सेविका, चहाच्या मळ्यातील कामगार आणि सरकारी कर्मचारी यांच्याशी संबंधित सुमारे १०० प्रश्नांवर काम करणार आहे. प्रचार अधिक प्रभावी ठरावा यासाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आठ ते १० सभांसाठी पक्षाने वेळ मागितली आहे.
तसेच, केवळ निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच नवीन प्रवेश करून घेतले जाणार आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ९० ते १०० जागा जिंकेल आणि पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केला आहे. आगामी काळात भाजपासाठी पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमधील विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या ठरणार आहेत.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे काँग्रेसवर आरोप
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी केलेला एक दावा आता चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी दावा केला की, २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसच्या ५८ आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता, तेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख ठरवण्यास सांगितले होते. काँग्रेसमधील आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना सरमा म्हणाले की, त्यावेळी अमेरिकेत असलेल्या राहुल गांधींनी पक्षाच्या नेत्यांना फोन केल्यानंतर संपूर्ण परिस्थिती बदलली.
ते म्हणाले, “जेव्हा मल्लिकार्जुन खर्गे राज्यात आले होते, तेव्हा ५८ आमदारांनी मला मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दिला होता. अनेक ज्येष्ठ नेते या निर्णयावर ठाम होते आणि केवळ १२ आमदारांनी माझ्या विरोधात तरुण गोगोईंना पाठिंबा दिला होता, त्यावेळी राहुल गांधी अमेरिकेत होते. सोनिया गांधींनी मला त्यांच्या निवासस्थानी बोलावले आणि शपथविधीची तारीख ठरवण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की, मी ‘अंबुबाची’ (कामाख्या मंदिरातील वार्षिक सोहळा) नंतरच्या दिवशी शपथ घेईन. मात्र, त्यानंतर राहुल गांधींचा अमेरिकेतून फोन आला आणि सर्व काही बदलले,” असे सरमा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.
ते पुढे म्हणाले, “काँग्रेसने मला बाहेर काढले. मी पक्ष का सोडला हे तुम्हाला माहीत नाही. तरुण गोगोई यांनी सर्वांना गौरव गोगोईंच्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. सर्व कॅबिनेट मंत्र्यांना तसे आदेश दिले होते. मी म्हणालो की मी पक्षासाठी काम करेन, पण त्या बैठकीला जाणार नाही.” २०११ च्या निवडणुकीनंतर आसाम काँग्रेसमध्ये बंडाळी निर्माण झाली होती. आमदारांच्या एका गटाला सरमा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत होते. २०१५ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि आसाममध्ये भाजपाचा पहिला विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी २०१४ मध्ये तरुण गोगोईंच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता आणि २०१५ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला होता.

