आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात भाजपा नेते व वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली… भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेताच लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला… छत्रपती संभाजीनगर महापालिकेत ‘आत्मे दिसतात’ या संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी चांगलाच समाचार घेतला… गोकुळ महासंघाच्या निधीतून मंत्री हसन मुश्रीफ भाजपालाच संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महायुतीतील आमदाराने केला… पुणे महानगरपालिकेत भाजपाच्या आजी-माजी नगरसेविकांमधील भांडणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मोर्चेबांधणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात भाजपा नेते व वनमंत्री गणेश नाईक यांचा गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला. बऱ्याच वर्षांच्या अंतरानंतर नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आल्याने शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपाने ही रणनीती आखली आहे का, अशी कुजबूज शहरात सुरू झाली आहे. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि गणेश नाईक हे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापालिकेत नाईक व शिंदे यांनी एकमेकांवर टीकेचा भडिमार केला होता. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपाची संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली होती. यादरम्यान भाजपाने ठाणे शहरात नाईक यांची पक्षाच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली असून तेव्हापासून ते ठाण्यात अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांच्या जनता दरबाराच्या निमित्ताने ठाणे शहराच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत.
आदित्य ठाकरे यांचे नाव घेताच लोकसभेत मोठा गदारोळ
संसदेच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला आजपासून (गुरुवार) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ‘नारीशक्ती वंदन कायदा’ (महिला आरक्षण विधेयक) लागू करण्यासाठी सभागृहात तीन घटनादुरुस्ती विधेयके सादर करण्यात आली. या विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या विधानानंतर सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत निशिकांत दुबे यांच्याकडून माफीची मागणी केली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून अध्यक्षांनी दुबे यांचे विधान पटलावर येणार नाही, असे सांगितले. या प्रकरणाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
मंत्री शिरसाट यांच्या वक्तव्याचा एमआयएमकडून समाचार
“छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ज्या जागेवर उभी आहे, तो कब्रस्तानचा भाग आणि इथे मुडदे गाडले जायचे. त्यामुळेच महापालिकेला ग्रहण लागले असून इथे आत्मे दिसतात”, असे अजब विधान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. तुम्ही अनेक वर्ष या महापालिकेत नगरसेवक होतात, तुमचा पक्ष २५ वर्षापासून याच जागेतून कारभार हाकत होता. तेव्हा तुम्हाला इथे आत्मे दिसले नाहीत का? असा टोला जलील यांनी शिरसाट यांना लगावला. तुमच्या मताशी मी सहमत आहे, एन-१२ परिसरातील ज्या जागेवर तुम्ही गुजरातच्या कंपनीला कचरा संकलनासाठी जागा देणार आहात, तिथे महापालिकेची भव्य नवी इमारत उभारा… माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांची गोची केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा आमदाराचा आरोप
गोकुळ महासंघाच्या निधीतून मंत्री हसन मुश्रीफ भारतीय जनता पक्षालाच संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीचे आमदार शिवाजी पाटील यांनी केला. मुश्रीफ हे मंत्रिपदाचा गैरवापर करून जिल्ह्यात मनमानी कारभार करीत आहेत. युती धर्म म्हणून आम्ही एक-दीड वर्षे त्यांचा अन्याय सहन केला; पण आता महायुतीमध्ये राहून त्यांचे भाजपाविरोधी काम यापुढे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसमुक्त भाजपा हे आमचे धोरण आहे, पण नेमके याच्या उलटे भाजपामुक्त राष्ट्रवादी काँग्रेस अशी मुश्रीफ यांची भूमिका आहे. मुश्रीफ महायुतीत राहून भाजपाविरोधी भूमिका घेत आहेत. अनेक निवडणुकींत त्यांची भूमिका भाजपला संपविणारी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या आरोपांवर आता मंत्री मुश्रीफ नेमके काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजपाच्या आजी-माजी नगरसेविका महापालिकेतच भिडल्या
पुणे महानगरपालिकेतील भाजपाच्या आजी-माजी नगरसेविकांमधील भांडणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. बाणेर परिसरात महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थिनी व महिलांसाठीच्या वसतिगृहाच्या कामावरून या नगरसेविकांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यामध्ये झालेल्या या खडाजंगीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राजश्री काळे यांना उमेदवारी दिली नाही. औंध-बाणेर प्रभागातून रोहिणी चिमटे उमेदवार होत्या आणि त्या विजयीही झाल्या. वसतिगृहाचे काम बंद असल्याबाबत बुधवारी काळे भवन रचना विभागात आल्या होत्या. तेथे चिमटे आणि संबधित काम करत असलेले ठेकेदार यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी या दोन्ही आजी-माजी नगरसेविकांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
