कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या पहिला महापौर कोण होणार याकडे नगरवासीयांचे लक्ष वेधले असताना सत्तेची निर्विवाद सूत्रे असलेल्या भाजपने महापौर, उपमहापौर, स्थायीसह अन्य समिती सभापती पदाचा सत्तेचा वाटा सर्वच नगरसेवकांपर्यंत पोहोचेल अशी विभागणी करण्याचे ठरवले आहे. पहिला आणि सभागृहाची मुदत संपेपर्यंत महापौर दहा महिन्याचा पाहुणा असणार आहे. सर्वांना सत्तेची गोड फळे पोहोचवण्याचा प्रयत्न असला तरी प्रतिष्ठेच्या पदाची खांडोळी होणार असल्याने पदाधिकाऱ्यांच्या अल्प कालावधीत शहराच्या विकासाला गती कशी मिळणार असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.
इचलकरंजी महापालिकेची पहिली वाहिली निवडणूक पार पडली. ६१ सदस्यांच्या सभागृहात भाजपने ४३ जागा मिळवत वादातीत बहुमत प्राप्त केले आहे. मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. विरोधकांना १५ जागा मिळालेल्या आहेत. हुकमी बहुमत असल्याने आगामी पाच वर्षात स्थिर प्रशासन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तथापि भाजपची सत्ता समीकरणे वेगळाच संदेश देत आहेत.
महापौरपदाची खांडोळी
भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीमध्ये आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सत्ता विभागणीचा पट खोलून दाखवला. त्यानुसार महापौर व उपमहापौर हे दहा महिन्यासाठी असणार आहे. यातून शहराला सहा महापौर व तितकेच उपमहापौर मिळणार आहेत. खेरीज, स्थायी, शिक्षण, परिवहन या समितीच्या जोडीलाच बांधकाम, आरोग्य व पाणीपुरवठा या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समितीचा कारभार एक वर्षासाठी असल्याने अशा समित्यांवर ३० नगरसेवकांना मुरवता येते.
कार्यकर्त्यांनाही संधी
राहता राहिला प्रश्न तो म्हणजे पराभूत उमेदवारांचा. शहरात चार विभागीय कार्यालय अंतर्गत समितीचे अध्यक्षपद पराभूत उमेदवारांकडे सोपवले जाणार आहे. त्यांनाही सत्तासंगाचा लाभ होऊ शकतो. अशा विभागीय समित्यांमध्ये निवडक कार्यकर्त्यांचीही वर्णी लागणार आहे. इतकेच काय तर स्वीकृत सदस्य सदस्यांचा कालावधी कमी करण्याचे भाजपचे नियोजन दिसत आहे. सर्वांना सत्ता मिळावी असे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे नियोजन आहे.
स्थिरतेवर परिणाम
तथापि, अल्प कालावधीमुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांना विकासाचा रथ किती गतीने पुढे नेता येणार यावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह लावले जात आहे. पालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले असले तरी गेल्या तीन वर्षा मूलभूत प्रश्नांची कोंडी कायम आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण असे सारे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. विधानसभे पाठोपाठ भाजपकडे महापालिकेची सत्ता सोपवल्याने नागरिकांच्याही विकासाच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे.
वाढलेल्या अपेक्षा
इचलकरंजीचे अर्थकारण वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. या उद्योगाची उलाढाल ४० हजार कोटीपर्यंत जाईल असा दावा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडून केला जात आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात व्यवहार वाढीस लागणार असतील तितक्याच गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा वस्त्रनगरीमध्ये असणे नितांत गरजेचे आहे. असे असताना कमी कालावधीतील महापौर पासून अन्य पदावरील लोकप्रतिनिधींनी विकास कामांच्या अपेक्षांना न्याय कसा देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याचसाठी सत्ता विभागणी
तथापि याबाबत भाजपची भूमिका वेगळी आहेत. सबका साथ सबका विकास हा मंत्र भाजपला जणू प्रेरणा देतो आहे. ‘ महापालिकेत भाजपची सत्ता आल्यामुळे बहुतेक नगरसेवकांना महत्त्वाच्या पदावर जाण्याची ओढ दिसते. महापौर पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या वर्गातील बहुतेक नगरसेवक – नगरसेवकांना संधी मिळू शकते. इतरांना उपमहापौर, समित्यांचे सभापती देऊन किमान समाधान करता येणे शक्य आहे,’ असे स्पष्टीकरण आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.

