पिंपरी : राज्यात महायुतीमध्ये एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवक फोडण्यावरून घमासान सुरू असतानाच आगामी निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने महायुतीमधील मित्रपक्ष आणि शहरातील प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), दोन्ही शिवसेनेतील एकूण दहा ते बारा माजी नगरसेवक लवकरच कमळ हाती घेणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे चार आमदार असलेला भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. महापालिकेवरही पाच वर्षे भाजपचीच सत्ता होती.
भाजपखालोखाल महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची शहरात राजकीय ताकद आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले अण्णा बनसोडे हे या पक्षाचे पिंपरीचे आमदार आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सलग १५ वर्षे अजित पवार यांचे वर्चस्व होते. परंतु, २०१७ मध्ये त्याला भाजपने तडा दिला. भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपचे तीनवरून ७७ नगरसेवक निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३६ जागांवर समाधान मानावे लागले होते. आगामी निवडणुकीत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केलेल्या भाजपने मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाच धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार) अनेक माजी नगरसेवकांची भाजपसोबत युती व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु, भाजप महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याची सूचना पक्षाच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांना केली. त्यामुळे युती होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक अस्वस्थ असून, त्यांनी भाजपशी संपर्क सुरू केल्याचे समजते.
महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासह दोन्ही शिवसेनेला धक्का देण्याची तयारी केली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे दोन, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे दोन, चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे एक, शिवसेना (ठाकरे) दोन आणि एक अपक्ष, भोसरीतील एक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचा एक प्रमुख पदाधिकारीही भाजपच्या संपर्कात आहे. परंतु, त्या प्रभागातील भाजपमधील माजी नगरसेवकाने या पदाधिकाऱ्याच्या प्रवेशाला विरोध केला आहे. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे एक माजी महापौरही भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. हे पक्ष प्रवेश लवकरच होतील, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासह सर्व पक्षातील माजी नगरसेवक संपर्कात आहेत. दहा ते बारा नगरसेवकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आले आहे. पक्ष प्रवेशाबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.
शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमधील घटक पक्ष आहे. पक्षातील कोणीही अद्याप नाराजी व्यक्त केली नाही. कोणी नाराज असेल, तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल. व्यक्तिगत कामे झाले नसल्याने कोणी नाराज असू शकेल. शहराचा विकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर मतदान होईल.योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार
